त्या घटनेनंतर बाजीराव पेशव्यांनी ठरवलं पुण्यात शनिवार वाडा बांधायचा.

पुण्याचा शनिवार वाडा. फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक. एकेकाळी “सात मजली कलसी बंगला” असं शनिवार वाड्याचं वर्णन केलं जायचं. इथं बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला, मराठी मावळ्यांची घोडी अटकेपार पोहचली. आज या शनिवार वाड्याकडे पाहिलं तर बुलंद असा दिल्ली दरवाजा दिसतो पण आतमध्ये फक्त इतिहासाचे पडके भग्न अवशेष उरलेले आहेत.

मराठी सत्तेची शान असणाऱ्या शनिवारवाड्याची अवस्था कशी झाली, या वैभवशाली वास्तूचे मालक पेशवे आता कुठे आहेत?

हि गोष्ट “वैभवशाली इतिहास असणाऱ्या शनिवारवाड्याची.”

बाळाजी विश्वनाथ भट हे साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांनी नेमलेले पहिले पेशवे. ते सासवडवरून राज्यकारभार सांभाळायचे. स्वराज्याची घडी बसवता बसवता त्यांच अकाली निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांचा कर्तबगार मुलगा पहिला बाजीराव याच्या हाती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. अवघ्या वीस वर्षाच्या बाजीरावाला पेशवा बनवण्यास इतर सरदारांचा विरोध होता पण शाहू राजांना बाजीरावाची धडाडी माहित होती.

श्रीमंत बाजीराव सुद्धा सासवडमध्ये बसून राज्य हाकू लागले. त्यावेळी सासवडला पाण्याचे दुर्भिक्ष होते. पेशव्यांना वंशपरंपरागत पुण्याची जहागीर चालत आली होती.

छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्याचे बाजीरावास आकर्षण होते. उत्तम हवामान, मुबलक पाणी, सासवड पेक्षा मोठे म्हणून आपली राजधानी पुण्याला हलवण्याचा निर्णय तरुण पेशव्याने घेतला. यासाठी आपले पुण्याचे कारभारी बापुजी श्रीपत यांना पत्र धाडले,

“पुनियात राहावे लागते करिता राहते घर व सदर सोपा व कारकुनाचे घर कोटात तयार करावे.”

शनिवार वाडयाची जागा कशी ठरली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.

“पेशवा बाजीराव मुठानदीच्या काठी घोड्यावरून जात होते. त्यावेळी त्यांना तिथे एक ससा शिकारी कुत्र्याचा पाठलाग करत आहे असे दृश्य दिसले. आश्चर्याने हे पाहणाऱ्या पेशव्यांनी या जागी काही तरी विलक्षण आहे याची खुणगाठ मनाशी बांधली आणि वाडा इथेच बांधायचा असे ठरवले.”

मुठा नदीकाठची मुर्तजाबाद पेठेची जागा विकत घेण्यात आली. शिवाजी महाराजांचे बालपण गेलेला लाल महाल इथून जवळच होता. मुघलांनी केलेल्या तोडफोडीमुळे आता तिथे फक्त काही अवशेष उरले आहेत.

१० जानेवारी १७३०, माघ शु.३ शके १६५१ याजागेचे भूमिपूजन आणि विधिवत पायाभरणी झाली.

पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पाच्या देखरेखीखाली दुमजली चौसोपी वाडा उभा राहू लागला. शिवरामकृष्ण लिमये यांनी या वाड्याची आखणी केली होती. आज जी आपल्याला नऊ बुरुजांची तटबंदी दिसते ती तेव्हा बांधलेली नाही. छत्रपती शाहूंनी परवानगी नाकारल्यामुळे वाड्याचं तटाचं काम अर्धवट राहिलं. ते पुढं बाजीरावांचे सुपुत्र बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवा यांनी पूर्ण केले.

दोन वर्षात वाडा उभा राहिला. सन २२ जानेवारी १७३२ ला वास्तुशांत करून पेशवे बाजीराव आपल्या कुटुंबकबिल्यासह वाड्यात राहायला आले. वाड्याचे नाव ठेवण्यात आले शनिवार वाडा. वाड्याच्या बांधकामाला १६,११० रुपये इतका खर्च आल्याच पेशव्यांच्या दफ्तरी नोंद आहे.

बाजीराव पेशवेंच्या काळात मोठमोठ्या मोहिमा आखण्यात आल्या आणि मारण्यात ही आल्या. उत्तरेत मराठी सत्तेची धाक निर्माण झाली.

बाजीरावांच्या नंतर नानासाहेब पेशव्यांनी पेशवाईच्या वैभवाचा कळस अनुभवला. याच पेशव्यांच्या कारकिर्दीत रघुनाथराव मराठी सत्तेचा झेंडा अटकेपार गाडून आले. या विजयाबरोबरच पानिपतचा दुःखद पराभव सुद्धा नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीतच शनिवारवाड्याने बघितला.

नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्याचा सुप्रसिद्ध दिल्ली दरवाजा उभारला. वेगवेगळे महाल उभारले. त्यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक पेशव्याने या वाड्याच्या सौंदर्यात भरच घातली.

शनिवारवाड्याचा मुख्य प्रासाद सहा मजली होता. येथे उभे राहून श्रीमंत माधवराव पेशवे पर्वतीच्या मंदिराचा देखावा पहात. इथून त्याकाळच्या पूर्ण पुणे शहरावर नजर ठेवता येत असे. गणपती रंग महाल इथे दरबार भरायचा.

