अयोद्धा झाली काशी चालू आहे, जाणून घ्या आत्ता मथुरेचं प्रकरण काय आहे…

देशातल्या मंदिर-मस्जिदीच्या राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली आहे. अयोध्येचा वाद निवळल्यानंतर  काशीतल्या ज्ञानवापी मशिदीवरून वातावरण तापलंय. लोकल कोर्टाने व्हिडिओ सर्वेक्षणात ज्ञानवापी मस्जिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यानंतर मस्जिदिचा तो भाग सील करण्याचे आदेश दिले आहेत.

आता या वादात भर पडली आहे मथुरा येथील शाही ईदगाहची. 

शाही ईदगाहच्या मशिदीच्या ठिकाणी यापूर्वी श्रीकृष्णाचं मंदिर होतं त्यामुळे मशीद हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.  याआधी प्लेसिस ऑफ वर्शीप ऍक्ट १९९२चा आधार घेत ऑक्टोबर २०२० मध्ये मशीद पाडण्याची याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली होती.

आता मथुरा जिल्हा न्यायालयाने ईदगाहच्या वादावरील केस चालू करण्यास परवानगी दिली आहे.

त्यामुळं आता मस्जिद-मंदिर वादाचा अजून एक खटला न्यायालयात उभा राहणार आहे.

त्यामुळं हा वाद नेमका काय आहे हे एकदा बघू ?

भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेली मथुरा हिंदूंसाठी एक पवित्रस्थळ आहे. मथुरेतील परिसरात श्री कृष्ण जन्मस्थान संकुलात अनेक प्राचीन मंदिरं आहेत आणि याच बाजूलाच लागून  शाही ईदगाह मशिद आहे. या पूर्ण संकुलाचा एरिया १३.३७ आकार असल्याचा सांगितला जातो. 

हिंदू पक्षाचा नेहमीच हा दावा राहिला आहे की हि सर्व जमीन श्रीकृष्ण जन्मस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे आणि ईदगाह मशीद अनधिरकृत आहे. 

तर याला दुसरी बाजू अशी आहे की  १२ ऑक्टोबर १९६८ रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला. यामध्ये मंदिर आणि मशीद दोन्ही १३.३७ एकर जागेवर राहतील असा निर्णय घेण्यात आला. मात्र श्री कृष्ण जन्मस्थान ट्रस्टला हा करार मान्य नाहीये त्यामुळेच त्यांनी न्यायालयाचे वारंवार दरवाजे ठोठवले आहेत आणि आता हीच केस कोर्टाने दाखल करून घेतली आहे.

मात्र ही जमीन ट्रस्टकडे कशी आली आणि मेन म्हणजे मथुरेतल्या श्रीकृष्णाच्या मंदिराच्या ठिकाणीच ईदगाह मशीद बांधण्यात आली होती का हे पाहण्यासाठी आपल्याला इतिहासात अजून मागे जावं लागेल.

मथुरा हे श्रीकृष्णाची भूमी असल्याचे पुरावे अगदी प्राचीन काळापासून सापडतात. अगदी शक आणि कुशाण राजांच्या काळात तिथं भगवतवाद किंवा कृष्णाची वासुदेव म्हणून पूजा झाली याचे संदर्भ मिळतात. त्याचबरोबर मथुरेत उभ्या असलेल्या भव्य मंदिराचे अनेक तपशीलवार वर्णनं देखील इतिहासात सापडतात.

१६५० मध्ये मथुरेला भेट देणारा फ्रेंच व्यापारी आणि ज्वेलर जीन बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर याने मंदिराची तपशीलवार माहिती दिली आहे.

