हिटलरचा पुतण्याच हिटलरच्या विरोधात लढलेला ; भाऊबंदकी कोणाला चुकल्या सांगा..

ॲडोल्फ हिटलर, जर्मनीचा हुकुमशहा. आपल्या विक्षिप्तपणामूळ अख्या जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या दावणीला बांधणारा व्हिलन. आज महासता असणाऱ्या अमेरिके पासून इंग्लंड रशिया फ्रान्स या सगळ्या देशांचा तो मोठा शत्रू. इंग्लंड अमेरिकेला तर तो पाण्यात बघायचा. जगावर राज्य करायचं स्वप्न बघणारा हिटलर, पण बांधावरच्या भाऊबंदकीपासून त्याची पण सुटका झाली नाही.

दुसऱ्या महायुद्धात त्याचा सख्खा सावत्र पुतण्या अमेरिकेच्या नौदलाकडून हिटलरच्या विरुद्ध लढला.

हिटलरचा पुतण्या कोण होता? तो अमेरिकेकडून का लढला? काय आहे हिटलर घराण्याची भाऊबंदकी? यासाठी आधी तुम्हाला हेळव्यासारखं हिटलर घराण्याचा पूर्ण वंशाचा इतिहास सांगितला पाहिजे.

खर म्हणजे जर्मनीमध्ये हिटलर आडनावाच एक पण घर नव्हत. हिटलरचे वडील अ‍ॅलॉईस हे मुळचे ऑस्ट्रियाचे. तेव्हा ते जर्मन साम्राज्याचा एक भागच होते.

या अ‍ॅलॉईसचे खरे वडिल कोण याचा पत्ताच नव्हता. हिटलरच्या आज्जीने म्हणजेच मारिया शिकेलग्रुबरने तरुणपणी केलेल्या चुकीतून अ‍ॅलॉईस यांचा जन्म झाला होता. यामुळे  अ‍ॅलॉईसच्या नावामागे त्यांच्या आईचचं शिकेलग्रुबर हेच आडनाव लावलं जाई.

पुढे मारियाने वयाच्या ४२व्या वर्षी जोहान जॉर्ज हिडलर नामक व्यक्तीशी लग्न केले. हिटलरच्या पप्पांना सावत्र बाप मिळाला. याच बापाच्या हिडलर या नावामध्ये बदल करून अ‍ॅलॉइसने हिटलर हे स्वतःचे  नामकरण केले.

हा अ‍ॅलॉईस हिटलर कस्टम्स मध्ये काम करायचा. तिथे त्याचे अनेक अफेअर्स चालायचे. यातूनच एका अनौरस मुलीचाही जन्म झाला होता. लग्न मात्र त्याने एका मोठ्या वयाच्या श्रीमंत बाईशी केले. अ‍ॅलॉईसच्या रंगेल वृत्तीमुळ हे लग्न काही खूप दिवस टिकलं नाही.

त्यानं दुसर लग्न आपल्या  एका गर्लफ्रेण्डशी केलं. तीच नाव फ्रानिस्का मझेलबर्गर. हिला दोन मुले झाली, अ‍ॅलॉईस ज्युनिअर नावाचा मुलगा आणि एंजेला नावाचा मुलगी.

या लग्नानंतरसुद्धा अ‍ॅलॉईस यांची वासुगिरी थांबली नाही. त्यांनी आपल्या मोलकरणीवर डोळा ठेवला. ही मोलकरीण त्यांच्या नात्यातलीच होती. क्लारा तिचं नाव. तीसुद्धा अ‍ॅलॉईसच्या प्रतापामुळे प्रेग्नंट झाली. दरम्यान त्याची दुसरी बायको आजारी पडून मेली होती.

अ‍ॅलॉईसने क्लारा बरोबर लग्न केले. यांना पाच मुले झाली त्यातली दोनच जगली. यातल्या मुलाचे नाव ॲडोल्फ.

क्लाराने आपल्या सख्या मुलांबरोबर अ‍ॅलॉईसच्या आधीच्या बायकोच्या मुलांचाही संभाळ केला.अ‍ॅलॉईस अतिशय रागीट होता.लहानपणी रोगट असलेल्या अ‍ॅडोल्फचं आपल्या बापाबरोबर कधीच पटलं नाही.

klara alois hitler
हिटलरचे आईवडील

अ‍ॅलॉईस हिटलर सिनियर लवकरच वारले. त्यांच्या मुलींची लग्ने लावून देण्यात आली. हिटलर आडनाव असलेली उरली दोन मुलं. मोठा अ‍ॅलॉईस ज्युनिअर आणि अ‍ॅडोल्फ. यातला अ‍ॅलॉईस गेला  कामाच्या शोधात इंग्लंडला. तीथच त्याने एका इंग्लिश मुलीशी लग्न केलं. त्यांना मुलगा झाला त्याच नाव विल्यम पॅट्रीक हिटलर.

