हिटलरचं लग्न अवघे दोन दिवस पण टिकलं नाही.

साधारण एकोणीसशे तीसच्या दशकात जर्मनीची सगळी सत्ता आधी लोकशाही पद्धतीने त्याने काबीज केली आणि नंतर आपली हुकुमशाही सुरु केली. तिथले लोक त्याच्यासाठी वेडे झाले होते. त्याच्या अमोघ वक्तृत्वाच गारुड लाखो लोकांना त्याच्याकडे आकर्षित करून घ्यायचं. त्यांना तो जर्मनीला परत महान बनवण्याचे स्वप्ने दाखवत होता.

जर युद्ध झाल तर शत्रू राष्ट्राला धडा शिकवण्याची ताकद हिटलरकडेच आहे याची सगळ्यांना खात्री होती.

त्याच पोटतिडकीने बोलण, त्याच रुबाबात चालण, सलाम ठोकण ही सगळीच एक दंतकथा बनली होती. जर्मनीमधले लोक त्याला तारणहार भगवान मानू लागले होते. हिटलर किती तास झोपतो, त्याने देशासाठी लग्न देखील केलेलं नाही, त्याचा लष्करी पोशाख या गोष्टीबद्दल वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून वहात असायचे.

पण अस म्हणतात की प्रत्यक्षात हिटलर एक मानसिक रोगी होता. ज्युंमुळे आपल्या देशाची प्रगती खुंटली आहे हे त्याच्या मनात घट्ट बसल होतं आणि हेच मत त्याने जर्मन माणसांच्या मनात ठसवल होतं. यातूनच त्याने ज्यूंचा महाभयानक नरसंहार करायला सुरवात केली.

अख्खं जग जिंकण्याच्या भावनेतून त्याने जर्मनीला दुसऱ्या महायुद्धात ढकलून दिलं. फक्त जर्मनीच नाही तर अख्ख्या युरोपातील लाखो करोडो लोक मारले गेले.

किती जरी असल तरी हिटलर देखील शेवटी एक माणूसच. त्याला सुद्धा काही ना काही भाव भावना असणारच. एवढी लोक मारल्यावर त्याच्यावरही तणाव येत असेल, घरी गेल्यावर मन मोकळ करण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज भासत असेल.

तारुण्यात त्याच्या कोणी गर्लफ्रेंड होत्या की नाही हे नक्की माहित नाही पण जर्मनीचा फ्युरर बनल्यावर वयाच्या चाळीशीत तो प्रेमात पडला तेही आपल्या भाचीच्या.

जेली रुबेल ही हिटलरच्या सावत्र बहीणीची मुलगी होती. ती त्याच्या सोबतच राहायची. दोघांच्याही वयात खूप अंतर होते. पण हिटलरचा तिच्यावर खूप जीव होता. तिचा शब्द तो कधी पडू द्यायचा नाही. मात्र तिच्यावर त्याने खूप बंधने घातलेली होती. तिला कोणाशी बोलण्याची परवानगी नव्हती किंवा तिच्या बद्दलची कोणतीही माहिती त्याने बाहेर पडू दिली नव्हती.

हिटलर अजून हुकुमशहा बनला नव्हता पण तिच्यावर तो पूर्ण अधिकार गाजवायचा.

अस म्हणतात की ती हिटलरच्या नजरकैदेतून पळून जाऊन प्रियकराला भेटण्याच्या प्रयत्नात होती आणि हे त्याला समजल. दोघांचं मोठ भांडण झाल. त्यातून एकदा तो म्युनिच मधून बाहेर गेला असता तिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हिटलरच्या विरोधकांनी हा खून असण्याची शक्यता असल्याचे बोलून दाखवले.

बाकी काही का असेना जेलीच्या मृत्यूने हिटलरला खूप मोठा धक्का बसला.

तो अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होता. तिच्या अंतिमसंस्काराला देखील तो उपस्थित राहिला नाही, अस म्हणतात की तिच्या मृत्यूनंतरच हिटलरचा ज्यूंच्या बद्दलचा आकस वाढला आणि त्याने त्यांच्या वंशाचा समूळ नाश करण्याची प्रतिज्ञा केली.

अशातच त्याच्या आयुष्यात इव्हा आली.