याशिवाय आरसे महाल, नाचाचा दिवाणखाना, हस्तिदंती महाल, नारायणरावाचा महाल, रघुनाथ रावांचा दिवाणखाना अशा अनेक देखण्या वास्तू होत्या. गणपती रंग महालच्या सौंदर्याचे वर्णन इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवले आहेत.

पेशव्यांच्या या राजवाड्याचे प्रमुख आकर्षण होते इथले कारंजे. युरोपमधल्या रोमचा राजवाडा सोडला तर अशी उद्याने आणि कारंजे कुठेच नव्हते. या कारंजाची निर्मिती अतिशय कल्पकतेने आणि कलात्मकरित्या करण्यात आली होती.

यातला सर्वात प्रसिद्ध होता हजारी कारंजा. सोळा कमलदले आणि त्याच्यावर बसवलेल्या १९६ तोट्यामधून हा कारंजा उडत असे. अनेक राजेमहाराजे खास हा अविष्कार पाहण्यासाठी थांबायचे.

the lotus shaped fountain

नाना फडणीसांनी सवाई माधवराव पेशव्यासाठी हे कारंजे आणि मेघडंबरी ही इमारत उभारली होती. पेशव्यांच्या या प्रासादात त्याकाळात हजारो लोकांची उठबस होती. शेकडो लोकांच्या पंगती उठत होत्या. लाखोंचा दानधर्म चालायचा. शनिवारवाड्याच्या शाही श्रीमंतीची चर्चा देशभर होती.

दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी सत्ता इंग्रजांकडून पराभूत झाली. दिल्लीदरवाज्यावरचा भगवा उतरवण्यात आला आणि त्या जागी युनियन जॅक झळकू लागला. इंग्रजांना या पेशव्यांच्या वाड्याबद्दल कोणतीही आस्था नव्हती. असला तर रागच होता. त्यांनी शनिवारवाड्याची कोणतीही देखभाल घेतली नाही.

२१ ऑक्टोबर १८२८ रोजी शनिवार वाड्याला महाभीषण आग लागली. कोणीही ही आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही. सात दिवस आगीत वाडा धुमसत होता. मराठी साम्राज्याच्या सन्मानाच्या शेवटच्या आशा अग्नीप्रलयात राख झाल्या होत्या..

आज पेशवे काय करत आहेत?

मराठी सत्तेचा मानबिंदू असलेला वैभवशाली शनिवारवाड्याचे मालक श्रीमंत पेशव्यांचे वंशज आज पुण्याच्या उपनगरात साध्या राहणीमानात आयुष्य जगत आहेत. बाकीचे राजेमहाराजे आपआपल्या महाप्रसादात आपले वतन आणि आपल्या इतिहासाचे वजन सांभाळत प्रसंगी राजकारणात ही हातपाय मारत आहेत. पण पेशव्यांची आजची पिढी मात्र या सगळ्यापासून कोसो दूर आहे.

दुसऱ्या बाजीरावांचे बंधू अमृतराव पेशवे हे वाराणसीला गेले. तिथेच त्यांच्या पिढ्या वसल्या. काही वर्षापूर्वी हे पेशवे पुण्याला परत आले. आज पेशव्यांची दोन कुटुंबे पुण्यात आहेत. कृष्णराव पेशवे आणि विनायकराव पेशवे.

कृष्णराव पेशव्यांचे सुपुत्र महेंद्र पेशवे म्हणजे पेशव्यांची दहावी पिढी. ते, त्यांची पत्नी सुचेता आणि मुलगी पूजा यांनी कधीच आपल्या पेशवा असल्याचा अवडंबर केला नाही. त्यांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान नक्कीच आहे पण ते इतिहासाचं कोणतही ओझ बाळगत नाहीत.

पेशवाई चा वारसा म्हणून त्यांना कोणतीही संपत्ती मालमत्ता मिळाली नाही. मिळालं आहे ते फक्त वाराणसीवरचे दोन घाट आणि त्या घाटावरच्या मंदिरांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी .

तुमच्या आमच्या सारखं नोकरी धंदा सांभाळून साध सरळ आयुष्य ते जगतात. राजकारणापासून ते कोसो दूर आहेत. आपल्याला मिळणारा आदर आपल्या पूर्वजांची कमाई आहे आणि त्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये याची काळजी ते घेतात.

दरवर्षी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या वेळी शनिवार वाड्यात कार्यक्रम आयोजित केले जातात. तेव्हा सगळे पेशवे कुटुंबीय आवर्जून उपस्थित राहतात. सतराव्या शतकातला गौरवशाली इतिहास आणि एकविसाव्या शतकातली आधुनिक पिढी याचा आदर्श समतोल हे कुटुंबीय जपत आहेत.

हे ही वाचा भिडू.

5 Comments
  1. कार्तिक इंगोले पाटील says

    पूर्वजांच्या चांगल्या कामा मुळे वाट्याला आलेले भोग
    दुसर काय….

  2. Dinanath Manohar says

    शनीवारवाड्याबद्दल सगळं कसं छान छान लिहिलंय.. व्वा.. अ

  3. सुरेखा says

    शिवाजी महाराज यांचा अपवाद वगलता सर्व जन एशोअरमात राहिले , रंग महाल etc . अन्यथा तेही असे अनेक महाल बांधू शकलें असते

  4. hechaudhari says

    शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि पेशव्यांनी राहण्यासाठी वाडा तयार केला.

  5. Shashank Kulkarni says

    १० जानेवारी १७३० या दिवशी मकर संक्रांत होती. या दिवशी भूमीपूजन करणे शक्य नाही. माघ शुक्ल ३ दिनांक २१ जानेवारी रोजी होती. भूमीपूजन २१ जानेवारी रोजी झाले असले पाहिजे.

    शशांक कुळकर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.