महात्मा गांधी, तेंडुलकर-कांबळीचा रेकॉर्ड ते मराठा मोर्चा : असा आहे आझाद मैदानचा इतिहास

शेती कायदे रद्द करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन होतं आहे. महाराष्ट्रातले शेतकरी आज मुंबईच्या या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे केंद्राच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे घटक पक्ष देखील पाठिंबा देणार आहेत.

खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

हे आंदोलन होणार आहेत ते ठिकाण आहे आझाद मैदान…

साहजिक असा प्रश्न पडतो की प्रत्येक ऐतिहासिक आंदोलन आझाद मैदानातच का होतात. आझाद मैदानाचा नेमका इतिहास काय आहे… 

आझाद मैदानावरच आंदोलन होण्यामागचं अगदी बेसिक कारण सांगायचं म्हणलं तर या मैदानाच स्थान. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून जवळ असणारं हे स्थान सर्वांना सोयीचं अस आहे.

मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी देखील अगदी एका टप्यात या ठिकाणी पोहचता येत. म्हणजे तुम्ही कोल्हापूरवरून येणार असाल तर महालक्ष्मी एक्सप्रेसने सकाळी CST ला उतरता आणि चालत चालतच आझाद मैदानावर पोहचता.

दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक ठिकाणी मुंबईच्या महत्वाच्या ठिकाणी आहे. मुंबई महानगरपालिकेपासून ते विधिमंडळ, मंत्रालय सारखी ठिकाणी जवळ असल्याने इथल्या घोषणा लवकर पोहचतात अस म्हणावं लागेल.

पण त्याहूनही महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आझाद मैदानाचा इतिहास..

आझाद मैदानची स्थापनेचा काळ १८७५ चा होता. त्याकाळी बॉम्बे जिमखान्याचं मैदान म्हणून हीच या मैदानाची स्थापनेची तारीख.  पूर्वीच्या काळी बॉम्बे जिमखाना मैदान म्हणून हे मैदान ओळखलं जातं असं. पण हे कागदोपत्री.

त्यापूर्वीच म्हणजेच १८०३ साली मुंबईत भीषण अग्नीतांडव झालं होतं. तेव्हा मुंबईसारख्या भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा आणि गजबजाटीचा विचार करुन दोन ठिकाणे मोकळी ठेवण्यात आली होती.

एस्प्लनेड ग्राऊंड आणि ओव्हल मैदान अशी ती दोन ठिकाणं

त्यापैकी एक असणारं एस्पनेड ग्राऊंड म्हणजेच आजचं आझाद मैदान.. 

मैदानाचा मुळ वापर क्रिकेट खेळण्यासाठीच व्हायचा. आजही क्रिकेट आणि मैदान हे समीकरण दृढ आहे. पण क्रिकेट सोबत इथे सरकारला जागवण्याचे प्रयत्न देखील केले जातात शिवाय हे मैदान आपल्या रक्तरंजीत इतिहासासाठी देखील प्रसिद्ध आहे.

यातलच पहिलं उदाहरण सांगायचं झालं तर , 

तोफेच्या तोंडी गेलेले १८५७ चे क्रांन्तीकारक..

१८ ऑक्टोबर १८५७ रोजी सय्यद हुसेन आणि मंगल गादिया या दोन क्रांतीकारकांना इंग्रजांनी आझाद मैदानावरच सार्वजनिकरीत्या तोफेच्या तोंडी दिलं होतं. १८५७ चा उठाव जरी अयशस्वी ठरला तरी या घटनेने इंग्रजी राजवटीचा भीषण चेहरा समोर आला. प्रामुख्याने उत्तर भारतातून सुरु झालेला हा उठावाचे लोन दक्षिण भारतात पोहचले होते. यातील दोन आंदोलकांना तोफेच्या तोंडी देवून भविष्यात असा उठाव होवू नये याची दक्षता ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीने घेतली होती.

आझाद मैदानावर तिरंगा फडकवण्यात आला.

१९३० साली देशात तिरंगा फडकवण्यावर बंदी होती. हा आदेश झुगारून २६ ऑक्टोंबर १९३० रोजी अवंतिकाबाई गोखले यांनी महिलांचा मोर्चा घेवून या आझाद मैदानावर गेल्या. पोलीस कमिशनरचा आदेश झुगारून त्यांनी तिरंगा फडकवला.

महात्मा गांधींच्या सभा..

१९३१ साली सविनय कायदेभंगाचा नारा याच आझाद मैदानातून देण्यात आला. नमक का कायदा तोड दो अशी घोषणा गांधींनी याच ठिकाणाहून दिली होती. स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक मोठ्या सभा याठिकाणी झाल्या. पैकी महात्मा गांधीच्या मुंबईत होणाऱ्या सभा या प्रामुख्याने आझाद मैदानावरच होत असत. त्या काळच्या जितक्या सर्वात मोठ्या राजकीय सभा झाल्या असतील त्यांचा इतिहास आझाद मैदानाशी निगडीत आहे.

राजकारणाचा दूसरी किस्सा सांगायचा झाला तर १९६९ साली कॉंग्रेसमध्ये फूट पडली. कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर इंदिरा कॉंग्रेसचं पहिलं अधिवेशन हे याच मैदानात झालं.

क्रिकेटचा विक्रम

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जोडीने ६६४ धावांची ऐतिहासिक पारी केली होती. ही भागीदारी त्यांनी याच मैदानावर केली. १९८७ च्या हॅरिस शिल्ड ट्रॉफीचा हा रेकॉर्ड. त्याचसोबत पृथ्वी शॉ ने ५४६ रन्सची इनिंग देखील याच मैदानावर खेळली.

त्यानंतरच्या काळात आझाद मैदान आणि आंदोलन हे समीकरण होत गेलं. २०१८ साली शेतकऱ्यांचा मोर्चा देखील याच मैदानात झाला होता. ९ ऑगस्ट २०१७ साली मुंबईच्या याच आझाद मैदानावर मराठा क्रांन्ती मोर्चा झाला होता. ११ ऑगस्ट २०१२ साली रझा अकादमीने घाललेला उच्छाद आणि गालबोट देखील इथलच.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.