रासपचा इतिहास वाचला तर तुम्ही पण म्हणाल, “जानकर साहेब एकदिवस पंतप्रधान होतील.”
साल १९९०
या वर्षी बारामती तालुक्यातल्या एका इंजिनियर तरुणाने यशवंत सेनेची स्थापना केली. तरुणाच मत होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची संख्या असून धनगर समाजाच्या भल्यासाठी झोकून देईल असा नेता समाजात नाही. आजवर संसदेत धनगर व्यक्ती महाराष्ट्रातून निवडून जावू शकला नाही. जे धनगर समाजाचे मंत्री झाले त्यांनी समाजाच्या भल्याचा विचार केला नाही.
धनगर समाजावरील सांस्कृतिक व सामाजिक अन्याय दूर करण्याचा लक्ष्य ठेवून या तरुणाने यशवंत सेनेची स्थापना केली. यशवंत सेनेला बारामती, सातारा, सोलापूर, नगर, सांगली जिल्ह्यातून धनगर तरुणांच बळ मिळू लागलं. धनगर समाज यशवंत सेनेच्या झेंड्याखाली एकत्र येवू लागला. या सेनेत तरुणांचा भरणा अधिक होता. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकिय हक्कांसाठी तरुण एकवटला होता.
या तरुणाच नाव, बापूसाहेब कोकरे…
बापूसाहेब कोकरेंनी यशवंत सेनेच्या माध्यमातून आपल्या आंदोलनातून महाराष्ट्र दणाणून सोडला होता. अशातच दिवे घाटात आंदोलन झालं. यात तीन तरुणांचा मृत्यू झाला.
साल १९९१
यशवंत सेनेचा जोर वाढत होता. राजकारणाने गती घेतली. पंढरपुर येथे धनगर समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामागे प्रेरकशक्ती म्हणून शरद पवार होते. शरद पवार हे स्वत: व्यासपीठावर उपस्थित होते. शिवाजी बापू शेंडगे हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान.
त्यांच्या उपस्थितीत एक घोषणा झाली.
यशवंत सेना कॉंग्रेसमध्ये विलीन.
राजकिय आत्मभान जागृत होणाऱ्या धनगर समाजाचे पंख छाटण्याचं काम झाल्याच डोळ्यादेखत पाहून धनगरस समाजातील तरुण अस्वस्थ झालं. बापूसाहेब कोकरेंची इच्छा नसताना यशवंत सेनेचा अंगार विझवून टाकण्याच काम थेट व्यासपीठावरून करण्यात आलं. पुढे बापूसाहेब कोकरे उद्विग झाले. ते गुजरात गेले. बापूसाहेब कायमचे निघून गेले. आणि धनगर समाजाच सुरू होणारं राजकारण इथेच संपल.
३१ मे २००३
स्थळ चौंडी येथील अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी. या ठिकाणी एका नव्या पक्षाची स्थापना करण्यात आली. पक्षाच नाव होतं, रासप. ४ सप्टेंबर २००३ रोजी निवडणूक आयोगाकडे रितसर पक्षाची नोंदणी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते महादेव जानकर.
आत्तापर्यन्त तुमच्या लक्षात आले असेल आजची स्टोरी काय आहे,
हा इतिहास आहे, रासपचा….
एक काळ असा होता जेव्हा एखाद्या जिपड्यातून, गावात येणाऱ्या शेवटच्या एस्टीतून नायतर एस्टी चुकली म्हणून पायी वाड्या वस्त्यावर एक तरुण यायचा. गावातल्या एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी रहायचा. ओळख करुन देताना म्हणायचा नमस्कार मी भारताचा भावी पंतप्रधान, महादेव जानकर.
एकदम बिनधास्त असा माणूस. परवा संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार म्हणून त्यांनी पुडी सोडली. जोरदार चर्चा झाली. लोकं हसले. पण लोक हसले तर फरक पडत नाही चर्चा झाली पाहीजे हेच महादेव जानकरांच्या राजकारणाच सुत्र.
वर सांगितल्याप्रमाणे यशवंत सेना कॉंग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. नाराज झालेल्या तरुण धनगर समाजाच्या मुलांनी यशवंत सेना पुनरुज्जीवीत करण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात वाघे यांच्याकडे या सेनेचे सरसेनापतीपद देण्यात आलं. त्याचं निधन झालं आणि सरसेनापती म्हणून महादेव जानकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यशवंत सेनेचे सरसेनापतीपद आल्यानंतर गरिबा घरच्या या फाटक्या तरुणाने महाराष्ट्रभर दौरे करण्यास सुरवात केली.
