मुंबईच्या आधी भारतीय क्रिकेटवर होळकर टीमचं राज्य होतं.

१९३४ साली महाराजा  रणजित सिंह यांच्या नावाने सुरु झालेली रणजी ट्रॉफी ही भारतातली फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वात महत्वाची स्पर्धा मानली जाते. भारताच्या राष्ट्रीय टिममधले बहुतांश खेळाडू याच रणजी ट्रॉफीमधल्या कामगिरीवरून निवडले जातात. इंग्लिश कौंटी स्पर्धांशी याची तुलना केली जाते.

स्वातंत्र्यापूर्वी इंग्लिश कौंटी स्पर्धांच्या धर्तीवरच या स्पर्धांची सुरवात झाली. पहिल्या रणजी स्पर्धेत भारताच्या इंग्रजांची सत्ता असणाऱ्या प्रांताच्या टीम आणि लष्कर हे संघ उतरले होते. पुढे हळूहळू संस्थानच्या टीमने देखील यात सहभाग घेतला.

यात सहभागी होणाऱ्या पहिल्या टीमपैकी एक होती इंदौरच्या होळकरांची. तिला बनवलं होतं महाराज यशवंतराव होळकर (दुसरे) यांनी.

होळकर संस्थानचे महाराज आधुनिक विचारांचे होते. त्यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ इंग्लंडमध्ये व्यतीत केला होता. इतर राजे महाराजांप्रमाणे त्यांचंही क्रिकेटवर प्रेम जडलं होतं.

त्यांची क्रिकेटची आवड बघून त्यांच्या वडिलांनी म्हणजे महाराज तुकोजीराव होळकरांनी इंदौरमध्ये क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. आज इंदौरमध्ये जीएसआईटीएस कॉलेज आहे त्या जागी हा क्लब असायचा.

होळकर महाराजांनी टीमचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध लेग ब्रेक बॉलर एएस केनेडी आणि गुगली चे प्रणेता बीजेटी बोसांके यांना इंदौर मध्ये आमंत्रित केलं. बाहेरच्या खेळाडूंना देखील त्यांनी या क्लब मध्ये बोलावून घेतलं. सुपरससिद्ध बॉलर एस एम जोशी, अक्कलकोटचे जे जी नवले, जयपुरचे प्यारे खान  आणि तेजतर्रार फास्टर बलसारा हे या टीममध्ये जोडले गेले.

१९२३ साली तुकोजीराव होळकरांनी या टीम मध्ये सर्वात महत्वाचा खेळाडू आणला, तो म्हणजे कोट्टारी कनकैया नायडू म्हणजेच सी.के.नायडू.

सी के नायडू आपल्या जबरदस्त सिक्सर साठी ओळखले जायचे. होळकरांनी त्यांना आपल्या सैन्यात कर्नल या पदी दाखल केलं व यशवंत क्रिकेट क्लबची धुरा त्यांच्या हाती सोपवली. पुढे काहीच वर्षात सी.के. नायडू भारताचे पहिले कर्णधार बनले.

१९२६ साली जेव्हा एमसीसीचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता त्यावेळी नायडूंनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील बहुतांश सर्वोत्तम इनिंग खेळत अवघ्या ११६ मिनिटांमध्ये १५३ ठोकले होते. नायडूंच्या या इनिंगमध्ये एकूण ११ सिक्सर्सचा समावेश होता. या इनिंगसाठी त्यांना एमसीसीकडून बक्षीस म्हणून चांदीची बॅट मिळाली होती.

या महान खेळाडूच्या नेतृत्वाखाली होळकरांच्या टीमला भारतातील सर्वोत्तम टीम बनवण्याचे स्वप्न महाराजा तुकोजीराव आणि त्यांच्यानंतर यशवंतराव महाराजानी पाहिलं.

आपल्या खेळाडूंना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी होळकर महाराजांनी खबरदारी घेतली होती. या क्लबचे बॅट्स इंग्लंडच्या गन एंड मूर कंपनीमधून आणि बॉल ड्यूक कंपनीचे मागवले जायचे, खेळाडूंचे जर्सी मुंबईच्या एसक्विथ एंड लॉर्ड आणि कलकत्त्याच्या रेंकिन्स सारख्या शिलाई फर्ममधून खास बनवून आणले जाई. त्यांना भारताबाहेर देखील क्लब मॅचेस खेळण्यासाठी पाठवलं.

सी.के.नायडू यांनी भाऊसाहेब निंबाळकर,  चंदू सरवटे, खंडू रांगणेकर, हिरालाल गायकवाड, मुश्ताक अली,एमएम जगदाळे अशा अनेकांना घेऊन होळकर टीम आपल्या हातानी घडवली. यातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चमकले. मुश्ताक अली यांनी तर भारतातर्फे पहिलं शतक देखील ठोकलं होतं.

