मतदानावेळी बोटांना लावण्यात येणाऱ्या शाई मागे देखील इतिहास आहे.

पुरावा काय? हल्ली प्रत्येक गोष्टीला पुरावा द्यावा लागतो. त्याच मुख्य कारण फोटोशॉपचा उदय. म्हणजे फोटोशॉपचा उदय या नावाखाली आम्ही तासभर भाषण ठोकू शकतो पण आजचा विषय तो नाही विषय आहे पुरव्यांचा.

माणसाला प्रत्येक गोष्टीचे पुरावे लागतात. आणि कुणीतरी म्हणलंच आहे लोक जशी असतात तसच सरकार असत. साहजिक सरकारला पण पुरावा पाहिजे असतो. याच पुराव्यांच्या भल्यामोठ्या प्रकारातला सर्वात मोठ्ठा पुरावा म्हणजे तू मतदान केलस का नाही? हे दाखवणारा पुरावा, अर्थात आपल्या बोटावरची शाई.

बोटावरची शाई हा लोकशाही देशात मतदान केल्याचा सर्वात मोठ्ठा पुरावा. पण आमच्या मनात विचार आला, हा पुरावा म्हणून कधीपासून ग्राह्य धरण्यात आला असेल. चांगली महिन्याभर दिवसरात्र अंघोळ केली तरी बोटावरची न जाणारी शाई कुठली कंपनी करत असेल?

मोकळ्या वेळात असे प्रश्न पडले की आम्ही उत्तर शोधतो आणि बोलभिडूच्या वाचकांना त्या गोष्टी सांगतो, तर आजचा विषय हाच की शाई नेमकी कोणची? 

भारतात पहिली निवडणूक झाली ती 1952 ला, त्यावेळी एकूण 17 कोटी 30 लाख मतदार होते. मतदानासाठी इतक्याच मोठ्या संख्येत असणाऱ्या लोकांची सोय पहिल्यांदा करण्यात येणार होती. बॅलेट पेपर, पोलिंग बूथ, बॅलेट बॉक्स इत्यादी गोष्टींची गरज होतीच पण या सगळ्यात एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा होता तो म्हणजे खोटं मतदान किंवा डब्बल मतदान टाळण्यासाठी काय उपाय करावा ही? (बघा लोकशाही देशात पहिल्यांदा मतदान करताना देखील लोकं डब्बल मतदान करतील अशी भिती प्रशासनाला वाटतं होती)

तेव्हा निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते सुकुमार सेन. त्यांनी या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मतदारांच्या बोटाला चांगली महिनाभर टिकेल अशी शाई लावण्याचा विचार केला. ही शाई सेमी परमनंट डाय पासून बनवलेली होती. त्यामुळे ती किमान 15 दिवस तरी मतदाराच्या बोटावर टिकणार होती. पण मॅटर असा होता की, हि शाई फक्त इटलीतच तयार होत होती. आत्ता त्या काळात इटलीवर काही आणायचं म्हणजे अशक्य होतं. म्हणून भारतातच त्यावर प्रयोग करण्याचा विचार आपल्या शासकिय पातळीवर घेण्यात आला.

अनेक प्रयत्न केल्यानंतर शेवटी नॅशनल फिजिकल लॅब्रोट्री मधल्या एका शास्त्रज्ञाने या शाईची यशस्वी निर्मिती केली. त्याने निर्माण केलेल्या या शाईत केमिकल, रंग आणि सिल्व्हर नायट्रेट होतं. हे मिश्रण जेव्हा आपल्या त्वचेला स्पर्श करत असे तेव्हा सिल्व्हर नायट्रेटच रुपांतर सिल्व्हर क्लोराइड मध्ये होत असायचं. सिल्व्हर क्लोराइड पाण्याने धूतलं जात नसल्याने ते जास्तकाळ टिकायचं.

त्यामुळे ही शाई अधिक परिणामकारक ठरणार होती.

1952 च्या निवडणुकीत पहिल्यांदा या शाईचा उपयोग करण्यात आला आणि तेव्हा एकूण या शाईच्या 3,89,816 बाटल्या लागल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे.

शाई ऐवजी लसीचा वापर.

त्यानंतर पुढील निवडणुकीत मतदाराच्या हातात बॅलेट पेपर देण्यापूर्वीच त्याला देव रोगाची लस देण्याचा सामाजिक सल्ला कोणत्यातरी अतरंगी माणसाने दिला. तशी हि गोष्ट चांगलीच होती पण इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य अधिकाऱ्यांची सोय करण भारताला तेव्हा तरी परवडण्यासारखं नव्हतं. साहजिक हा निर्णय हळुच कुलूपबंद करण्यात आला.

त्यानंतर 1962 साली नॅशनल फिजिकल लॅब्रोट्रिने मैसूरच्या एका कंपनीला ही शाई बनविण्याचे लायसन्स देऊन टाकले. या कंपनीची स्थापना 1937 मध्ये जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्या चौथ्या कृष्णराज वडियार या राजाने केली होती. या कंपनीच नाव होतं “मैसूर पेंट्स”.

या कंपनीने 1962 साली या शाईच्या 3,72,923 बाटल्या तयार करून देशभरातील सगळ्या राज्यात पाठवल्या होत्या. नंतरच्या काळात शाई आणि मैसूर पेंट्स हे समीकरण मात्र दृढ झालं. 

आत्ता इलेक्शन काळ सोडून कधी हि शाई वापरण्यात आली होती का? असा प्रश्न पडला तर उत्तर मिळत होय. नोटबंदीच्या काळात हि शाई वापरण्यात आली होती. या शाईचा उपयोग निवडणुक आयोग सोडून इतर कोणी करण्याच भाग्य RBI ला मिळालं होतं.

आत्ता शेवटचा मुद्दा या 10 मिलीलीटरच्या एका बॉटल मध्ये किमान 800 मतदारांच्या बोटावर मतदान केल्याची खूण करणे शक्य असल्याच सांगण्यात येतं. आज मैसूर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड ह्या दोन्ही कंपन्या अशा प्रकारची शाई तयार करण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत, आणि त्या जगातील जवळ जवळ 35 देशांना ही शाई पुरवतात.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.