महाराष्ट्राचा कानाकोपरा पालथा घालायचा हा विचार करुन महादेव जानकर फिरत राहिले. गाव, वस्त्या, वाडे फिरले. आज अस सांगितल जातं की एकही गाव अस नाही की जिथे महादेव जानकर गेले नाहीत. बस मिळाली तर बस, कुणाच्यातरी मोटारसायकलला हात करायचा नाहीतर पायी गावात जायचं या सुत्राने महादेव जानकरांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. सळसळत रक्त असणाऱ्या समाजातील तरुणांची मोट बांधण्यास सुरवात केली. मुख्य धारेतील राजकारणाच्या पलीकडे राजकारण वाढवण्याच काम जानकर करत होते.
पंतप्रधान झाल्याशिवाय,
लग्न करणार नाही, बॅंकेत खाते काढणार नाही आणि स्वत:च्या घरी जाणार नाही अशी शपथ महादेव जानकरांनी घेतल्याच सांगण्यात येत.
महादेव जानकर नावाचा तरुण महाराष्ट्राबाहेर फिरत फिरत उत्तरप्रदेशात पोहचला. तिथे कांशीराम त्यांचे नेते झाले. नुसते नेते नाहीत तर काशीराम यांनी महादेव जानकरांच्या डोक्यावर आपला हात ठेवला. काशीराम यांनी मायावतींनी मानसकन्या माणले होते. त्यांनी महादेव जानकरांना मानसपुत्र मानले.
बसपाचे संस्थापक कांशीराम यांचा महादेव जानकरांवर कृपाशिर्वाद राहिला.
कटगुण येथे कांशीराम यांच्या उपस्थितीत जानकरांनी भव्य असा मेळावा घेतला. जानकरांनी ज्या प्रकारे महाराष्ट्र फिरला त्याच प्रकारे त्यांनी भारतभ्रमण करण्यास सुरवात केली. इथे त्यांच्यासोबत स्वत: कांशीराम असायचे. त्यांच्या सानिध्यात ते भारतभर फिरू लागले. त्यांच्या सहवासात जानकरांचा “राजकारणाचा पाया” पक्का होतं गेला.
१९९५ च्या लोकसभेत नांदेड लोकसभा मतदारसंघातून अॅड हरिभाऊ शेवाळे भारिप बहुजनचे उमेदवार होते. केवळ १० हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. हा अंदाज घेवून १९९८ साली नांदेड लोकसभा मतदारसंघातून जानकरांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. बसपासोबत राजकारण करण्याचा विचार करणाऱ्या जानकरांना इथे पहिला धक्का बसला. जानकरांच डिपॉझिट जप्त झालं. याच ठिकाणावर रासपच्या जन्माची कथा आकारास येते.
दूसऱ्यांच्या सावलीत राजकारण करता येणार नाही, आपला पक्ष आणि आपलं राजकारण आकारास यायला हवं हा विचार सुरू झाला.
यशवंत सेनेचे कामाने गती घेतली. आणि पुढच्या पाचच वर्षात गाव-वस्त्या-वाडे फिरून जानकरांनी रासपची स्थापना केली. तेच या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
वैचारिक पाया फुलेवादावर तर राजकारण धनगर समाजाच्या जोरावर हा पक्षाचा पाया झाला.
पक्षाची स्थापना झाल्यानंतर एका आठवड्याच्या आतच रासपच्या तिकीटावर परभणी जिल्हा परिषदेची एक जागा लढवली आणि आपला उमेदवार निवडून आणला. पक्षाच्या स्थापनेनंतर २००४ साली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका लागल्या यात रासपने लोकसभेसाठी १२ उमेदवार उभा केले. नंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी २३ उमेदवार उभा केले. या उमेदवारांच वैशिष्ट अस होतं की २३ पैकी २२ उमेदवार OBC होते. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एका पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणात OBC उमेदवार उभा केले होते.
या निवडणुकीत भूम परांडा मधून बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर यांच्यासारखे उमेदवार रासपच्या तिकीटावर उभे होते. पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. इलेक्शनमध्ये रासपचे उमेदवार निवडणून येवू शकले नाहीत पण एक गोष्ट सहज साध्य झाली. ती म्हणजे रासप लोकांपर्यन्त पोहचली. मात्तब्बर उमेदवार हा रासपचा उमेदवार असू शकतो हे लोकांच्या लक्षात आलं.
२००९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये,
माढा लोकसभा मतदारसंघातून स्वत: महादेव जानकर उभा राहिले. यामध्ये त्यांनी तब्बल ९८,९४६ मते घेतली. शरद पवारांच्या विरोधात इतकी मते घेवून जानकर चर्चेत आले. याच निवडणुकीत रासपने महाराष्ट्रात २९ उमेदवार देण्यासोबत कर्नाटक, आसाम, गुजरात राज्यातून देखील उमेदवार दिले होते.
२००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये रिडालोस नावाने तिसरी आघाडी निर्माण झाली.
