भारत आणि ऑस्ट्रेलिया स्लेजिंगचं वॉर
भारतीय क्रिकेट टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु आहे. अतिशय खुन्नस देऊन हे सामने खेळले जातात. नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियन्स आपलं ठेवणीतल हत्यार म्हणजे स्लेजिंग बाहेर काढत आहेत.
पण यावेळी आपला कप्तान विराट कोहली हा सुद्धा त्याचं जोशात येऊन त्यांना उलट उत्तर देत आहे. एवढंच काय तर तो यामध्ये त्यांच्या पेक्षा ही एक पाउल पुढेच आहे. विराट कोहली पासून प्रेरणा घेऊन ऋषभ पंतसारखे प्लेअर्स सुद्धा ऑस्ट्रेलियन कप्तानला झोडपत आहेत.
अशी वेळ आली आहे कि माध्यमातून मागणी होत आहे की स्टंपवर लावलेला माईक काढून टाका. आम्हाला तुमचा खेळ बघायचा आहे, शिव्या नाही.
ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगला त्यांच्या क्रिकेट पेक्षाही मोठा इतिहास असेल. तिथं खेळाडू बॅट आणि बॉल हातात घ्यायला शिकतात त्याच्या आधी स्लेजिंग करून मॅच रेफ्रीपासून कसं सुटायचं हे शिकतात. क्रिकेटची जन्टलमन्स गेम ही ओळख पुसण्यामागे ऑस्ट्रेलियाचा सिंहाचा वाटा आहे.
पण कित्येकदा अशी वेळ येते की शेरास सव्वाशेर भेटतो. चला आपण पाहू ऑस्ट्रेलियन्स खेळाडूंना त्यांच्याच भाषेत कोणी कोणी उत्तर देऊन कसे गप्प बसवले आहे.
१. रवी शास्त्री:
विराट कोहलीचे हे गुरु. सगळ्याच बाबतीत गुरु म्हणता येईल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्यांना जरा जास्तच चेव यायचा. एकदा काय झालं माईक व्हिटनी नावाचा एक राखीव खेळाडू कोणाच्या तरी जागेवर फिल्डिंगसाठी मैदानात आला होता. रवी शास्त्री स्ट्राईकवर खेळत होता.
ऑस्ट्रेलियन बॉलरने त्याला बाउंस मारला. शास्त्रीजींनी कसाबसा बॉलला कट केला आणि त्याला चोरटी धाव घेऊन नॉन स्ट्राईकर एंडला पळायच होत.पण बॉल खूप दूर गेला नाही. माईक व्हिटनीच्या हातात बॉल गेला. माईकला माहित होते, शास्त्रीला स्ट्राईक सोडायची गडबड आहे. त्यान रविला सांगितलं,
” क्रीजच्या आतच रहा.जर बाहेर आलास तर तुझं डोकं बॉल मारून फोडेन”
शास्त्रीची ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलिंग खेळून चांगलीच फाटली होती पण तो स्लेजिंगमध्ये हार मानणारा नव्हता. त्यान माईकला उत्तर दिल,
“तुझी जीभ जेवढी चालते त्या लायकीची बॉलिंग टाकता आली असती तर तूला राखीव खेळाडू म्हणून राहावं लागलं नसत.”
माईक व्हिटनी आयुष्यात कधी शास्त्रीच्या नादी लागला नाही.
२.वीरेंद्र सेहवाग.
मायकल क्लार्क तेव्हा नवीन होता. त्याला काड्या करायची खुमखुमी होती. बाकीचे ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्याला स्लेजिंग करायला घाबरतात अशा सचिनला त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. सेहवागला ते आवडले नाही. त्याने क्लार्कला सांगितले
“असे करू नकोस. तू ज्याला चिडवतोयस त्याच्या शतकांची संख्या तुझ्या वयापेक्षा जास्त आहे. “
तरी क्लार्क गप बसत नव्हता. बाकीचे त्याचे सहकारी त्याला कमॉन पप म्हणून जास्तच भडकवत होते. पप हे क्लार्कचे टोपण नाव होते.
