घरचे सोशल मीडियावर आले आणि आपला बाजार उठला…

तसा लय प्रायव्हेट किस्सा आहे, पण तुम्हाला सांगायला काय हरकत नाय. पुण्याच्या कॉलेजात एका पोरीशी सूत जुळलं. ज्ञान प्रबोधिनीची गल्ली, एफसी रोड आणि सेंट्रलच्या पुलावर (ओरिजनल पुणेरी पोरं झेड ब्रिजवर जाऊ शकत नाहीत) आमचं प्रेम फुललं. आपण लय हुशार नाय, पण घरी जरासाही संशय आला नाही, एकदम सुममध्ये दिवाळी सुरु होती. मग एक दिवस ती म्हणाली, आपली टू इयर ॲनिव्हर्सरी आहे, सेलिब्रेट करायला केपीला जाऊ. केपी म्हणजे कोरेगाव पार्क… पुण्याचं ॲमस्टरडॅम. आपण गेलो, लय पैसे घालवून आणि कायतर बेचव खाऊन आलो. 

मॅटरची रम्मी जरा नंतर झाली, तिनं एकदम चिकटलेला फोटो आणि मधाळ कॅप्शन टाकून इन्स्टा स्टोरी टाकली आणि आपण फॉर्म फॉर्ममध्ये रिपोस्ट केली. लय जणांनी अभिनंदनाचे मेसेज पाठवले, एक मेसेज आला फक्त प्रश्नचिन्हांचा. ओपन करुन पाहिलं, तर प्रोफाइल फोटो नव्हता, पण आडनाव सेम.. जरा निवांत होऊन पाहिल्यावर कळलं की आपली मदर आहे. खोटं नाय बोलत शेठ, घरी जाण्यापेक्षा रुम भाड्यानी घेऊन राहावं वाटत होतं.

मदर, मावशी, आत्या ही लोक फेसबुक व्हॉट्सअपवर आहेत, हे माहीत होतं पण इन्स्टाग्रामही काबीज केलंय म्हणजे आपला बल्ल्याच की…

तर कसंय हा प्रॉब्लेम आपल्यापैकी लय जण फेस करतायत. घरचे सनासना फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट काढतायत आणि आपल्या प्रायव्हसीला अगदी किरकोळीत चंदन लागतंय. बरं घरचे नुसतं अकाऊंट उघडून थांबणार नाहीत, आपल्या फोटोवर कमेंट करणार, एखाद्या मैत्रिणीनी जरा पप्पीवाला इमोजी टाकला असेल तर, ‘ती कोणे?’ असले प्रश्न विचारणार, लग्न ठरत नसलं तर फेसबुक फ्रेंडलिस्टमधली स्थळं दाखवणार, चुकून रात्री ऑनलाईन घावलोच, तर सुट्टीच नाही. आपण सुपारी अडकित्त्यात घावते, तसले पद्धतशीर घावतो.

किती टक्के पालक सोशल मीडिया वापरतात?

तर फेब्रुवारी २०२१ मध्ये एक आकडेवारी प्रदर्शित झाली होती, त्यानुसार भारतात ३९,७८,००,००० फेसबुक युझर्स आहेत. त्यात ७४.६ टक्के पुरुष आहेत, तर २५.४ टक्के महिला आहेत. यात सगळ्यात जास्त मार्केट २५ ते ३४ वयोगटातल्या लोकांचं आहे, तर ३५ ते ४४ या वयोगटात १३.३ टक्के वापरकर्ते आहेत. ४५ ते ५४ मध्ये ५.४ टक्के वापरकर्ते आहेत, तर ५५ ते ६४ मध्ये २.४ टक्के. आकडे तसे कमी वाटत असले, तरी हे आपल्या आई-वडिलांच्या वयाचे कार्यकर्ते लय मोठा दंगा करु शकतात. इन्स्टाग्रामवर आई-वडिलांच्या वयाची लोकसंख्या आहे, ३५ ते ४४ मध्ये ८.४ टक्के आणि ४५ ते ५४ मध्ये ३.२ टक्के. पुन्हा एकदा सांगतोय आकड्यांवर जाऊ नका, ही गॅंग शेरलॉक होम्सला पण ट्युशन देऊ शकतेय, इतकी डेंजर आहे.

आता आपला बाजार कसा उठतो?

लडतरींसोबतचे फोटो घावू शकतात, उगं पार्टीला गेलो आणि ग्लास बिस दिसले तर संपला विषय. आपण सॅड स्टेट्स टाकला की घावणार, घरी खोटं बोलून ऑनलाईन राहिलो तरी बल्ल्या फिक्स. कुठं काय आगाऊ कमेंट केली, शिव्या-बिव्या दिल्या तर घरचे बघणार… अरारारारा सगळी लाजच जाणार. त्यात तुमच्या घरचे आणखी खुंखार असले, तर संन्यास घ्यावा वाटणार हे नक्की.

मग यातून वाचायचं कसं?

तुम्ही घरात शेळी आणि सोशल मीडियावर लईच तुर्र्म खान असाल, तर भावांनो आणि बहिणींनो घरच्यांना डायरेक्ट ब्लॉक मारा, उगा त्यांच्या जीवाला घोर लावू नका. पोस्ट टाकताना कस्टम सेटिंग्स करता येतात, म्हणजे आपण हे ठरवू शकतो तेवढ्याच लोकांनी आपली पोस्ट दिसणार. दुसरं अकाऊंट काढा जिथं घरातली नसतील. याचा पण कंटाळा येत असेल, तर एकदम सिम्पल, घरचे कावतील असला कंटेंट टाकूच नका. निवांत श्रावणबाळ बनून राहा, नायतर ज्या काय लडतरी कराल त्या घरच्यांना सांगून करा. म्हणजे कसं लई लोड येत नाय.

हे वाचणाऱ्या आई, वडील, मामा, काका, मावशी, आत्या यांना ॲजे प्रतिनिधी म्हणून आमचा एकच सल्ला आहे. तुमची पोरं सोशल मीडियावर आगाऊ वाटली तरी हा आगाऊपणा कॉमन आहे, उगा लोड घेऊ नका. जमलं तर पोरांना ऑकवर्ड तेवढं करु नका…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.