Les Six Voyages de Jean-Baptiste Tavernier (1676) नावाच्या त्याच्या प्रवासवर्णनात टॅव्हर्नियर लिहतो :

”पुरी येथील जगन्नाथ आणि बनारस  या मंदिरांनंतर सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे आग्रा ते दिल्लीच्या रस्त्याने सुमारे १८ कोस अंतरावर असलेलं मथुरा.हे मंदिर एवढ्या मोठ्या आकाराचे आहे की ते पाच किंवा सहा कोसावरूनही दिसू शकते. इमारत अतिशय उंच आणि अतिशय भव्य आहे. त्यात वापरलेला दगड लालसर रंगाचा आहे जो आग्रा जवळील एका मोठ्या खदानीतून आणलेला आहे.  पॅगोडाला फक्त एकच प्रवेशद्वार आहे, जे खूप उंच आहे, त्याच्या दोन्ही बाजूला अनेक स्तंभ आणि माणसांच्या आणि प्राण्यांच्या प्रतिमा आहेत…”

मुख्य मूर्तीचे वर्णन करताना टॅव्हर्नियर लिहतो

“ मूर्तीचे केवळ डोके दिसत होते आणि ते अगदी कृष्णवर्णीय आणि  संगमरवरी आहे. डोळ्यांसाठी दोन माणिक आहेत. मानेपासून पायापर्यंत संपूर्ण शरीर लाल मखमलीच्या नक्षीकामाच्या झग्याने झाकलेले होते आणि मूर्तीचे हात दिसत नाहीत.”

 टॅव्हर्नियरने हे वर्णन केलं आहे त्याआधीच या मंदिराने एक विध्वंस पहिला होता.

त्यानंतर हे मंदिर पुन्हा उभा करण्यात आलं होतं. भव्य मंदिरे आणि श्रीमंत व्यापार्‍यांसाठी फेमस असलेल्या मथुरेच्या संपन्नतेची ख्याती जगभर पसरली होती. त्यामुळेच पहिल्यापासूनच परकीय आक्रमकांच्या टार्गेटवर मथुरा असायचची.

मथुरा शहराची आणि तिथल्या मंदिराची सर्वात मोठी लूट केली होती गझनीच्या सुलतान महमूदने.

१०१८-१९ मध्ये गझिनच्या सुलतानाने मोठ्या प्रमाणात मंदिराची नासधूस केली होती.

मथुरेतल्या  मंदिराला पाहून  सुलतान म्हणाला होता 

‘जर कोणाला अशी इमारत बांधायची असेल तर ते शक्यच नाही. एक लाख लाल दिनार खर्च करून आणि सर्वात अनुभवी आणि कुशल कामगारांना दोन तीनशे वर्षे कामाला लावल्याशिवाय हे शक्यच नाही’

गझनीच्या महमूदने लुटल्यानंतर हे शहर राष्ट्रकूटांच्या अधिपत्याखाली आले ज्यांनी शहराला पूर्वीचे वैभव परत मिळवून दिले. त्यानंतर १४ व्या शतकात सुलतान फिरोझशाह तुघलकाच्या आदेशानुसार आणि नंतर सुलतान सिकंदर लोदीच्या आदेशानुसार मथुरेतील मंदिरे पुन्हा नष्ट करण्यात आल्याचे संदर्भ सापडतात.

मात्र प्रत्येकवेळी मंदिराचं पुरुज्जीवन करण्यात आल्याचं दिसून येतं. मात्र १६७० मध्ये या मंदिरावर सर्वात मोठा आघात झाला. भारतात तेव्हा मुघलांचं राज्य होतं.

१६६९ मध्ये वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिर नष्ट करण्याचा आदेश दिल्यानंतर एकाच वर्षात औरंगजेबने मथुरेतलं मंदिर नष्ट करण्याचा आदेश दिला होता. 

औरंगजेबाच्या आदेशानंतर मथुरेतलं श्रीकृष्णाचं मंदिर जे केशवदेव मंदिर म्हणून ओळखलं जातं ते पाडण्यात आलं. केशवदेव मंदिराच्या विध्वंसानंतर त्या जागी शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. ईदगाह पारंपारिक मशीदीपेक्षा वेगळी असतात ईदच्या वेळी नमाज अदा करण्यासाठी ईदगाहचा वापर केला जातो.

