शंभरच्या नोटेचे शंभर नंबरी किस्से !

८ नोव्हेंबर २०१६. 

ही तीच तारिख होती जेव्हापासून भारतातल्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पाचशे, हजारच्या नोटा कचऱ्यात पडत होत्या, पण शंभरची नोट त्याच आन,बान अन शानने जगत होती.

व्यवहार सुरळीत करण्यासाठी एकटी खिंड लढवत होती. हे सर्व घडत असताना आपल्याला लहानपणचं गाणं आठवत होतं. 

हाताची घडी, तोंडावर बोट, पप्पांच्या खिश्यात शंभरची नोट.

शंभरच्या नोटेबद्दल रोमॅन्टिक होण्याचं  नेमकं कारण म्हणजे शंभरची नोट देखील आता आपलं  नवं रुप घेऊन येणार आहे. हरी पत्ती आत्ता जांभळी होणार आहे. फक्त या नोटेत देखील चीप नसणार आहे. या नोटेसाठी देखील ATM मशीन्समध्ये सेटिंग्स बदलले जाणार आहेत. रिजर्व बँकेनचं तसं सांगितलंय. 

नव्या नोटेबद्दल नवा रोमॅन्टिकपणा मार्केटमध्ये येईलच, पण जूनी नोट शहिद होण्यापुर्वी आपण जाणुन घेऊयात शंभरच्या नोटेचे हे शंभरनंबरी किस्से.

भारतातील चलनी नोटांचा इतिहास बघायला गेलं तर आपल्याला अशी माहिती सापडते की भारतातील  पहिली नोट ३ सप्टेंबर १८१२ रोजी ‘बँक ऑफ बंगाल’कडून छापण्यात आली होती. ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ आणि ‘जनरल बँक ऑफ बंगाल अँड बिहार’ यांच्या माध्यमातून देखील नोटा जारी करण्यात येत होत्या.

स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिली शंभर रुपयांची नोट

100 king george
Twitter

स्वातंत्र्यपूर्व काळात १९३५ सालापर्यंत भारतात नोटांच्या छपाइचे सर्वाधिकार ब्रिटीश सरकारकडे होते. १८६१ सालच्या ‘द पेपर करन्सी अॅक्ट’ कायद्यानुसार इंग्लंडच्या राणीचा फोटो असलेल्या नोटा ‘बँक ऑफ इंग्लंड’ द्वारे भारतात सुरु करण्यात आल्या होत्या. १९२३ साली ‘पंचम जॉर्ज’चे छायाचित्र असणाऱ्या एक, सव्वा दोन, पाच, दहा,पन्नास, शंभर आणि हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या.

100 bank of bengol
Twitter

भारतीय नोटा छापण्याचे अधिकार ब्रिटीशांकडे असताना शंभर रुपयांची पहिली नोट नक्की कधी छापली गेली याविषयीची अचूक आणि खात्रीशीर माहिती मिळत नसली तरी ती ‘बँक ऑफ इंग्लंड’कडून छापण्यात आली होती, असं मानलं जातं. ‘बँक ऑफ बंगाल’कडून छापण्यात आलेली १०० रुपयांची नोट उपलब्ध असली तरी तीचं निश्चित असं सालं मात्र सापडत नाही.

१९३५ साली ‘रिजर्व बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाल्यानंतर भारतीय नोटा छापण्याचे अधिकार रिजर्व बँकेकडे आले. १९३८ साली सर्वप्रथम रिजर्व बँकेकडून १०० रुपयांची नोट जारी करण्यात आली. त्यावर रिजर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स टेलर यांची सही होती.

स्वातंत्र्य भारतातील पहिली १०० रुपयांची नोट

स्वातंत्र्य भारतातील १०० रुपयांची पहिली नोट जानेवारी १९५० साली छापण्यात आली. त्यावेळी सर बेनेगल रामा राव हे रिजर्व बँकेचे गव्हर्नर होते. या नोटेवर अशोकस्तंभाचा फोटो होता आणि भारतातील ६ भाषांमध्ये नोटेची किंमत छापण्यात आली होती.

डिसेंबर १९६० साली गव्हर्नर एच.व्ही.आर.अय्यंगर यांच्या कार्यकाळात नोटेत थोडे बदल करण्यात येऊन १३ भाषांमध्ये नोटेची किंमत छापली जाऊ लागली. १९६७ साली सर्वप्रथम नोटेचा आकार कमी करण्यात आला. २ ऑक्टोबर १९६९ रोजी महात्मा गांधीजींच्या जन्मदिनी जारी करण्यात आलेल्या नोटेच्या नवीन डिझाईनमध्ये सेवाग्राम आश्रमात बसलेले गांधीजी १०० रुपयांच्या नोटेवर झळकले.

100 gandhi 1969
Twitter

१०० नोटेच्या डिझाईनमध्ये झालेला सर्वात मोठा बदल १९९६ साली करण्यात आला. डॉ. सी.रंगाराजन हे गव्हर्नर असताना रिजर्व बँकेकडून ‘महात्मा गांधी सिरीज’ सुरु करण्यात आली. १०० च्या नोटेसह इतर चलनी नोटांवर सद्यस्थितीत असलेले महात्मा गांधी छापण्यात आले.

सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी १०० रुपयांची नोट ही याच सिरीजमधली आहे. देशातील १५ भाषांमध्ये नोटेची किंमत छापण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या असून अंध व्यक्तीना देखील नोट ओळखता यावी म्हणून ब्रेल लिपीत देखील नोटेवर किंमत छापण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.