जगाला टोरंट देणारा मालक आज पण तेवढंच भारी काम करतोय…

मार्वल युनिव्हर्स कसलं भारीये. मेन इन ब्लॅकचा नवीन पार्ट आलाय, हॉलिवूडचा हा पिक्चर भारी आहे. अशा चर्चाच नुसत्या ऐकायला मिळायच्या. 

तेव्हा एकतर हे पिक्चर थेटरला लागायचे नाहीत आणि त्याच्या डिव्हीडी पण भेटायच्या नाहीत. 

२००६ नंतर यू टोरंट नावाची गोष्ट कळाली आणि अख्ख हॉलिवूड आपल्या हातात आल्याचं फील झालं. तसं म्हणायला गेलं, तर हॉलिवूडचे पिक्चर पाहायला शिकवलं ते टोरंटनं. आता नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानं जरा सोपं झालंय. 

१० वर्षांपूर्वीचा काळ आठवून बघा. 

एखादा पिक्चर पाहण्यासाठी आठ-आठ दिवसाची वाट पाहावी लागायची. त्यातही दर १५ मिनीटांनी येणाऱ्या जाहिराती. या सगळ्या झंझट मधून कोणी सुटका केली असेल तर टोरंटनं. यावरून पिक्चर, गेम्स, सॉफ्टवेअर हे सगळं फ्री डाऊनलोड होतं. आपल्यासाठी तर यू टोरंट हे वरदानापेक्षा काही कमी नव्हतं.

यू टोरंटची आयडिया होती ती ब्रेम कोहेन याची 

कोहेनचा जन्म अमेरिकेतील मॅनहटन शहरात १२ ऑक्टोबर १९७५ ला झाला. त्याचे वडील हे कॉम्प्युटर सायंटिस्ट तर आई शिक्षिका. यामुळे घराची आर्थिक परिस्थिती चांगली होती. वडिलांप्रमाणे कोहेनचा पण कॉम्प्युटर हा आवडीचा विषय.   

५ व्या वर्षांपासून कोहेनने कोडींग शिकायला सुरुवात केली . मैदानावर खेळण्याऐवजी कोहेन कॉम्प्युटरवर कोडिंग करायचा. कॉलेजमध्ये असतानाच कोहेनला नोकरीच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. चांगला पगार मिळाल्यानं त्यानं मध्येच कॉलेज सोडून खासगी कंपनीत नोकरीला सुरुवात केली. 

हा काळ होता नव्वदीचा. मोठ मोठ्या कंपन्या आयटी क्षेत्रात येत होत्या. पण कोहेनला कुठल्याच इंटरनॅशल आयटी कंपनीने नोकरी दिली नाही. कोहेनकडे असणारं टॅलेंट या कंपन्या ओळखू शकल्या नाहीत. लहान कंपन्यांमध्येच कोहेनला काम करावं लागलं. 

कोहेननं शेवटची नोकरी केली मोजोनेशन या कंपनीत. टोरेंटची खरी आयडिया याच कंपनीत कोहेनला मिळाली. मोजोनेशन कंपनी फाईल शेअरिंगसाठी एक सिस्टीम तयार करत होती. आयडिया अशी होती की, ऑफिस मधल्या सगळ्या फाईल्स एकाच सर्व्हरमध्ये ठेवण्यापेक्षा त्याच्या लहान-लहान फाईल्स तयार करून वेगवेगळ्या कॉम्प्युटरमध्ये त्या सेव्ह ठेवायच्या. 

म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेली फाईल डाउनलोड करण्यासाठी त्या ऑफिसमधल्या सगळ्या कॉम्प्युटरच्या परवानगीची गरज असणार. त्यामुळे हॅकर्सला एखादा कॉम्प्युटर हॅक करून फाईल मिळवणं अवघड होईल. मोजोनेशनची फाईल सिस्टीम काय तयार झाली नाही पण कोहेनला टोरंटची आयडिया इथूनच सुचली. 

फाईल शेअरिंगसाठी हीच पद्धत सुरक्षित असल्याचं कोहेन यांच्या लक्षात आलं. यामुळे कंपनी सोडल्यानंतरही कोहेननं यावर काम सुरु ठेवलं. पूर्ण वर्षभर रिसर्च केल्यानंतर २ जून २००१ रोजी  एक नवीन फाईल्स शेअरिंग सिस्टीम तयार केली त्याला बिग टोरंट नाव दिलं गेलं. यालाच नंतर यू टोरंट असं नाव दिलं गेलं.

ही सिस्टीम तयार तर झाली, पण लोकांपर्यंत कशी पोहावयाची याची चिंता कोहेनला होती. त्याच्या मदतीला रूममेट लेन सासमॅन आला. त्यानं कोहेनला एक टेक कॉन्फरन्स घेण्याचा सल्ला दिला. त्या कॉन्फरन्सला कॉडकोन असं नाव दिलं गेलं. या कॉन्फरन्सला इलॉन मस्क सुद्धा उपस्थित होता.

