पुण्यातल्या जगप्रसिद्ध पेठांचा इतिहास असा आहे…

पुणे, शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी जगभर ओळख. सोबतच या शहराने आपल्या जाज्वल्य इतिहासाने स्वतःची वेगळी ओळख तयार केली. इथलं खानपान, परंपरा हे सर्वच प्रसिद्ध झालं. आधुनिक काळात इथल्या पाट्यांनी इतिहास घडवला.

या शहराला जागतिक पातळीवर इथल्या आणखी एका खास गोष्टीने ओळख मिळवून दिली ते म्हणजे,

पुण्याच्या पेठा.

या विविध पेठांमुळेच जुन्या पुण्याची आपल्याला ओळख होती. तसेच इथल्या माणसांची देखील. आठवड्यांच्या वारांनुसार किंवा या पेठा ज्यांनी वसवल्या आहेत त्यांची नावं या पेठांना देण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला याच जगात ओळख मिळवून देणाऱ्या पेठांचा इतिहास सांगणार आहे.  

१)कसबा पेठ :

शिवाजी महाराज पुण्यात येईपर्यंत पुणे हे कसबा पेठेपर्यंत मर्यादित होतं. त्याकाळी या कसबा पेठेची अवस्था काहीशी खराबच होती. पुढे १६६२ साली छ. शिवाजी महाराज पुण्यात आले.

त्यानंतर राजमाता जिजाऊ यांना कसबा पेठेची ही खराब अवस्था पाहवली नाही. त्यांनी शिवाजी राजेंच्या हाताने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुण्याला पुन्हा जुनी ओळख मिळवून दिली.

याच कसब्यातील लाल महालात शिवाजी महारांजे बालपण गेले, त्यामुळे हा महाल आता जगभरात प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखला जातो. पुणेकरांचे आराध्य दैवत असलेले कसबा गणपती मंदिर, कुंभारवाडा, गावकोस मारुती मंदिर, तांबट आळी, त्र्यंबकेश्वर मंदिर, पुण्येश्वर मारुती मंदिर, साततोटी हौद आदी प्रेक्षणीय स्थळं या पेठेत पाहायला मिळतात.

२) गंज पेठ/ महात्मा फुले पेठ :

सवाई माधवराव पेशवा यांच्या राजवटीत गंज पेठेची स्थापना झाली. या पेठेला महात्मा फुले पेठ असेही म्हणतात. त्याकाळी महात्मा फुले हे देखील गंज पेठेतच राहत होते. त्यांनी अस्पृश्यांची पहिली शाळाही याच पेठेत स्थापन केली होती.

फुलेंच्या निधनानंतर गंज पेठेला महात्मा फुले पेठ म्हणून ओळखले जाऊ लागले.

या फुले पेठेत टिंबर मार्केट आणि भवानी मच्छी मार्केट ही ठिकाण आज प्रसिद्ध आहेत.

३) नवापुरा पेठ :

पुण्याच्या घाशीराम सावळादास या कोतवालाने आपला वाडा ते भवानी मंदिर या दरम्यान ‘पेठ नवापूर’ अशी एक पेठ वासवण्याचा कौल मुलगा जीवनराम याच्या नावे १७८६ साली पेशवे सरकारांकडे मागितला. इथून भवानी पेठेत जाणे सोयीचे होईल असा विचार त्यामागे होता. त्यासाठी खास दुकानांकरता ६० हात म्हणजे सुमारे ६० मित्र लांबीची रस्त्याकडेच्या जागा देण्यात आली.

कालांतराने इथे वस्ती वाढत गेली आणि नवापुरा पेठ विस्तारत गेली. आज भवानी पेठेच्या पूर्वेला ही पेठ आहे.

४) सेनादत्त पेठ / नवी पेठ 

१९६२ साली पुण्यात झालेल्या महापुरामुळे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या भागात घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे ही सारी पेठं उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी येथील नागरिकांचं पूनर्वसन करण्यासाठी भारतीय लष्करानं वैकुंठ स्मशानाजवळच्या मोकळ्या जागे राहण्याची सोय करून दिली.

भारतीय लष्कराने ही पेठ बांधून दिल्याने या पेठेला सेनादत्त पेठ असं नाव पडलं गेलं. याच पेठेला नवी पेठ असंही म्हणतात.

५) नागेश पेठ :

१९६५ ते ७० च्या काळात या पेठेला न्याहाल पेठ असं नाव होतं. पूर्वी न्याहाल पेठेत पुण्याच्या संपूर्ण वस्तीपैकी एक टक्का लोक राहात होते. १९५० साली पुणे नगरपालिकेने या पेठेचं नाव अधिकृतरित्या नागेश पेठ केलं. मात्र १९६० ते ७० पर्यंत या पेठेला न्याहाल पेठ म्हणूनच ओळखले जाई.

६) नाना पेठ :

सध्या ज्या ठिकाणी घरगुती सामानांचा बाजार भरला जातो तोच नाना पेठ. नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर या पेठेला नाना पेठ असं नाव देण्यात आलं.

७) नारायण पेठ :

नारायणराव पेशवांच्या राजवटीत ही पेठ वसवण्यात आली. तो काळ होता १७७३ सालचा. सुप्रसिद्ध असा केसरी वाडा म्हणजेच गायकवाड वाडा या नारायण पेठेतच आहे.

८) भवानी पेठ :

भवानी पेठेला पूर्वी बोरवन या नावाने ओळखलं जायचं. पूर्वी इथं बोराची अनेक झाडं होती. त्यावरुन बोरवन म्हटलं जाई.

थोरल्या माधवराव पेशवे यांनी १२ एप्रिल १७६८ रोजी व्यापारी पेठांवरील बोजा हलका करण्यासाठी हि पेठ वसवली. इथं असलेल्या भवानी मंदिरामुळे या पेठेला भवानी पेठ असं नाव देण्यात आलं. 

आता या ठिकाणी हार्डवेअर, टिंबर आणि स्टिलचे मोठे व्यवसाय आहेत. सरदार नाना फडणवीस यांनी या ठिकाणी असे व्यवसाय सुरू केले होते. कालांतराने या व्यवसायांनी मोठे स्वरुप प्राप्त केले. आजही असे व्यावसायिक येथे सापडतात.

९) रास्ता पेठ :

सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते यांच्या नावाने या पेठेला रास्ता पेठ असं नाव देण्यात आलं आहे. १७७५ साली स्थापन झालेल्या या पेठेला पूर्वी शिवपुरी असं नाव देण्यात आलं होतं.

१०) सदाशिव पेठ :

पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली पेठ म्हणजे सदाशिव पेठ. पानिपतच्या लढाईत सादाशिवराव भाऊरावांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या स्मरणार्थच ही पेठ वसवण्यात आली. पूर्वी इथे नायगाव नावाचे एक खेडे होते.

सन १७६९ च्या सुमारास आप्पाजी मुंढे यांनी माधवरावांच्या सांगण्यावरून येथे वसाहत निर्माण केली.

पुण्यातील असंख्य जुने वाडे येथे आजही बघायला मिळतात. आणि इथे राहणाऱ्या लोकांनी स्वतःची एक नवीन शैली तयार केली आहे. ह्या शैलीमुळे मराठीमध्ये सदाशिव पेठी हे नवे विशेषण तयार झाले आहे. विश्रामबाग वाडा, भारत इतिहास संशोधन मंडळ आदी विविध स्थळं इथं पाहायला मिळतात.

११) हणमंत पेठ :

पुण्यातल्या भोर्डे आळीत मारुतीचं एक मंदिर आहे. या मारुतीला गंजीचा मारुती असंही म्हणतात. या देवळाच्या परिसाराला हणमंत पेठ म्हणून ओळखलं जां. १९१० साली ही पेठ वसवण्यात आली. पण कालांतराने ही पेठ नाना पेठेत विलीन झाली. नाना पेठेतच ही भोर्डे आळी आहे. म्हणून नाना पेठेतली हणमंत पेठ असं या विभागाला म्हटलं जातं.

१२) घोरपडे पेठ :

सरदार मालोजीराव घोरपडे (१७८१) यांचे स्वतःचे खासगी सैन्यदल होते . त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा नावानेच ही पेठ वसविली गेली.

१३) गणेश पेठ :

रविवार पेठेच्या पूर्वेला आणि गंजपेठे च्या उत्तरेला वसाहत स्थापण्यात आली आणि गणेश पेठ असे नामकरण करण्यात आले. येथे असणाऱ्या डुल्या मारुतीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी, पानिपत संहाराच्या बातम्या ऐकून इथला मारुती डोलू लागला म्हणुन याला ‘डुल्या मारुती’ असे नांव पडले.

असं सांगितलं जात की, सात वारांनुसार पेठांना नाव देण्याची पध्दत सातारा या शहरात होती. छत्रपतींनीच तेव्हा अशा प्रकारे पेठांची विभागणी केली होती. पेशव्यांनी देखील याच प्रकारे पुण्यामधे अंमलबजावणी केली आणि आज पुणेकरांना अभिमान असणाऱ्या आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असणाऱ्या पेठांचा जन्म झाला.

१४) सोमवार पेठ :

इसवी सन १७७३ मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांनी नगराच्या पूर्व सीमेवरून होणाऱ्या दळणावळणावर लक्ष ठेवणे सोयीचे जावे या कारणास्तव सुरक्षेसाठी विशेष व्यवस्थाकेळी व अनेक गस्ती नाके बांधलेच पण त्याचबरोबर जुन्या शाहूपुरा पेठेची नव्याने पुर्बांधणी करून तिचे ‘सोमवार पेठ’ असे नवीन नामकरणही केले.