यशवंतराव महाराजांच्या प्रयत्नातून १९४१ साली होळकर संघ रणजी क्रिकेटमध्ये उतरला. 

पहिल्या रणजीपासून या स्पर्धेवर मुंबईचे राज्य होते. याला पहिली धडक दिली होळकरांनी. ते वर्ष होते १९४४. त्यावर्षी पहिल्यांदा होळकर टीम रणजीच्या फायनलला गेली होती. तेव्हा मुंबई कडून रुसी मोदी, विजय मर्चंट असे अनेक दिग्गज खेळाडू होते. त्यावर्षी फायनल ला मुंबईने होळकरांना हरवलं.

मात्र पुढच्या वर्षी सी.के.नायडू दुप्पट तयारी करून आले. होळकर टीमचा त्यावर्षीचा धडाका असा होता कि एकही टीमला त्यांच्या पुढे उभे राहता आले नाही. म्हैसूर टीम विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये तर होळकर टीम कडून ६ जणांनी शतक ठोकले. हा आजही एक विक्रम मानला जातो.

याच्यापेक्षा खास गोष्ट म्हणजे फायनलसाठी मुंबई विरुद्ध होळकर पुन्हा आमने सामने आले. यावेळी घरच्या मैदानात खेळणाऱ्या होळकरांनी मागच्या वर्षीचा बदला घेण्यासाठी कोणतीही कसूर सोडली नाही. पहिल्या इनिंगमध्ये होळकर संघाने ३४८ धावा काढल्या होत्या यापैकी २०० धाव फक्त कर्नल सीके नायडू यांनी बनवल्या होत्या.

इतकेच नाही तर दोन्ही डावात त्यांनी ५-५ विकेट घेतले. या सामन्यात नायडूंनी एक हाती मुंबईला धूळ चारली आणि ते सामनावीर ठरले. गंमत म्हणजे तेव्हा त्यांचं वय पन्नास होतं. क्रिकेटच्या भाषेत म्हातारपण आलेला हा खेळाडू बॅट आणि बॉलमध्ये  इतरांच्यापेक्षा कितीतरी पट पुढे होता.

त्या दिवशी अख्ख्या इंदौर संस्थानमध्ये दुसरी दिवाळी साजरी करण्यात आली. यशवंतराव महाराज स्वतः निवड समितीचे अध्यक्ष होते. ते प्रत्येक मॅचवेळी हजर होते. रणजी ट्रॉफी जिंकलेल्या संघावर त्यांनी बक्षिसांची खैरात केली. वडिलांच्या काळापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं.

पुढचे जवळपास १० वर्ष भारतीय क्रिकेटवर खऱ्या अर्थाने होळकर टीमने राज्य केलं.

या दहा वर्षात १९४८ चा अपवाद वगळता प्रत्येक रणजी मध्ये फायनलला पोहचले. पैकी ४ रणजी ट्रॉफी त्यांनी जिंकल्या. तर मुंबईला फक्त ३ रणजी ट्रॉफी जिंकता आल्या होत्या. मुंबईच्या खडूस खेळाडूंना वरचढ ठरणारे होळकर म्हणून देशभरात ओळखलं जात होतं. याच सगळं श्रेय सीके नायडू आणि यशवंतराव होळकर महाराज या दोघांना मुखत्वे करून जात होतं.

दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक बदल घडत होते. संस्थाने खालसा झाली.

प्रशासनाच्या सोयीसाठी राज्यांची पुनर्र्चना झाली. याचा प्रभाव क्रिकेटमध्ये देखील पडला. जुन्या संस्थानच्या रणजी टीम राज्यांच्या संघात विलीन करण्यात आल्या. याच नियमाला धरून १९५५ साली  होळकर संघ मध्यभारत संघात विलीन झाला. पुढे या राज्याचे नाव मध्यप्रदेश झालं.

पण होळकर संघाची क्रिकेटमध्ये जी दादागिरी होती ती या मध्यप्रदेशला कधी गाजवता आली नाही. त्यांना पहिली रणजी जिंकण्यासाठी १९९८ साल उजाडावे लागले. नायडू, मुश्ताक अली, खंडू रांगणेकर यांच्यासारख्या खेळाडूंची परंपरा असणाऱ्या या टीममधून एकही त्या तोडीचा खेळाडू निर्माण झाला नाही.

या महान संघाचा पाया रचणाऱ्या होळकर संस्थानच्या स्मरणार्थ इंदौरमध्ये होळकर स्टेडियम उभारण्यात आले असून आजही येथे आंतरराष्ट्रीय सामने होतात . 

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.