भाऊंचा छंद काय तर… मेलेले तलाव जिवंत करणे

सीव्ही स्वतः लिहायचा असतो हे कधी माहीतच नव्हतं . एक कोणतरी नेटवरून कॉपी करणार अन् बाकीचे मग त्याच्यात आपल्या शाळेचं नाव आणि मार्क्स तेवढं बदलणार. स्ट्रेंथ असू दे की हॉबी सगळयांची सेमच. रिडींग बुक्स आणि ट्रेकिंग याच्या पलीकडं लिहण्यासारखं काय आठवलंच नाही. मात्र बरीच टाळकी अशी असायची जी प्याराग्लायडिंग,स्कुबा डायविंग सारखी अवघड नावं लिहायची. पण ती हॉबी पेक्षा जास्त दिखावा आहे हे कळून यायचं.

पण बंगलोर मधल्या आनंद मल्लिवाड यांचा मात्र नादंच वेगळा.

मेकॅनिकल इंजिनीअर असलेले आनंद मल्लीवाड हे १९९६ पासून बेंगळुरू इथं राहतात.

त्यांच्या लहानपणी त्यांनी बंगलोरमध्ये आताच्या तुलनेत बरेच तलाव पहिले होते. मात्र शहर जसं मोठं होतंय तसाच हे तलाव बारके होतायेत त्यातले काही तर कायमचेच बुजवून टाकले जातायत हे आनंदभाऊ बघत होते.

आनंदभाऊंचं निरीक्षण तसं बरोबरच होतं.एक काळ असा होता जेव्हा बेंगलोरला तलावांचं शहर म्हटलं जायचं. तेव्हा कर्नाटकच्या राजधानीत जवळपास एक हजार तलाव होते.

 १९६० मध्ये, बेंगळुरूमध्ये सुमारे २८० तलाव होते, परंतु आज त्यांची संख्या ८०च्या आसपास आहे, त्यापैकी फक्त दोन डझन तलाव म्हणनाच्या लायकीचे.

आज बेंगळुरूमधील पाण्याची पातळी धोकादायकरित्या खाली गेलीय एवढी की जिथे भूजल संपेल अशा शहरांच्या यादीत या शहराचं नाव आहे.

हे आपल्या डोळयांदेखत होत असल्यानं लहानपणापासून बेंगलोर मध्ये वाढलेले आनंदभाऊ अस्वस्थ होते. २०१६ मध्ये, सांसेरा इंजिनीअरिंगमध्ये काम करत असताना, बंगळुरूमधील अनेकांप्रमाणेच मल्लीवाड यांना समजले की त्यांच्या शहरात लवकरच पाणी संपणार आहे. त्यांनी याबद्दल लोकांच्यात जागृती करायला सुरवात केली मात्र त्याचा काय उपयोग झाला नाही.

मग आनंदभाऊ स्वतः ऍक्शन मोड मध्ये आले.सुमारे सहा महिन्यांच्या संशोधनानंतर, मल्लीवाडने दुर्लक्ष आणि अतिक्रमणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेला ३६ एकरचा तलाव निवडला.

या तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम त्यांनी सुरू केलं. आनंदभाऊंनी मग ते काम करत असलेल्या कंपनीच्या सीएसआर फंडातून एक कोटीची देणगी मिळवली आणि अवघ्या ४५ दिवसात या तलावाला जिवंत केलं. सहा महिने रिसर्च आणि मग पुन्हा दीड महिना काम आणि ते हि सगळं बस अच्छा लगतां म्हणून त्यांनी हे काम केलं होतं. तलाव दुरुस्त कारण आता त्यांची हॉबीच झाली होती.

सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरून एकदा गटारीचं रूप आलेला तलाव निवडायचा आणि जोपर्यंत तो निळाशार होत नाही तोपर्यंत सुट्टी द्यायची नाही हे आनंदभाऊंच्या कामाचं स्वरूप.

३९ वर्षाच्या या व्यक्तीने आतापर्यंत ११ तलावांचे पुनरुज्जीवन केले आहे आणि सध्या ते आणखी तीन तलावांवर काम करत आहेत.

त्यांनी २०२५ पर्यंत बेंगळुरूमधील ४५ तलावांचं पुनरुज्जीवन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. बंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीदरम्यान ज्या ठिकाणी तलावांचे पुनरुज्जीवन झालं आहे त्या भागात पूर आलेला नाही, असा दावाही मल्लीवाड यांनी केला आहे.

बाकी आंनद मल्लीवाड यांच्या या कामामुळं बंगलोरकरांना त्यांच्या परिसरातच सेल्फी काढायला नॅचरल स्पॉट मिळालेत एवढं नक्की.

हे ही वाच भिडू :  

Leave A Reply

Your email address will not be published.