बाजीराव पेशव्यांच्या शौर्यामुळे पाकिस्तानातल्या शहराच नाव “पेशावर” ठेवण्यात आलं..?
मध्यंतरी आम्हाला पवन हुंडूरगे नावाच्या भिडूने सवाल केला की बाजीरावाच्या पराक्रमामुळे पाकिस्तानात पेशावर असं नाव देण्यात आलं ही माहिती खरी आहे का?
तसं बघायला गेलं तर पेशावर महाराष्ट्रापासून जवळपास दोन हजार किलोमीटर लांब आहे. बाजीराव पेशवे महान होते पण एवढ्या दूर त्यांच सैन्य गेलं असण्याची शक्यता नाही. whatsapp युनिव्हर्सिटीचा मेसेज म्हणून सोडून द्याव असं म्हटल पण सहज शोधताना बरीच इंटरेस्टिंग माहिती कळाली.
पेशावर हे रेशीम मार्ग जाणाऱ्या खैबर खिंडीच्या मुखाशी वसलेलं गाव. ऐतिहासिक काळापासून व्यापार केंद्र. भारतात यायचं म्हणून निघालेला प्रत्येक प्रवासी, व्यापारी, लुटारू पहिलं पाउल याच गावात ठेवतो. म्हणूनच इथे सगळ्या वंशाचे लोक राहायचे. पहिल्या पासून हे गाव समृद्ध आहे. काश्मीर,अफगाणिस्तान, पंजाब अशा कित्येक प्रदेशांना हे गाव मध्यवर्ती आहे. अख्या भारताला वेढा घालणाऱ्या ग्रँड ट्रंक रोडची सुरवात इथूनच होते.
पण या गावाचा इतिहास खूप पुरातन आहे.
वैदिक काळात या भागाला पुष्कलावतीचे जनपद असे ओळखलं जाई. महाभारत काळात पेशावर असलेला पख्तूनवाला प्रदेश, अफगाणिस्तान या सगळ्या भागाला गांधार देश असं म्हणत. कौरवांची आई गांधारीचा जन्म याच राज्यात झाला. या राज्याची राजधानी होती पुरुषपूर म्हणजेच आत्ताचं पेशावर.
या गावावर अनेक राजांनी राज्य केलं. पार पारसी राजांपासून ते अलेक्झांडर पर्यंत पण गावातली लोकसंख्या मुख्यतः हिंदू आणि बौद्ध होती. इथला सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे इसवी सन पहिल्या शतकातला कनिश्क. त्याचा काळ पेशावरचा सुवर्णकाळ होता. त्याच्याकाळात बौद्ध स्तूप उभारण्यात आले होते जी त्याकाळची जगातली सर्वात उंच इमारत होती.
साधारण आठव्या नवव्या शतका पर्यंत इथे हीच परिस्थिती होती मात्र साधारण राजा जयपालच्या काळात अफगाणिस्तानमधून गझनीच्या मोहम्मदचा या समृद्ध गावावर डोळा गेला. त्याने जयपालचा पराभव तर केलाच पण याच गावातून त्याच्या लुटारू टोळीने भारतावर हल्ला केला. पार आग्र्यापर्यंत त्यांनी मजल मारली व लुट परत अफगाणिस्तानला नेली.
तिथून मात्र पायंडाच पडला. अनेक मध्यपुर्व देशातल्या वाळवंटातून अनेक टोळ्या या गावात उतरू लागल्या. लुटालुट रोजचीच होती. ही लुटालूट मुघलांच्या आगमनापर्यंत चालली.
मुघल बादशाह बाबर हा सुद्धा उझबेकिस्तानमधून आलेला लुटारुच होता मात्र त्याने भारतातच बस्तान मांडले. त्याने एक गोष्ट ध्यानात ठेवली, आपल्याप्रमाणे इतर कोणी आक्रमणकर्ता भारतात घुसू नये यासाठी वायव्य सरहद सांभाळायची. बाबरने या गावाचं नाव बेगराम ठेवलं होतं. त्याने इथला किल्ला मजबूत केला. हे शहर त्याने शेवटपर्यंत हातातून जाऊ दिल नाही.