विरू पाजीचा सेन्स ऑफ ह्युमर सॉलिड आहे. त्याने क्लार्कला बाजूला बोलावले.” तुझे नाव पप आहे काय?” क्लार्कने मान डोलावली. सेहवाग म्हणाला,”कोणती ब्रीड?” पपचा अर्थ कुत्र्याचे पिल्लू असा होतो. विरू त्याला तू कोणत्या जातीचा कुत्रा आहेस हे विचारत होता. क्लार्क च्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही.
३. विराट कोहली.
स्लेजिंगचा विषय आला आणि विराट कोहलीच नाव आलं नाही असं कसं होईल. याच्या मुळे परदेशी खेळाडू हिंदी शिव्या शिकले.
२०१६ची वनडे सिरीज सुरु होती. विराट कोहली बडपच मधून नुकताच बाहेर आला होता. तो त्याच्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करत होता. अशावेळी फास्टर बॉलर जेम्स फॉक्नरला त्याच्याशी पंगा घ्यावासा वाटला. फॉक्नर विराटला शिव्या देऊ लागला. तो जेव्ह्ड्या शिव्या देत होता विराट तेवढा त्याला ठोकत होता. तरी फॉक्नर शांत बसत नव्हता.
अखेर विराट त्याला म्हणाला,
“तुझ्या शिव्यांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही आहे. उलट तुझी आयुष्यभराची पिटाई करून मला कंटाळा आला आहे. गप जा बॉल उचल आणि बॉलिंग कर.”
४. सचिन तेंडुलकर .
२०००सालची आयसीसी नॉकआउट ट्रॉफी सुरु होती. मॅक्ग्रा आपल्या लयीमध्ये होता. अशातच त्याला कोणती दुर्बुद्धी सुचली माहित नाही पण त्याने सचिनशी पंगा घेतला. प्रत्येक बॉलनंतर सचिनला काहीना काही बोलू लागला. कधी न बोलणारा तेंडुलकर त्याला म्हणाला,
“लक्षात ठेव आज तुला मी ग्राउंडच्या बाहेर फेकणार आहे.”
त्यानंतर सचिनने जी काही फलंदाजी केली त्याला तोड नाही. सचिनने सलग तीन फोर मारले. दोन षटकार मारले. मॅक्ग्रावर पश्चातापाची वेळ आली. त्याला नऊ ओव्हर मध्ये ६१ ठोकण्यात आल्या. आज रिटायर होऊन बरीच वर्षे झाले तरी मॅक्ग्रा ती मॅच विसरत नाही.
५.राहुल द्रविड.
राहुल द्रविडने सांगितलेला किस्सा. स्टीव्ह वॉ तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कप्तान होता. त्याला स्वतःला स्लेजिंग करायला आवडायचा आणि इतरांनी त्याला स्लेजिंग केलेलंही आवडायचं. कारण त्यामुळे जोश येऊन त्याचा खेळ बहरायचा.
राहुल द्रविडच्या हे लक्षात आले. त्याने आपल्या सगळ्या टीममेट्स ना सांगितले की स्टीव्ह वॉ आल्यावर कोणीही त्याला स्लेज करायचे नाही. स्टीव्ह बॅटींग साठी आला. तो आल्या आल्या सगळे फिल्डर्स शांत झाले. थोडा वेळ झाल्यावर वोला कळेना कि काय झालंय नेमकं.”इतना सन्नाटा क्यु है भाई”.
तरी ते अजून काही वेळ शांत बसलं. पण त्याला खेळताना चेवच येईना. अखेर शांततेचा त्याला राग आला. भारतीय खेळाडू गालातल्या गालात हस्त होते. चिडून त्याने कीपरला विचारले,
“तुमच्या पैकी कोण मला स्लेज करणार आहे की नाही?”
तरीही कोणी काही बोलेना. पुढच्याच काही बॉल मध्ये स्टीव्ह वॉ आउट झाला.
हे ही वाचा भिडू.
- हरभजनने लेहमनला मैदानावरच विचारलं, तू प्रेग्नंट आहेस का..?
- झहिर खानची छोटीशी इनिंग सचिनच्या शतकावर भारी पडली !
- मॅचच्या आधी खोलीत देवाची पूजा मांडणारा लक्ष्मण.
- त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !