ट्रॅक्टर पासून ते घड्याळ बनवणारी एक सरकारी कंपनी देश की धडकन म्हणून ओळखली जायची

इंग्रज येण्यापूर्वी भारताला सोने की चिडीया म्हणून ओळखलं जायचं. इथं तयार होणारी उत्पादने जगभरात निर्यात व्हायची. भारतीय कारागिरांच्या कौशल्याला जगभरात तोड नव्हती. समृद्ध भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली.

शेवटच आक्रमण व्यापारी बनून आलेल्या इंग्रजांनी केले आणि भारतीय उद्योग बंद पाडले. असंख्य कारागीर देशोधडीला लागले. ब्रिटिशांची १५० वर्षांची गुलामी हे भारताच्या विनाशाचे प्रमुख कारण ठरले.

१५ ऑगस्ट १९४७ साली इंग्रज जेव्हा परत गेले तेव्हा भारत एक दरिद्री देश उरला होता.

बहुतांश गोष्टी आपल्याला युरोपमधून आयात कराव्या लागत होत्या. इंग्रजांनी रेल्वेसारखा काही मोजका विकास केला होता मात्र तोही स्वतःच्या फायद्यासाठी. जे काही उद्योग त्यांच्या काळात उभे राहिले होते ते फक्त श्रीमंतांसाठी.

भारताच्या नवनिर्मात्यांनी जिद्द केली होती,

“छोट्याशा सुई पासून ते अंतराळयाना पर्यंत प्रत्येक गोष्ट भारतात बनवायची, पुढच्या पिढ्यांना कोणापुढे हात पसरायला लागू नये.”

पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान बनले. समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी अनेक सरकारी कंपन्याची स्थापन केल्या. यातच होती,

हिंदुस्थान मशीन टूल्स उर्फ एच एम टी

७ फेब्रुवारी १९५३ रोजी एच एम टी ची स्थापना झाली. मशीन टूल्स मधली भारतातली ही अग्रगण्य संस्था बनवायचं नेहरूंच ध्येय होतं. ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्टस पासून अनेक वस्तूंची निर्मिती कर्नाटकातल्या बेल्लारी येथील कारखान्यात होऊ लागली.

मात्र त्यांचं सर्वात गाजलेलं प्रोडक्ट होतं, एचएमटी वॉचेस

१९६१ साली बेंगलोर येथे जपानच्या सिटीझन कंपनीच्या सहकार्याने घड्याळाचा कारखाना सुरू करण्यात आला. हाताने बनवलेल्या खास घड्याळाच्या पहिल्या बॅचचं पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

एचएमटी जनता हे घड्याळ अगदी काही दिवसात घरोघरी गाजलं.

रिस्ट वॉच ही एकेकाळची चैन भारतीयांच्या आवाक्यात आली. त्याकाळच्या प्रत्येक सर्वसामान्य नोकरदारांच्या हातात एचएमटी जनता हे घड्याळ दिसू लागले.

हे सोडून कांचन, चिनार ही महागडी घड्याळे सुद्धा HMT बनवत होते.

फक्त भारतच नाही तर परदेशातही त्याची निर्यात होत होती

घड्याळे म्हटलं की जगभरात स्वित्झर्लंडचं नाव घेतात. रोलेक्स पासून ते ओमेगा, टॅग ह्युअर पर्यंत अनेक स्विस घड्याळ कंपन्या जगावर राज्य करतात.

अशा वेळी या सरकारी भारतीय कंपनीने स्विस कंपन्याना फाईट दिली होती.

त्यांची टॅगलाईन होती देश की धडकन

HMT घड्याळाचं वैशिष्ट्य म्हणजे ते साधे सुटसुटीत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते टिकाऊ होते. काहीही झालं तरी HMT ची टिकटिक कधी थांबणार नाही याचा सगळ्यांना विश्वास असायचा.

आजही आपल्या पैकी अनेकांच्या घरी आजोबांचं हे घड्याळ टिकटिक करताना हमखास दिसेल.

HMT चे ट्रॅक्टर देखील तुफान गाजले.

सुरवातीला झेकटर या युरोपियन कंपनीबरोबर HMT चा करार झाला होता. दोघे मिळून ट्रॅक्टर बनवत होते. पुढे HMT ने स्वतःच ट्रॅक्टर बनवण्यास सुरवात केली. त्याची किंमत मुद्दामहून कमी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हे ट्रॅक्टर खेडोपाडी प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगणात दिसू लागले.

पारंपरिक भारतीय शेतीला आधुनिक बनवण्यास या ट्रॅक्टरचा सिंहाचा वाटा आहे.

एक काळ गाजवलेली ही HMT कंपनी एकविसाव्या शतकाच्या वेगात मागे पडू लागली. जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करणे त्यांना जमले नाही. सरकारी अनास्था देखील त्याच्या अधोगतीस कारणीभूत ठरली.

२००० साला पासून HMT तोट्यात जात होती.

कोणतेही सरकार आले तरी त्यांनी या भारताच्या अभिमान समजल्या जाणाऱ्या कंपनीला आधुनिक करण्यास काहीही प्रयत्न केला नाही.

२०१२-१३पासून कंपनीचा निव्वळ तोटा २४२ कोटी ४७ लाखपर्यंत वाढला होता. २०११ मध्ये तो २२४ कोटी ४ लाख इतका होता. कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी सरकारला अर्थसंकल्पात ६९४ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करावी लागत होती.

नुकसानाच्या गर्तेत गेलेल्या HMT ला सप्टेंबर २०१४ साली मोदी सरकारने बंद करण्यास सुरुवात केली.

सर्व प्रथम घड्याळ निर्मितीची टिकटिक बंद झाली पाठोपाठ ट्रॅक्टर व इतर कारखाने बंद झाले. आता काही संरक्षण दलासाठी लागणारे स्पेअरपार्टस बनवण्यापुरती HMT शिल्लक राहिली आहे. जे स्वप्न बघून या कंपनीची निर्मिती झाली ते गेल्या सत्तर वर्षात पूर्णपणे विस्कटून गेले हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.