विशेष म्हणजे मूळ मंदिराचा मंडप जिथं उभा होता तिथं ईदगाह बांधण्यात आली होती, तर गर्भगृह किंवा भगवान कृष्णाचा जिथं जन्म झाला होता असं मानण्यात येतं त्या स्थानाला धक्का लावण्यात आला नाही.

आताही तिथे ईदगाहच्या मागील भिंतीला लागून गर्भगृह मंदिर आहे.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तेव्हा उत्तर भारतात अनागोंदी माजली होती. दरम्यानच्या काळात पेशव्यांनी देखील मुघलांनी मथुरा, काशी आणि प्रयाग ही मराठ्यांना जहागीर म्ह्णून देण्याची मागणी केली होती मात्र ती मान्य करण्यात आली नाही.

दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर, १८०४ मध्ये मथुरा शहर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आली.

त्यांनी कटरा इथली जमीन जिथं ईदगाह मशीद आणि पूर्वी केशवदेव मंदिर होतं तिथली १४.३७ एकरची जमीन लिलावात काढली.

लिलावात ती जमीन उत्तरभारतातील सर्वात श्रीमंत बँकर राजा पटनिमल याने १,४१० रुपयांना विकत घेतली. त्याला तिथं केशवदेव मंदिराची पुनर्बांधणी करायची होती पण त्याला ते जमलं नाही. १९२०-३०च्याच दशकात राजा पटनिमलने घेतलेल्या जमिनीत शाही ईदगाह येतो कि नाही यावरून वाद निर्माण झाला होता.

पुढे १९४४मध्ये प्रसिद्ध उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी ती १३.३७ एकर जमीन राजा पटनिमल यांच्या वारसांकडून १३,४०० रुपयांना विकत घेतली. 

२१ फेब्रुवारी १९५१रोजी त्यांनी ही जमीन श्रीकृष्ण जन्मस्थान ट्रस्टला भगवान कृष्णाचं  मंदिर बांधण्यासाठी देऊन टाकली.जयदयाल दालमिया, हनुमान प्रसाद पोद्दार यांसारख्या अनेक मारवाडी उद्योगपतींनी निधी दिला आणि शाही ईदगाहच्या शेजारी एक मंदिर बांधले गेले, जे आज श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर परिसर म्हणून ओळखले जाते.

या संकुलातील सर्वात प्रमुख मंदिर आहे केशवदेव मंदिर ज्याला उद्योगपती रामकृष्ण दालमिया यांनी निधी दिला होता आणि १९५८ मध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं.

तसेच जमीनच्या मालकीमुळं होणारा वाद टाळण्यासाठी १२ ऑक्टोबर १९६८ रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही मस्जिद इदगाह ट्रस्टयांच्यात सामंजस्य करार झाला. या करारात ठरवण्यात आलं की त्या १३.३७ एकर जमिनीवर मंदिर आणि मस्जिद दोन्ही राहतील. त्यानुसार दोन्ही प्रार्थनास्थळांमध्ये बाऊंड्री ठरवण्यात आली.

श्रीकृष्ण जन्मस्थान ट्रस्टला हा समझोता मान्य नव्हता आणि त्याविरोधात ते कोर्टात गेले. मात्र प्लेसेस ऑफ वर्शीप ऍक्ट १९९२ ने ही केस तिथंच थांबली कारण या कायद्याने प्रार्थानास्थळांचा दर्जा बदलता येणार नव्हता.

त्यामुळं जमिनीच्या तुकड्याच्या वादामुळे ही केस वेगळी आहे.या केसची अजून एक  विशेषतः म्हणजे मथुरेचं मंदिर पाडून मशीद बांधल्याचे अनेक लिखित पुरावे मिळतात. त्यामुळं ही केस पुन्हा ओपन झाल्यानंतर याचा काय निर्णय येत हे येणाऱ्या काळातच कळेल. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.