पुढे हुमायून नंतर शहर शेरशहा सुरीच्या हातात गेले ज्याने ग्रांड ट्रंक रोडची निर्मिती केली. पण अकबराने हे गाव आणि भारताच सम्राटपद परत ताब्यात घेतलं. त्यानेही आजोबांप्रमाणे या गावाच्या संरक्षणावर विशेष लक्ष दिल. अकबरानेच बेगराम या गावाचं नाव पेशावर असे ठेवले.
पेशावर म्हणजे सरहद्दीचे गाव.
औरंगजेबानंतर भारतातली मुघल सत्ता मोडकळीस येत गेली. पेशावरवरील पकड सुद्धा ढिली झाली. याचा फायदा अफगानिस्तानचा राजा अहमदशाह दुराणी उर्फ अब्दाली याने घेतला.
अब्दालीने सर्वात प्रथम पेशावरमधून मुघलांना पळवून लावले. हळूहळू आपले राज्य लाहोरपर्यंत वाढवले. एवढेच नाही तर दिल्लीसुद्धा जिंकली. पण दिल्लीच राज्य मुघलांच्या हातात ठेवून भारतातून तो परत गेला. जाताना त्याने पेशावर आपल्या धाकट्या मुलाच्या ताब्यात दिल.
अहमदशाह अब्दालीने केलेला उत्तर भारतात केलेला प्रचंड गोंधळ, मंदिरांची लुटालूट, अयाबायांचे बलात्कार यामुळे वैतागून मुघल बादशाहने तेव्हा दक्षिणेत ताकदवान असणाऱ्या मराठा सत्तेपुढे मदतीचा हात मागितला.
तेव्हा पेशवाईच्या गादीवर असलेल्या नानासाहेब पेशव्यांनी आपला पराक्रमी भाऊ रघुनाथराव पेशवा याला प्रचंड सैन्य देऊन उत्तरेच्या कामगिरीवर पाठवले. त्याच्या सोबत मल्हारराव होळकर,मस्तानीचा सुपुत्र समशेर बहादूर असे मोठमोठे सरदार देखील होते.
आपल्या तुफान वेगासाठी सुप्रसिध्द असणाऱ्या मराठा घोडदळाने सर्वात आधी लाहोर सकट पंजाब जिंकून घेतला.
मग मुलतान, डेरा गाझी खान , काश्मीर आणि अखेर अटक अशी मजल मारली. अब्दालीच्या सैन्याला पार पेशावर पर्यंत दाबल. ८ मे १७५८. रघुनाथ रावांनी तुकोजी होळकरांना पेशावरच्या कामगिरीसाठी पाठवल. अब्दालीच्या मुलाला तैमुर शाह दुराणीला हरवून मराठ्यांनी पेशावरवर विजय मिळवला आणि त्याला अफगाणिस्तानला पळवून लावलं. भारताचं शेवटच टोक मराठ्यांच्या ताब्यात आलं होतं.
पण रघुनाथराव पेशव्यांनी या जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही. त्याला परत पुण्याला जाण्याची गडबड लागली होती. मल्हारराव होळकरांना देखील तिथे राहण्यात रस नव्हता. अखेर दत्ताजी शिंदेला पंजाब प्रांताचा सुभेदार करून ते परत दक्षिणेत गेले. दत्ताजी सुद्धा जास्त काळ तिथे टिकला नाही. त्याने साबोजी पाटील यांना पेशावरच्या किल्ल्याची जबाबदारी दिली.
पुढे जेव्हा जखमी अहमदशहा अब्दाली दुप्पट शक्तीने परत आला तेव्हा पेशावर सकट पंजाब प्रांतात त्याला थोपवून धरण्याची ताकद व जिद्द त्याकाळच्या मराठी सरदारांनी दाखवली नाही. पुढे पानिपतचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे.
याचाच अर्थ पेशावर वर मराठयांच राज्य होतं. भगवा जरी पटका पेशावरच्या किल्ल्यावर सुद्धा झळकला आहे पण त्या गावाचं नाव मात्र पेशव्यांच्या वरून ठेवलं गेलेलं नाही हे नक्की.
हे ही वाच भिडू.
- पेशवाई बुडण्यामागे म्हणे ही तांडव गणेशाची मूर्ती कारणीभूत होती !
- २००७ साली झाशीच्या राणीचे वारसदार इतिहासतज्ञाने शोधून काढले.
- पेशवे १६ लाखांच्या कर्जात होते तेव्हा नाना फडणवीसांकडे ९ कोटी रुपये होते.