छळछाववणीत ज्यूंची अमानुष कत्तल करणाऱ्या हिटलरचं पहिलं प्रेम एक ‘ज्यू’ मुलगी होती…?

अॅडॉल्फ हिटलर. जगातला सर्वात क्रूर हुकुमशहा.

हिटलर जेवढा क्रूर हुकुमशहा म्हणून आपल्याला माहित असतो, तेवढाच तो आपल्या छावण्यांमधील गॅस चेंबरमध्ये लाखो ज्यूंची कत्तल करणारा क्रूरकर्मा म्हणून देखील माहित असतो.

हिटलरने ज्यूंच्या नाशासाठी कंबर कसली होती. जर्मनीचा प्रमुख म्हणून इतर देशांवर आक्रमण करून त्याने जे जे देश जिंकले, त्या देशातल्या ज्यूंची रवानगी त्याने आपल्या छळछावण्यांमध्ये केली.

गॅस चेंबरमध्ये घालून लाखो ज्यू स्त्री-पुरुष आणि बालकांचा देखील संहार करायला त्याने मागे-पुढं पहिलं नाही. तो कट्टर वंशवादी होता. अशुद्ध,आजारी,अशक्त लोकांना संपवणं हे त्यांचं संरक्षण करण्यापेक्षा अधिक मानवतावादी आहे, असं तो मानायचा.

ज्युंबद्दल मनात इतका विखार घेऊन जगणाऱ्या हिटलरचं पहिलं प्रेम मात्र एक अशी मुलगी होती, जिच्या आडनावावरून ती ज्यू असल्याचा आभास व्हायचा. हिटलरचा किशोरवयीन मित्र असलेल्या ऑगस्ट कुबिझेक याने आपल्या ‘द यंग हिटलर आय क्न्यू’ या पुस्तकात हिटलरच्या पहिल्या प्रेमाविषयी आणि हिटलरसोबत घालवलेल्या दिवसांविषयी लिहिलंय.

कुबिझेक यांच्या दाव्यानुसार हिटलर ऑस्ट्रियात असताना स्टेफनी इसॅक नावाच्या ज्यू मुलीच्या प्रेमात पडला होता. विशेष म्हणजे त्यावेळी स्टेफनी ही ज्यू आहे किंवा नाही याच्याशी हिटलरला काहीच देणं-घेणं नव्हतं.

१९०५ सालच्या एका संध्याकाळी हिटलरसोबत फेरफटका मारत असताना त्याने आपल्याला एका मुलीविषयीचं मत विचारलं होतं आणि आपण त्या मुलीच्या प्रेमात असल्याचं सांगितलं होतं, असं कुबिझेक यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय.

अतिशय सुंदर डोळे असणारी ती मुलगी अतिशय चांगल्या घरातली असावी, एवढंच त्यावेळी हिटलर आणि कुबिझेक यांना माहित होतं. त्यामुळे तिला बघण्यासाठी ती दोघं रोज संध्याकाळी ५ वाजता ती येण्याची वाट बघत रस्त्यावर थांबत असत. पण तिला मात्र या गोष्टीची पूसटशी देखील कल्पना नव्हती.

हिटलर त्यावेळी १६ वर्षांचा होता आणि स्टेफनी १७ वर्षांची.

१९०५ ते १९०९ अशी ४ वर्षे हिटलरच्या आयुष्यात फक्त तेवढीच एक मुलगी अस्तिवात होती. तिच्याभोवतीच हिटलरचं जग होतं. तिच्यासाठी हिटलरने कितीतरी प्रेमकविता देखील लिहिल्या होत्या. पण हे सगळं एकतर्फी होतं. ४ वर्षांच्या काळात हिटलर साधं जाऊन तिला बोलायचं धाडस देखील करू शकला नाही.

हिटलरच्या मते दोघेही (तो स्वतः आणि स्टेफनी) ही असामान्य माणसं होती आणि ती दोघे भेटल्यानंतर त्यांना सामान्य माणसासारखं संवादासाठी शब्दाचा आधार घ्यावा लागणार नव्हता. शब्दाशिवाय त्यांच्यातला संवाद पार पडणार होता.

