काय आहे कार्ले भाजे लेण्यांचा इतिहास.

पावसाळा सुरु झाला की आपल्या निसर्गभ्रमंतीच्या वाऱ्या वाढायला लागतात. ‘मुंबई-पुणे’ महामार्गावरील भाजा लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत या काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळते. पण या लेण्यांना भेट देणाऱ्या बहुतेकांना लेण्यांच्या अतिशय पुरातन अशा इतिहासाबद्दल कितीशी माहिती असते याबद्दल बरिच शंका आहे.

आज आपण ज्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करतो तो साधारणतः २००० वर्षांपूर्वी एक व्यापारी मार्ग होता ज्यामुळे दख्खनचं पठार आणि कोकण किनारपट्टीचा प्रदेश जोडला जात असे.

हा व्यापारी मार्ग असल्यामुळेच या मार्गावर आपल्याला खडकातून कोरलेल्या अनेक लेण्या बघायला मिळतात. या मार्गावरून प्रवास करणारे व्यापारी हेच या लेण्यांचे मोठे आश्रयदाते होते. त्यांच्या मदतीतुनच या लेण्यांचं काम मोठ्या प्रमाणात मार्गी लागू शकलं.

लोणावळ्याच्या आसपास भाजे गावानजीक आपल्याला २२ बौद्ध लेण्या बघायला मिळतात. याच भाजे लेण्या होत. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात या लेण्या कोरण्यास सुरुवात झाली, ज्यांच्या निर्मितीची प्रक्रिया पुढे ८०० वर्षे चालून इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेण्याच काम पूर्ण झालं.

या लेण्या पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन लेण्या असल्याचं देखील सांगण्यात येतं. भाजे लेण्यातील चैत्यगृह अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण आहे. हे एक प्रार्थनागृह असून या चैत्यागृहाला २७ खांब आहेत. या खांबांवर लाकडी तुळयांच्या सहाय्याने अप्रतिम छत तयार करण्यात आलंय. बौद्ध भिक्खूंनी साधारणतः २२०० वर्षांपूर्वी हे छत बनविले असल्याचं सांगण्यात येतं. साधारणतः २२०० वर्षांपूर्वी करण्यात आलेलं हे लाकूडकाम अजून देखील सुस्थितीत आहे.

इतक्या दीर्घकाळ टिकलेलं हे अशा प्रकारचं बहुतेक एकमेव उदाहरण असावं.

social media

चैत्यगृहाला लागूनच ११ बौद्ध विहार आहेत. बौद्ध भिक्खुंना राहण्यासाठी या विहारांची निर्मिती करण्यात आलेली आहे. विहारांचं काम अतिशय आकर्षक असून बाजूलाच पिण्याचे पाणी साठवण्यासाठी टाक्या देखील आहेत. त्याकाळातील बौद्ध भिक्खुंना पिण्यासाठी स्वच्छ पाणी साठवता यावं यादृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. लेण्यांच्या निर्मितीच्या दृष्टीने अनेक लोकांनी दान केलेलं आहे. या दानशूर लोकांच्या दातृत्वाचा उल्लेख देखील येथील शिलालेखांमध्ये बघायला मिळतो.

अशाच एका ब्राह्मी शिलालेखानुसार महारथी कोसिकीपुता विह्णुदत्त याने पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी दान दिल्याचा उल्लेख बघायला मिळतो. आता हा महारथी कोसिकीपुता विह्णुदत्त नेमका कोण असावा याबद्दल नक्की काही सांगता येत नाही पण ऐतिहासिक तथ्यांनुसार इसवी सन पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकात महाराष्ट्रातील बहुतेक प्रदेशावर ‘महारथी’ लोकांचं राज्य होतं. त्यावरून असा कयास बांधला जाऊ शकतो की हा त्यांच्यापैकीच एक असू शकतो.

social media

अठराव्या लेणीत एक देखावा कोरण्यात आलेला आहे. चार घोड्यांच्या रथावर स्वार होऊन कुठलीतरी देवता चाललेली दिसते. या रथात २ महिला देखील आहेत, त्याच्या डाव्या बाजूला हत्तीवर स्वार झालेली एक देवता बघायला मिळते. आता या २ देवता नक्की कोण याबाबतीत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.

काही इतिहासकारांच्या मते ही इंद्रदेवता आहे तर काही इतिहासकरांच्या मते ही सूर्यदेवता आहे.

लेण्यांच्या निर्मितीसाठी व्यापाऱ्यांनी मदत का केली ..?

आधी उल्लेख केला त्याप्रमाणे हा एक व्यापारी मार्ग होता आणि मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची या मार्गावर वर्दळ असे. या मार्गातून जाताना आपली  आणि आपल्या मौल्यवान सामानाची व्यापाऱ्यांना कायमच काळजी असे.

कारण जंगली प्राणी आणि लुटारूंच्या टोळ्यांपासून त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता खूपच जास्त होती. व्यापाऱ्यांची अशी श्रद्धा होती की बुद्ध भिक्खू जी प्रार्थना करतात त्यामुळे त्त्यांच्या जीविताचं आणि मुद्देमालाचं संरक्षण होतं आणि त्यामुळेच हे व्यापारी लेण्यांच्या आणि मठाच्या निर्मितीसाठी मदत करत असत.

Leave A Reply

Your email address will not be published.