भारतातल्या या राज्याची निर्मिती चक्क उंदरांमुळे करण्यात आली.

राज्याची स्थापना करायची म्हणल्यानंतर किती खस्ता खाव्या लागतात. एकतर आपल्या भाषेची अस्मिता पेटवां मग लोकांना संघटित करा त्यानंतर केंद्रशासनाकडे आपल्या स्वतंत्र राज्याचा मुद्दा उचलून धरा. एवढं सगळ करुन डाव लागलाच तर हातात तेलंगणा मिळतो आणि आयुष्याचा चंद्रशेखर राव होतो पण डाव गंडला तर अणे वकिल व्हायला वेळ लागत नाही. पण भारतात अस एक राज्य आहे ज्याची निर्मितीच मुळात उंदरांच्या कारनाम्यामुळे झाली आहे.

“मिझोराम”राज्यांची निर्मिती उंदरांमुळे झाली आहे.

मिझोराम हे भारत अन म्यानमार या देशांच्या सीमेवर वसलेलं राज्य असून या राज्याचा ३० % भूभाग हा बांबूंनी व्यापला आहे. मिझोराम राज्याच्या अर्थव्यवस्थेत बांबूचा सर्वात महत्वाचा रोल राहिला आहे. तर या बाबूंना दर ४८ वर्षांनी फुले येतात. त्याला मिझो भाषेत मौतम म्हणजे बांबूचा मृत्यू असे म्हणतात.

तर झालं अस भारताला स्वातंत्र्य मिळल्यानंतर ११ वर्षांनी म्हणजे १९५९ मध्ये बांबूना फुले आली. त्यामुळे या भागातील उंदरांची संख्या प्रचंड वाढली. या उंदरानी बांबूची फुले, बिया फस्त करून टाकल्या. हे केल्यावर त्यांनी  भातशेती अन लोकांच्या घराकडे मोर्चा वळवला अन लोकांना अन्नधान्याला महाग केले. एक तर बांबूही राहिले नाहित आणि बांबू संपल्यानंतर खाण्यासाठी अन्नधान्यही राहिलं नाही. यामुळेच मिझो टेकड्यामध्ये दुष्काळ पडला.

Screen Shot 2018 04 20 at 9.38.15 AM
उंदीर प्रकरण वाचत असताना बोअऱ होवू नये म्हणून मिझोराम राज्याचं प्रतिकात्मक चित्र.

तत्कालीन आसाम सरकारने या परिस्थितिचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात अपयश आले म्हणून पु लालडेंगा याने मिझो नॅशनल फॅमिन फ्रंट ची स्थापना केली. १९६१ मध्ये या संघटनेचे नामकरण मिझो नॅशनल फ्रंट असे करून स्वतंत्र मिझोराम राष्ट्राची मागणी केली या त्यासाठी सशस्त्र लढा उभारण्याची घोषणा केली. 1966 साली त्यांनी भारत सरकारविरुद्धच मोठा लढा उभारला पण त्यांना अपयश आले. त्यांनतर पुढची 20 वर्षे त्यांनी छुप्या पद्धतीने लढा चालू ठेवला.

भारत सरकारने काँग्रेसच्या थंडा करके खाओ या सूत्राने लालडेंगा याना चर्चेच्या टेबलवर आणले. भारतीय संविधानाच्या चौकटीत मिझो करार करण्यात आला. १९८६ रोजी करण्यात आलेल्या या कराराअंतर्गत मिझोराम हे नवीन राज्य घोषित करण्यात आले. त्यानंतर १९८७ च्या सार्वत्रिक निवडणुका होऊन लाल डेंगा यांच्या नेतृवाखाली मिझोराम सरकार अस्तिवात आलं.

आत्ता या लढ्याची मुळ प्रेरणा कोणती तर उंदीर. जर उंदीरांची संख्या वाढलीच नसती तर मिझोराममध्ये दूष्काळ पडला नसता. लालडेंगाना राज्य स्थापन करण्याची गरज निर्माण झाली नसती आणि पुढं जावून मिझोराम राज्याची स्थापना पण झाली नसती. बहूतेक उंदीर हा इतका कडक प्रकार असल्याची जाणिव झाल्यानच महाराष्ट्र शासनानं उंदीर मारण्यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असावीत.

  •  शेखर धायगुडे.
Leave A Reply

Your email address will not be published.