हिटलरने गिफ्ट दिलेली मर्सिडीज नेपाळच्या गुरख्यांनी आपल्या पाठीवर उचलून काठमांडूला आणली.

एकोणीसशे तीसचं दशक. जर्मनीचा चॅन्सेलर हिटलरचा जागतिक राजकारणात उदय झाला होता. पहिल्या महायुद्धात झालेल्या जर्मनीच्या पराभवाचे उट्टे काढणार अशी प्रतिज्ञाच त्याने केली होती. त्याच्या आक्रमक धोरणामुळे युरोपात दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा व्हायला सुरवात झाली होती. जर्मनी, इटलीचा एक आणि इंग्लंड फ्रान्सचा एक अशा दोन गटामध्ये वेगवेगळे देश विभागले जात होते.

हे आत्ता पर्यंतच सर्वात घनघोर युद्ध असणार होत, फक्त युरोपियन देशांच्या पुरत हे युद्ध मर्यादित राहणार नव्हत. जगभर पसरलेल्या त्यांच्या वसाहतीमध्ये ही तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजू संभाव्य युद्धाच्या दृष्टीने आपआपला गट मजबूत करत होते. सहाजिकचं हिटलर यात आघाडीवर होता.

मात्र पूर्ण आशियामध्ये जर्मनीचा काहीच पाया नव्हता. या मानाने इंग्लंडच्या वसाहती आशियाभर पसरलेल्या होत्या. सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय उपखंडावर इंग्रजांच राज्य होतं. पूर्ण जगावर राज्य करायचं स्वप्न बघणारा अडोल्फ हिटलर वरवर तरी म्हणत होता की मला आशियामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीय पण ते काही खरं नव्हत.

ज्या आर्य वंशाचा त्याला अभिमान होता त्या आर्य वंशांची मुळे शोधत त्याच्या संशोधकांची एक टीम हिमालयात फिरत होतीच, हिटलर सुद्धा भविष्यात भारतावर आक्रमण करायचं झालं तर तिथे एक सुरक्षित ठाणे आपल्या हातात हवे म्हणून त्याचा प्रयत्न होता. आणि त्या दृष्टीने एकच योग्य ठिकाण होतं

“नेपाळ”

भारताच्या शेजारी हिमालयाच्या कुशीत लपलेला छोटासा देश. इंग्रजांचं थेट राज्य नाही पण नेपाळच्या राजांवर त्यांचा वचक होता. याचं नेपाळच्या गुरखांची गोरखा रेजिमेंट मात्र ब्रिटीश रॉयल आर्मी मध्ये सर्वात पराक्रमी म्हणून प्रसिद्ध. पहिल्या महायुद्धात लढताना त्यांनी जर्मन सैन्याचं बरच नुकसान केलं होतं. हिटलरला काहीही करून नेपाळला आणि गुरखा रेजिमेंटला दुसऱ्या महायुद्धात इंग्रजपासून दूर ठेवायचं होत.

१९३७ साली नाझी जर्मनीने नेपाळचे तेव्हाचे प्रधानमंत्री जुद्धा शमशेर जंग बहादूर राणा यांच्याशी संपर्क साधला.  त्यांना भूकंपा वेळी केलेल्या सहायता कार्याचा गौरव म्हणून ऑर्डर ऑफ स्टार ऑफ जर्मन रेड क्रोस हा पुरस्कार दिला, त्यासाठी एक विशेष डेलीगेशन काठमांडूला पाठवण्यात आले.प्रधानमन्त्री राणा त्यांच्या स्वागत प्रसंगी म्हणाले,

“हुशारी आणि दिलदारपणा यांचा सुरेख संगम म्हणजे हिटलर! जर्मनीला परत उभी करण्यामागे त्यांनी जे प्रयत्नं केले आहेत यापासून संपूर्ण जगणे प्रेरणा घेण्याची गरज आहे.  “

हिटलरसुद्धा नेपाळच्या या राणावर खूप खुश झाला. त्याने आपल्या प्रेमाचं प्रतिक म्हणून आपल्या देशात बनणारी आपली लाडकी मर्सिडीज कार त्यांना भेट म्हणून पाठवून दिली. जहाजाने ती मर्सिडीज मुंबई बंदरावर आली तिथून बिहार जवळच्या नेपाळ सीमेवर बीरभूम येथे पोहचली.

ही जगातली सर्वात महागडी कार हिटलरने पाठवून तर दिली मात्र ती कार चालवायला नेपाळ मध्ये पक्के रस्ते कुठे होते? 

बीरभूमपासून पुढे हिमालयाच्या पहाडीत वसलेल्या काठमांडूला जायला कारसाठी रस्ताचं नव्हता. खुद्द राजघराण्याला भेट मिळालेली गाडी पण   गाडी तिथेच उभी करण्यात आली. राणा जंगबहादूर यांना ती गाडी आपल्या राजवाड्यामध्ये हवीच होती. अखेर एक उपाय शोधून काढण्यात आला.

“नेपाळी हमालांनी खांद्यावर उचलून ती कार काठमांडूला आणणे.”

आज आपल्याला ऐकून हसू येईल पण असं खरोखर घडलं होतं. तेव्हा ही कार उचलून नेणाऱ्यापैकी धन बहादूर गोले यांनी काही वर्षापूर्वी दिलेल्या मुलाखती मध्ये तो अनुभव वर्णन करून सांगितलं आहे,

हिमालयात आढळणाऱ्या उंच उंच झाडांचा बुंधा कापून त्यांना एकत्र बांधून एक भलामोठा स्ट्रेचर बनवण्यात आला होता.  त्या स्ट्रेचरवर ही मर्सिडीज कार ठेवण्यात आली होती आणि जवळपास साठ ते पासष्ठ हमालानी काळजीपूर्वक तिला आपल्या खांद्यावर उचललं. रात्रंदिवस अनेक दऱ्याखोरे, हिमालयातून दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या पार करून ही वरात काठमांडूला पोहचली. अंदाजे पाच आठवडे लागले. याचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे.

 

“कार बघितल्यावर आम्हाला माहितही नव्हत की हे नेमक कसल यंत्र आहे. ड्राईव्हरनी किल्ली लावून तिला सुरु केलं आणि तीच धडधडन ऐकून आम्हाला वाटल की जादूने तिला जिवंतच केलं आहे.”

ही नेपाळमधली पहिली कार. तिथून नेपाळच्या राजघराण्याला भारी भारी कारचा शौक निर्माण झाला. पुढे १९५६ मध्ये नेपाळमध्ये पहिला पक्का रस्ता बनेपर्यंत अनेक वर्ष बऱ्याच अत्याधुनिक कार याच पद्धतीने उचलून काठमांडूच्या राजवाड्यात पोहचते करण्यात आल्या होत्या.

54abc7b5c2188
धन बहादूर गोले AFP PHOTO/Prakash MATHEMA

नेपाळचे राजे त्रिभुवन शाह, पंतप्रधान राणा जुद्धा जंग बहादूर यां दोघांनाही हिटलरकडून गाड्या मिळाल्या होत्या. यातली राजरथ म्हणून ओळखली गेलेली पहिली डेमलर मर्सिडीज बेंझ कार गेली काही वर्ष भारतातल्या डेहराडून येथे गंज खात मध्ये पडली होती. अखेर तिची  दुरुस्ती करून तिला काठमांडू येथे म्युझियममध्ये धन बहादूर सारख्या चिवट आणि मेहनती गुरखांच्या पाठीवर उभ्या राहिलेल्या नेपाळच्या विकासाचं प्रतिक म्हणून ठेवण्यात आल आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.