कॉन्फरन्स घेतली इलॉन मस्कला बोलावून सुद्धा काही फायदा झाला नाही. 

कोहेनला लोक भेटायचे, आणि तू तयार केलेली सिस्टीम भारी असल्याचं सांगायचे. पण ती कोणीच वापरत नव्हतं. मुळात ही सिस्टीम लोकांपर्यंत पोहचलीच नव्हती.

त्यामुळे कोहेन यांनी टोरंटवर पॉर्न फिल्म टाकायला सुरुवात केली. आणि हे पॉर्न फ्री मध्ये डाउनलोड व्हायचं. 

यामुळे असं झालं की, टोरंट वापरणाऱ्यांच्या संख्येत एकदम मोठी वाढ झाली. टोरंटवर पॉर्न फिल्म टाकायची संकल्पना काम करून गेली. पण कोहेनला पॉर्न फिल्मचा डिस्ट्रिब्युटर बनायचं नव्हतं. यामुळे युझर्स वाढल्यानंतर त्याने टोरंटवरच्या सगळ्या पॉर्न फिल्म काढून टाकल्या. 

तेव्हा आत्तासारखी एक-दोन जीबीच्या फाईल्स पाठवण्यासाठी गुगल ड्राइव्ह, क्लाउडसारखी सोय नव्हती. या सगळ्या भानगडीत स्टोरेज ही महागडी गोष्ट असल्यानं कुठलीच वेबसाईट या मोठ्या फाईल्सच्या भानगडीत पडत नव्हती. टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर होस्ट करत नव्हत्या. टोरंट बाजारात आल्याने लोकांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. कारण टोरंट फाईल्स ऐवजी लिंक तयार करत. 

टोरंट पायरसीच्या भानगडीत सापडत नाही. याचं एक कारण आहे…

आपण जे सगळं डाउनलोड करतोय, ते कुठं एका ठिकाणच्या सर्व्हरमध्ये सेव्ह नाही. त्याऐवजी लाखो टोरंट वापरणाऱ्यांच्या मोबाईल, कम्प्युटरमध्ये तो डेटा डाऊनलोड केला जातो. टोरंट वापरणाऱ्यांनी हा डेटा अगोदरच डाउनलोड केलेला असतो. 

टोरंट डेटा होस्ट करत नाही. डेटा अपलोड न करता लिंक अपलोड करण्यात येत असल्याने टोरंट पायरसी मध्ये अडकून पडत नाही. यामुळेच टोरंट लोकांच्या पसंतीला उतरला आणि डाऊनलोड करण्याचा मुख्य स्रोत झाला. यानंतर टोरंटवरून पिक्चर, गेम, सॉफ्टवेअर सारख्या गोष्टी शेअर करण्यात येऊ लागल्या.

असं सुरु झाल्यावर इंटरनेट वापरणाऱ्यांनी कॉपीराईट कन्टेन्ट टाकायला सुरुवात केली होती आणि इतरांनी ते शेअर करायला सुरुवात केली. यामुळे टोरंट टार्गेट होऊ लागलं.

कोहेननं सुरुवातीला सांगितलं होतं की,

बिग टोरंट हे पायरसीसाठी तयार केलं नाही. तर मोठ्या स्टोरेजच्या फाईल्स एकमेकांना पाठवता याव्यात यासाठी टोरंट बनवलं आहे. ते फाईल्स लवकर आणि फ्री मध्ये पाठवता येईल अशी यामागची ही संकल्पना होती. जर लोक टोरंटचावापर पायरसीसाठी करत असेल तर त्याला मी जबाबदार नाही.

कोहेनवर कारवाई करण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. पण कोहेननं पायरसी वाढावी यासाठी काहीही केलेले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकली नाही.

मग याच लोकांनी कोहेनला पायरसी रोखण्यासाठी काय उपाय करता येईल असं विचारलं,

कोहेननं सांगितलं, कंटेंट हा कमी किंमतीत, सगळ्यांना उपलब्ध होईल असा असावा. त्याच वेळी पायरसी संपेल असंही सांगितलं. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार आल्यानंतर टोरंटचा वापर काही प्रमाणात कमी झाला. मात्र टोरंट वापरणं पूर्णपणे बंद झालं नाही. 

आता या सगळ्या गोंधळात प्रश्न पडतो की, टोरंटची सुरुवात करणारा ब्रेम कोहेन सध्या काय करतो. 

टोरंटला पायरसीच्या गुन्ह्यात कुठंही पकडलं गेलं नाही. टोरंट सोडून कोहेन हे आता बरेच पुढे गेले असून सध्या त्यांनी एक क्रिप्टोकरन्सी काढलीये, त्याला चिया नाव दिलं आहे. कोहेम हे आता सगळ्या कॉंट्रोव्हर्सीपासून लांब राहून कंपनी चालवण्यात बिझी आहेत. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.