यात रासपने २६ जागा लढवल्या. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब पाटील हे रासपच्या तिकीटावर विजयी झाले. या निवडणुकीत रासपचे ६ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. रासपने पहिला आमदार निवडून आणला खरा पण निवडून आल्यानंतर तोच उमेदवार राष्ट्रवादी पक्षात गेला.
जानकर गोपीनाथ मुंडेंचे मानसपुत्र झाले.
फुलेवादी विचारसरणी प्रमाण मानणारे जानकर भाजपसोबत गेले त्याच संपुर्ण श्रेय जात गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला. धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्यानंतर जिल्ह्याच्या पातळीवर आपली ताकद वाढवण्याची गरज मुंडेना जाणवू लागली होती. शरद पवार आणि मराठाकेंद्री राजकारणाला विरोध म्हणून तुल्यबळ धनगर समाजाचे नेतृत्व हि मुंडेची गरज होती. मुंडेनी अचूकपणे जानकराच्या सोबत दोस्ती केली.
याला कारण ठरले बीड जिल्हा परिषदेची निवडणूक.
जिल्हा पातळीवर गोपीनाथ मुंडे आणि जानकरांची युती झाली. बीड आणि परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदसाठी मुंडेनी एक-एक जागा सोडली आणि मैत्री पक्की झाली. याबदल्यात आपली पुर्ण रासप मुंडेच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभा करण्याच काम जानकरांनी केलं त्याची परिणीती चौंडी येथील मेळावा आयोजित करण्यात झाली.
चौंडी येथे गोपीनाथ मुंडे यांनी कार्यक्रम आयोजित केला. महादेव जानकर आपले उत्ताराधिकारी असतील असे घोषित करुन जानकरांना भाजप सोबत जोडलं. जानकरांनी देखील २०१४ च्या लोकसभा इलेक्शनमध्ये रासपची ताकद मुंडेच्या पाठीमागे लावली. ते स्वत: ६९ हजार मतांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पराभूत झाले. बारामतीतून लढताना त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असत तर त्यांचा विजय झाला असता अस गणित मांडण्यात आलं.
मात्र यशवंतसेनेपासून शहाणपण विकत घेतलेल्या जानकरांना रासप घराघरात पोहचवण्याचा समंजसपणा दाखवला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकानंतर,
गोपीनाथ मुंडेच निधन झालं आणि भाजपच्या पाठीमागे रासपची फरफड होतं असल्याच चित्र दिसू लागलं. विधानसभा निवडणुकीत रासपला फक्त ६ जागा देण्यात आल्या. जिथून त्यांचा उमेदवार विजयी झाला होता असा अहमदपूरचा मतदारसंघ देखील काढून घेण्यात आला. तिथे भाजपचे उमेदवार गणेश हाके पराभूत झाले तर अपक्ष असणारे विनायक पाटील निवडून आले.
त्यांना रासपने आतल्या अंगाने मदत केल्याचं सांगण्यात आलं. पक्षाच्या तिकीटावर फक्त दौंड विधानसभेची जागा रासपला मिळाली. पुढे जानकर स्वत: मंत्री झाले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना ६ जागा दिल्या होत्या पण त्यात रासपचे फक्त १ आमदार निवडून आला. भाजपने त्यांचा दौंडचा आमदार पळवला होता. अशातच त्यांच्या दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्यानंतर रासपची नौका देखील भरकटली. आज त्यांनी काँग्रेस भाजप अशा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या शिवाय आपली वाटचाल चालू ठेवली आहे. कालच एका सभेत ते म्हणाले,
“‘मी देशातील अनेक राज्यात पसरलेल्या एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे. कुणाच्या मागे फिरायला मी काही कुणाचा गुलाम नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे अंतिम ध्येय दिल्ली आहे. कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईन.’
आजही ते पंतप्रधान होण्याची आशा बाळगून आहेत. या वाक्यात विनोद दिसतो पण दूसरीकडे जानकरांच्या अशक्यकोटीतील स्वप्न पाहण्याच्या वृत्तीचे देखील कौतुक करु वाटतं.
हे हि वाच भिडू.
- कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचं लग्न धनगर मुलाशी लावून दिलं होतं.
- शाहू महाराजांचा लाडका देवाप्पा धनगर रुस्तम ए हिंदची गदा आणणार होता पण.
- गावात बातमी आली, पाटलाच्या पोरीने पेशव्यांच्या घोडेस्वाराचं डोकं गोफणीने फोडलं आहे.
अप्रतिम लेख जानकर साहेब यांच्या बद्दल लिहिल्या बद्दल बोलभिडू टिमचे हार्दिक अभिनंदन… आभार…
Very nice
Great leader
Nice
Bapusaheb kokare ani yashvant senebaddal mahiti sanga..