इव्हा ब्राऊनची त्याच्याशी ओळख झाली तेव्हा ती १७ वर्षांची होती. नाझी पक्षाच्या अधिकृत फोटोग्राफ्ररकडे ती नोकरी करायची. यातूनच तिची हिटलरशी मैत्री झाली. तिच्या सौंदर्याने पागल झालेला हिटलर तिच्या पेक्षा जवळपास पंचवीस वर्षांनी मोठा होता.

जेली जिवंत असताना देखील दोघे एकमेकांना भेटत होते मात्र जेलीच्या मृत्यूनंतर त्यांची जवळीक वाढली. ती त्याच्या सोबतच राहायची. याच काळात हिटलर जर्मनीचा सर्व शक्तीशाली राष्ट्राध्यक्ष बनला. त्याच्या निवासस्थानात दोन बेडरूम असायचे. यातील एका बेडरूम मध्ये इव्हा राहायची तर दुसरीकडे हिटलर. मात्र हे दोन्ही बेडरूमना जोडणारे एक दार असायचे. दररोज संध्याकाळी हिटलर आणि इव्हा त्याच्या स्टडीरूममध्ये एकत्र असायचे.

हिटलर आपले प्लॅन्स इव्हाला सांगायचा का, ज्यू छळछावणी, दुसर महायुद्ध अशा महत्वाच्या विषयाबद्दल तिचा सल्ला घ्यायचा का याची खात्रीलायक माहिती नाही.

मात्र तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता याचे पुरावे, फोटोग्राफ मिळतात.

पण त्याकाळात तिच्या बद्दल फक्त मोजक्याच लोकांना माहिती होती. हे नात जवळपास पर्यंत मोठ्या कौशल्याने दडवण्यात आलं होतं. फोटोग्राफ्र असिस्टंट म्हणून ती हिटलरसोबत सर्व शहरात फिरायची मात्र लग्न करून तिला अधिकृत पत्नीचा दर्जा त्याने दिला नव्हतं. त्याच्या साठी पॉवर महत्वाची होती. जग जिंकण्याच स्वप्न महत्वाच होतं.

जेलीप्रमाणेच इव्हाच आयुष्य देखील एका सोन्याच्या पिंजऱ्यात बांधून ठेवलेलं होतं.  खरं तर हिटलरच्या संपर्कात आल्यावर इव्हाने देखील दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. हिटलर तिला त्यानंतर खूप जपू लागला.

इव्हाच नाव त्याने आपल्या मृत्यूपत्रात देखील लिहून ठेवल होतं.

सुरवातीला महायुद्धात एका पाठोपाठ एका देशावर विजय मिळवत चाललेली जर्मनी रशिया मध्ये मार खाल्ल्यावर मागे पडू लागली. तेव्हा हिटलर जास्त बिथरला. या काळात त्याने केलेली कृष्णकृत्ये अमानवीय आहेत, साधारण १९४५ मध्ये त्याला लक्षात आलं की हे युद्ध आपण हरलेलो आहोत. त्यावेळी लपून बसण्यासाठी त्याने बर्लिन मध्ये एक बंकर बांधून घेतला होता.

या बंकरमध्ये त्याच्या सोबत इव्हा ब्राऊन देखील होती. या बंकरमध्ये बसून त्याने आपल साम्राज्य कोसळताना ऐकलं. ज्या दिवशी रशियन सैन्य बर्लिनच्या दाराशी येऊन ठेपल तेव्हा हिटलरचा वाढदिवस होता. तेव्हाच त्याने आपल्या अंतिम यात्रेची तयारी सुरु केली.

त्यापूर्वी त्याने २८ एप्रिलच्या मध्यरात्री बंकरमध्येच इव्हाशी लग्न केले.

हिटलरचा डावा हात म्हणून ओळखला जाणारा गोबेल्स तेव्हा उपस्थित होता. दोघांनी मरेज सर्टिफिकेटवर सह्या केल्या. इव्हाने सही करताना चुकून आडनावाच्या ठिकाणी ब्राऊनच बी लिहिले होते मात्र लगेच ते खोडून हिटलर केले. सकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना एक छोटीशी ब्रेकफास्ट पार्टी देण्यात आली.

कधीही रशियन सैन्य बंकरमध्ये घुसेल अशी खात्री होती. हिटलरला पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. तो पूर्णपणे हरला होता.

३० तारखेला दुपारी साडेतीन वाजता त्याच्या खोलीतून गोळीचा आवाज आला. सर्वशक्तीशाली हुकुमशहा हिटलरने आपल्या ४० तासाच्या बायको सोबत आत्महत्या केली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.