आयपीएलच्या टीमची भांडणं नको, पिढ्यानपिढ्या एकच स्वाभिमान ‘टीम इंडियाची निळी जर्सी’
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं एंट्री मारली. पण त्यांना प्लेऑफमध्ये येता आलं कारण, मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. या मॅचसाठी जेवढा उत्साह मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्हता, तेवढा बँगलोरच्या भिडूंमध्ये होता.
इतकंच नाही तर, ‘फाफ डू प्लेसिसनं स्वतःसोबतच विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मुंबईची जर्सी घातलेले फोटो आपल्याला पाठवले,’ असं मुंबईचा टीम डेव्हिड म्हणाला. याच्यावरून फॅन लोकांमध्ये लई राडा झाला, मुंबईवाल्यांनी या जर्सी प्रकरणावरुन बँगलोरवाल्यांना बेक्कार ट्रोल केलं.
आयपीएलची भांडणं काय तशी होत राहतात, पण पिढ्यापिढ्यांचा स्वाभिमान एकच असतोय… ‘भारताची निळी जर्सी’
म्हणून म्हणलं तुम्हाला जरा जर्स्यांचा इतिहास सांगावा.
१. पांढरा गणवेश
सुरुवातीला कसोटी आणि वनडे क्रिकेट रेड बॉलवरच खेळलं जायचं. त्यामुळं फक्त भारतच नाही तर सगळ्याच क्रिकेट टीम पांढऱ्या कपड्यात खेळायच्या. पहिले तीन वर्ल्डकपही पांढऱ्या कपड्यातच झाले. त्याकाळी प्लेअर्सच्या जर्सीपेक्षा स्वेटर आणि ब्लेझरची क्रेझ जास्त होती.
२. ऑडी, शास्त्री आणि रंगीत कपडे
ऑस्ट्रेलियानं जगाला रंगीत क्रिकेट जर्स्यांची ओळख करून दिली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९८५ च्या ‘बेन्सन अँड हेजेस कप’ मध्ये टीमा पहिल्यांदाच रंगीत जर्सी घालून उतरल्या. भारताची जर्सी निळ्या आणि पिवळ्या रंगांचं मिश्रण होती. आकाशी निळ्या रंगावर पिवळी कॉलर आणि पिवळा पट्टा होता. या जर्सीवर देश, बीसीसीआय, स्पॉन्सर्स या कुणाचंच नाव नव्हतं, इतकंच काय प्लेअर्सचीही नावं नव्हती. ही जर्सी लक्षात राहण्याचं आणखी एक कारण म्हणजे भारतानं फायनल मारली आणि रवी शास्त्रीनं जिंकलेल्या ऑडीमधून चक्कर मारली.
३. रेट्रो लव्ह १९९२
यावर्षी पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप रंगीत जर्सी घालून खेळवला गेला. सगळ्या टीम्सच्या जर्स्या एकाच पॅटर्नमध्ये होत्या. खांद्यांवर निळी, हिरवी, लाल, पांढरी पट्टी आणि त्याखाली जर्सीचे वेगवेगळे रंग. भारताची ही डार्क निळी जर्सी आजही अनेक लोकांची फेव्हरिट आहे. हिची लोकप्रियता इतकी होती की, २०२० मध्ये भारतानं पुन्हा एकदा ही जर्सी वापरली.
४. नादखुळा- पिवळा निळा
वर्ल्डकपनंतरची साधारण चार वर्षं भारतानं जर्सीत लय प्रयोग करून पहिले. या रंगात दुसरा पॅटर्न दाखवा किंवा या पॅटर्नमध्ये दुसरा रंग दाखवा असं जर्सीबाबतचं धोरण होतं. पिवळा आणि निळ्या कलरमध्ये हे कॉम्बिनेशन खेळत राहिलं. हीच जर्सी घालून तेंडुलकर पहिल्यांदा ओपनिंगला आला, आणि ‘हे पोरगं लई हाणतं’ असं सगळ्या टीमांचं मत पडलं. १९९५ मध्ये भारताच्या जर्सीवर तिरंगा आला. न्यूझीलंडमध्ये झालेल्या चौरंगी मालिकेत निळ्या जर्सीवर तिरंगा आणि बाहीवर अशोक चक्र अशी जर्सी घालून टीम इंडिया खेळली.