हा विल्यम हिटलर मोठा झाल्यावर कामाच्या शोधात आपल्या काकाकडे जर्मनीला आला.

अ‍ॅडोल्फ हिटलर तेव्हा जर्मनीतला मोठा नेता बनला होता. त्याने कधी लग्न केलं नाही. असं म्हणतात त्याचं आपल्या सावत्र बहिणीच्या मुलीशी जेली रुबेलशी अफेअर होत. पण कोणीही याची खात्री देत नाही.

याच जेली रुबेलच्या शिफारसीमुळे विल्यमला हिटलरने नोकरीला लावून दिले. पुढे थोड्याच दिवसात तो जर्मनीचा हुकुमशहा बनला. विल्यमला सुद्धा ओपल कार फॅक्टरी मध्ये नोकरी मिळाली. जेली रुबेलने तोवर आत्महत्या केलेली. विल्यमला एक सावत्र भाऊ देखील होता. तो नाझी आर्मी मध्ये होता.

विल्यमला सुद्धा आपल्या सावत्र भावाप्रमाणे मोठा अधिकारी बनायचं होत. यासाठी तो कायम हिटलरला आपल्या घराण्याच्या काही सिक्रेट्स मिडियापुढे सांगेन म्हणून ब्लॅकमेल करायचा. असं म्हणतात यापैकी एक सिक्रेट हिटलर हा शुद्ध आर्य वंशाचा नसून त्याच्यात ज्यू रक्त आहे हे होत.

हिटलर यामुळे आपल्या पुतण्यावर कायम दातओठ खाऊन असायचा. त्याला आपली खरी ओळख सांगायची देखील परवानगी नव्हती. अशातच एक दिवस विल्यमचा काटा काढायचं ठरलं. पण विल्यमला आपल्या काकाच्या प्लॅनचा सुगावा लागला. तो आपल्या आईकडे लंडनला पळून आला.

विल्यमला आपल्या काकाबद्दल अतोनात राग होता . त्याने हिटलरविरुद्ध WHY I HATE MY UNCLE असा लेख लिहिला.

तो लेख वाचून हिटलरच्या तळपायाची आग मस्तकाला गेली पण तो काहीच करू शकत नव्हता. तरीही अनेक गुप्तहेर विल्यमला मारण्यासाठी लंडनमध्ये फिरत होते.

अखेर जीव वाचवण्यासाठी विल्यम आपल्या आईला घेऊन अमेरिकेला आला. तोवर दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले.

हिटलरच्या विरुद्ध लढायला मिळावे म्हणून विल्यमला अमेरिकन सैन्यात दाखल व्हायचे होते. पण त्याचे हिटलर हे आडनाव बघून त्याला कोणीच नोकरी द्यायचे नाहीत. अखेर त्याने डायरेक्ट अमेरिकेचे प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनाच पत्र लिहिले. यात नोकरीची याचना होती. अखेर रूझवेल्ट यांनी ही मागणी मानली.

WillieHitler

विल्यम पॅट्रीक हिटलरला १९४४साली अमेरिकन नौदलात त्याला फार्मासिस्ट मेट म्हणून नोकरी मिळाली. दुसऱ्या महायुद्धात त्याने अमेरिकन नेव्हीसाठी शौर्य गाजवले याबद्दल त्याला पर्पल हार्ट मेडल सुद्धा मिळालं.

युद्ध संपलं तेव्हा हिटलर घराण्याचा तो एकमेव सदस्य जिवंत होता. त्याच्या सावत्र भावाला रशियन आर्मीने उडवला होता . तर त्याचा काका जर्मनीचा फ्युरर अ‍ॅडोल्फ हिटलरने पराभूत झाल्यामुळे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. सगळ्या जगाचे शाप त्याला लागले होते.

हिटलर हे नाव म्हणजे एक शिवी बनली होती. १९४७ मध्ये विल्यमने आपले हिटलर हे आडनाव बदलून स्टूअर्ट हाउस्टन करून घेतले. त्यानंतर हिटलर हे नाव कायमचे नामशेष झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.