हिटलरला डान्स हा प्रकार अजिबात आवडायचा नाही, त्यामुळे त्याला जेव्हा असं समजलं की स्टेफनीला डान्समध्ये खूप रुची आहे त्यावेळी चिडलेल्या थेट तिला पळवून नेण्याचीच योजना बनवली होती.

हिटलरच्या योजनेनुसार तो स्टेफनीला पळवून घेऊन जाताना कुबिझेकवर तिच्या आईला बोलण्यात गुंतवून ठेवण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. पण पळून गेल्यानंतर राहायचं कुठे नि खायचं काय हा प्रश्न निर्माण झाल्याने त्याने आपली योजना रद्द केली.

त्यानंतर त्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा विचार केला होता, पण तिथे त्याला स्टेफनीने सुद्धा त्याच्यासोबत आत्महत्या करायला हवी होती. अर्थात ही नैराश्यातून आलेली एक वेडी कल्पना त्यामुळे त्यावेळी तरी  असं काही झालं नाही, पण ४० वर्षांनी जेव्हा हिटलरने खरंच आत्महत्या केली तेव्हा त्याची त्यावेळची गर्लफ्रेंड आणि आत्महत्येच्या काही वेळापूर्वीच लग्न केल्याने झालेली पत्नी इव्हा ब्राऊनने देखील त्याच्यासोबत आत्महत्या केली. अशाप्रकारे हिटलरची मृत्यूबद्दलची ही कल्पना पूर्णत्वास गेली.

१९०६ साली एका फेस्टिव्हलमध्ये आलेल्या स्टेफनीने एक स्मित करून एक पॉपी हिटलरच्या दिशेने फेकली होती. त्याचा अर्थ हिटलरने ती आपल्यावर प्रेम करते असाच घेतला होता. मित्रांना देखील तो तसंच सांगत होता. त्यावेळी हिटलरला आपण जेवढं आनंदी बघितलं, तेवढं पुन्हा कधीच बघितलं नाही, असं कुबिझेक यांनी लिहिलंय.

स्टेफनीच्या या अतिशय निरागसपणे केलेल्या एका कृतीमुळे मात्र तिच्या अपहरणाचा आणि तिच्यासोबतच्या आत्महत्येचा विचार हिटलरच्या डोक्यातून गेला. त्याने लग्नानंतर आपलं घर कसं असेल याची देखील योजना बनवली होती.

हिटलर कायम आपण स्टेफनीशी ‘उद्या’ बोलू असं म्हणायचा, पण अनेक महिने आणि वर्षे गेली पण हा ‘उद्या’ कधी उगवलाच नाही. हिटलर स्टेफनीशी कधी बोललाच नाही.

नंतर अनेक वर्षांनी  ही बाब देखील समोर आली की स्टेफनीचं आडनाव जरी ज्यू लोकांच्या आडनावाशी साधर्म्य दाखवणारं असलं तरी ती ज्यू नव्हती. अर्थात ही गोष्ट काही त्यावेळी हिटलर आणि कुबिझेक या दोघांनाही माहित नव्हती.

शिवाय कुबिझेकने आधीच म्हंटल्याप्रामाणे तशी ती ज्यू होती किंवा नव्हती, याच्याशी हिटलरला काहीच देणं-घेणं नव्हतं. तो फक्त तिच्या प्रेमात होता. पुढे चालून ज्यूंचा कर्दनकाळ ठरलेल्या हिटलरच्या मनात किमान किशोरावस्थेत तरी ज्यूंविषयी कसलाही मत्सर किंवा तिरस्कार नव्हता, ही गोष्ट इथे नक्कीच अधोरेखित होते.

स्टेफनी आणि हिटलर एकत्र येऊ शकले नाहीत. पण जर तसे ते एकत्र आले असते तर हिटलरचं चित्र काही वेगळं असू शकलं असतं का…? स्टेफनीचं प्रेम  हिटलरला  क्रूरकर्मा बनण्यापासून वाचवू शकलं असतं..? की १९४५ साली बर्लिनमध्ये हिटलरसोबत आत्महत्या केलेल्या इव्हा ब्राऊनची जागा स्टेफनीने घेतली असती..? प्रश्न अनेक उपस्थित होतात, पण इतिहासात डोकावताना तसाही जर-तरला काहीच अर्थ नसतो म्हणा.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.