५. प्रसादचा बोल्ड अन् कांबळीचे अश्रू, अर्थात वर्ल्डकप १९९६
भारतात झालेला हा वर्ल्डकप दोन गोष्टींमुळं लक्षात राहतो. पहिलं म्हणजे हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान मॅचमध्ये आमिर सोहेल आपल्या व्यंकटेश प्रसादला जरा आगाऊ बोल्ला. प्रसादनं पुढच्याच बॉलवर त्याला बोल्ड करत करेक्ट कार्यक्रम केला.
भारत सेमीफायनल हारायला लागल्यावर ईडन गार्डन्समध्ये लोकांनी पार जाळपोळ सुरू केली आणि सामना लंकेला बहाल झाला. विनोद कांबळी डोळे पुसत पॅव्हेलियनकडे यायला लागला आणि पिवळे आणि सप्तरंगी बाण असलेली त्याची निळी जर्सी कायम लक्षात राहिली.
६. विल्सचा विषय
भारताच्या जर्सीवर ठळक अक्षरात स्पॉन्सर्सचं नाव दिसू लागलं ते १९९८ मधल्या कोकाकोला कपच्या वेळेस. तेंडल्यानं रेतीच्या वादळाला फाट्यावर मारत शेन वॉर्नला त्याची स्वप्नं खराब करेपर्यंत हाणला. तेव्हा त्यानं दोन्ही खांद्यांवर तिरंग्याचं डिझाईन असलेली लाईट ब्लू कलरची जर्सी घातली होती. या जर्सीच्या उजव्या बाजूला अशोकचक्र होतं आणि डाव्या बाजूला ‘विल्स’चा लोगो.
पुढच्या वर्षी भारताचं वर्ल्डकप कॅम्पेन काय खास गेलं नाही. आधीच्या वर्ल्डकप जर्सीमध्ये बाण गोलाकार करून आणि छातीपाशी काळी बॉर्डर घेऊन नवी जर्सी तयार करण्यात आली. एकमेव मोठा बदल म्हणजे या स्पर्धेपासून प्लेअर्सच्या नावाबरोबरच जर्सी नंबरही वापरले जाऊ लागले.
८. नाईन्टीजच्या पोरांचं पहिलं प्रेम
मॅच फिक्सिंगच्या जाळ्यातून टीमला बाहेर काढत दादा गांगुलीनं ‘ये नया इंडिया है’ म्हणायला सुरुवात केली होती. शपथ घेऊन सांगतो त्या इंडियन टीमला जितकं प्रेम मिळालं तितकं कुठल्याच टीमला मिळत नसतंय.
या प्रेमामागं गांगुली, कैफ, युवराज, झहीर असले प्लेअर्स होतेच, पण भारताची विषय खोल जर्सीही होती.
निळ्या रंगाचा टीशर्ट, मधोमध तिरंग्याचे फटकारे, त्यावर लिहिलेली ‘INDIA’ ही अक्षरं आणि सहाराचं नाव. सच्चा क्रिकेट फॅन ही जर्सी जन्मात विसरु शकणार नाही.
९. लांब केसाचा धोनी आणि वर्ल्डकप २००७
आकाशी निळा रंग आणि उजव्या बाजूला तिरंगी पट्टा असं साधंसोपं स्वरूप या जर्सीचं होतं. यावर्षी दोन वर्ल्डकप खेळवण्यात आले. वनडे वर्ल्डकमध्ये भारत साखळीत गारद झाला आणि प्लेअर्सच्या पोस्टर आणि घरांना दगड आणि चपलांची भेट मिळाली. ही जर्सीच पनौती आहे म्हणत फिक्स बाद ठरणार होती. तेवढ्यात धोनीसेनेनं टी२० वर्ल्डकप जिंकला आणि प्लेअर्सच्या घरांवर दगडांऐवजी गुलाब बरसू लागले. पुढं याच जर्सीत थोडे डार्क कलर आले, पण शिक्का बसला तो टी२० वर्ल्डकपचाच.