येथील नागेश्वर मंदिर हे आबा शेलूकर ह्यांनी बांधले आहे.

१५) मंगळवार पेठ :

विविध व्यवसायांमुळे मंगळवार पेठ प्रसिद्ध आहे. पूर्वी या विभागाला शाहिस्तेपुरा म्हणून ओळखलं जायचं. पानशेत पुराचा फटका या पेठेलाही बसला होता. संपूर्ण पेठ या पुरामुळे उध्वस्त झाला होता. पण कालांतराने ही पेठ पुन्हा वसवण्यात आली. येथील जुना बाझारमुळे ही पेठ प्रसिद्ध आहे.

१६) बुधवार पेठ :

सध्या पुस्तकांच्या बाजारपेठेमुळे प्रसिद्ध असलेला बुधवार पेठ औरंगजेबच्या काळात मोहियाबाद म्हणून ओळखला जायचा. १७३० साली थोरले बाजीराव पेशवा पुण्यात कायमचे मुक्कमी आल्यानंतर त्यांनी लोकांच्या सुखसोयी आणि व्यपाराला उत्तेजन देण्यासाठी नवीन पेठांची स्थापन केली. त्यामुळे त्यांनी या मोहियाबादची पुनर्व्यवस्था करून बुधवार पेठ वसवली.

या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे.

तसंच बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो.

१७) गुरुवार पेठ :

गुरुवार पेठेला पूर्वी वेताळ पेठ असंही म्हणत असत. १७३० साली जिवाजीपंत खासगिवळे यांनी ही पेठ विकसीत केली होती.

पुण्याची वस्ती वाढू लागल्याने १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी या पेठेची उभारणी केली.

या ठिकाणी कधीकाळी हत्तींची झुंज लावली जायची. त्यामुळे ही झुंज पाहायला लांबून लोक येत असत.

१८) शुक्रवार पेठ :

पुण्यातील सगळ्यात मोठी जागा म्हणून शुक्रवार पेठेला ओळखलं जायचं. तेव्हा या पेठेचं नाव विसापूर असं होतं. जिवाजी पं खासगिवले यांनी ही पेठ विकसीत केल्यानंतर १७३४ साली या पेठेचं नाव शुक्रवार पेठ असं नाव देण्यात आलं.

सध्या इथं मंडई आहे. ही मंडई १८८५ साली बांधण्यात आली होती.

१९) शनिवार पेठ :

खरे तर या पेठेचे नाव मूर्तझा पेठ/मुरुजाबाद होते. परंतु या पेठेला ओळख मिळाली ती पेशव्यांनी उभारलेल्या त्यांच्या वाड्यामुळे. पेशवाईमध्ये त्या वास्तूला थोरला वाडा असे नाव होते.

पुढे शनिवार पेठेत असल्याने त्याला पुढे शनिवार वाडा असे म्हणले जाऊ लागले आणि हीच पुण्याची खरी ओळख बनली.

रामशास्त्री प्रभुणे यांचा वाडासुद्धा याच पेठेत होता. पूर्वीच्या काळी शनिवारवाड्याच्या समोरील पटांगणात भाजी मंडई भरत असे. शनिवार पेठेतेच ओंकारेश्वर आणि अमृतेश्वर यांसारखी
सुंदर पेशवेकालीन मंदिरे आहेत. ओंकारेश्वर मंदिराच्या इथे पूर्वी स्मशान होते. पेठेतील अमृतेश्वर मंदिर हे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या बहिणीने बांधले आहे.

२०) रविवार पेठ :

रविवार पेठेचे मुळ नाव हे ‘मलकापूर’ पेठ. अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या नावावरून ही पेठ वसवण्यात आली. पुण्यात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होण्याच्या आधीपासून
या पेठेत व्यापारी लोकांची वस्ती होती.

थोरले बाजीराव पेशवा यांनीच निवास आणि व्यापार यासाठी बुधवार पेठ अपुरी पडू लागल्याने पलीकडेच रविवार पेठेची स्थापना केली. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात म्हणजे सन १७४०-१७४१च्या दरम्यान या पेठेची पुनर्रचना महाजन व्यवहारे-जोशी यांनी केली. 

या पेठेत सरदार हरिपंत फडके यांचा वाडा होता. हा वाडा सन १७९४-९९च्या दरम्यान बांधण्यात आला.
वाड्यात तब्बल ७ चौक होते आणि वाड्यात असणाच्या भाडेकरुंच्या कडून वर्षाकाठी तब्बल १५०० रुपये इतके उत्पन्न मिळत असे. यावरून वाड्याची भव्यता कळून येते. वाड्यात कात्रज येथील तलावातून पाण्याचा पुरवठा होत असे.

अशा या पुणेरी पेठांचा इतिहास म्हणजे जगात भारी! जेवढ्या ऐतिहासिक पेठा, तेवढाच अभिमानाचा त्यांचा इतिहास.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.