१०. वर्ल्डकप २०११ – नादच केलाय थेट
साधी, सुंदर आणि लक्षात राहणारी जर्सी म्हणजे २०११ च्या वर्ल्डकपची. दोन्ही बाजूनी बारक्या केशरी पांढऱ्या पट्ट्या आणि मधोमध ‘INDIA’ हे नाव. सचिनला खांद्यावर घेऊन मारलेला राऊंड, युवराजची जिगर, धोनीचा सिक्स अशा लय ग्लोरियस गोष्टी असल्या, तरी ही जर्सी म्हणलं की एकच प्लेअर आठवतो.
रनआऊट व्हायचं वाचवताना मारलेल्या डाईव्हमुळं जर्सीला माती लागलेला गौतम गंभीर!
११. तीन वर्ष, तीन जर्स्या
भारतानं पुन्हा याच रंगात दुसरा पॅटर्न ही स्कीम आणली. २०१४ आणि २०१६ चे टी२० वर्ल्डकप आणि २०१५ चा वनडे वर्ल्डकप या तिन्ही स्पर्धांसाठी वेगळ्या जर्स्या होत्या. नशीब कशी गोष्ट असते पाहा, यातल्या दोन स्पर्धांमध्ये भारत सेमीफायनलमध्ये हरला, तर २०१४ च्या वर्ल्डकपला फायनलमध्ये माती झाली.
१२. नवा स्पॉनर, तोच पॅटर्न
इंडियन टीमला २०१७ मध्ये नवा स्पॉनर मिळाला, तो म्हणजे ओप्पो. साहजिकच जर्सीही नवीन आली. पण त्यात फारसे बदल झाले नाहीत. पोटावरच्या भागाला डार्क निळा आणि पाठीमागं थोडा फेंट रंग असं लय डोकेबाजी न करता बनवलेली ही जर्सी, होती मात्र एक नंबर. २०१९ च्या वर्ल्डकपमध्येही भारतानं हीच जर्सी घातली, फक्त ओप्पोचा लोगो गायब होता.
वर्ल्डकप दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारतानं भगवा रंग असलेली जर्सी घातली, पण ती पेट्रोल पंपवाल्यांसारखी दिसत होती असं आम्ही नाय सोशल मीडियावरची लोकं म्हणत होती.
१३. बिलियन चिअर्स
भारताला एमपीएल स्पोर्ट्स आणि बायजूस हे नवे स्पॉनर्स मिळाले आणि अंगापेक्षा भोंगा मोठा अशी गत झाली. स्पॉनर्सच्या नावापुढं ‘INDIA’ हे नाव छोटं दिसायला लागलं. सोशल मीडियावर ट्रोलर्स भिडले आणि सूत्रं हलली. आता ‘INDIA’ हे नावही ठळक दिसतं. चाहत्यांनी केलेल्या जल्लोषाच्या साऊंडव्हेव्सचं प्रतीक असं स्पष्टीकरण देत २०२१ च्या टी२० वर्ल्डकपसाठीची नवी जर्सी लाँच करण्यात आलीये. आत ती काही लोकांना आवडली, तर काही लोकांना नाय. प्लेअर्सला आवडली म्हणजे झालं.
तुम्हाला सांगतो भिडू लोक, आयपीएलच्या टीमच्या जर्सी २००-३०० रुपयात मिळतील, वर्षभर घालून लोकं त्यांचं पायपुसणं करतील. पण इंडियाची जर्सी भले रस्ताच्या कडेला मिळो किंवा महागड्या शोरुममध्ये, अंगात घातली की वेगळीच ऊर्जा संचारते आणि आपलीपूर्ण न झालेली स्वप्न अलगद आठवतात…
हे हि वाच भिडू:
- क्रिकेट मध्ये खेळाडुंचा जर्सी नंबर कोण आणि कस ठरवतं ?
- हा भिडू सारखं सारखं क्रिकेटच्या मैदानात का घुसतो ?
- भारताचा कॅप्टन असतानाही मोहम्मद अझरुद्दीनने बँकेतले नोकरी सोडली नव्हती