होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर भारताचं राष्ट्रपती भवन उभं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल व्हिस्टाच्या पुनर्विकास प्रकल्पाचं आज उद्घाटन होणार आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या परिसरात असलेल्या महत्त्वाच्या शासकीय इमारतींची या प्रकल्पांमधून पुनर्बांधणी होणार आहे. यात नवं संसद भवन, पंतप्रधानांचं कार्यालय आणि निवासस्थान, सचिवालय आणि आता कर्तव्यपथ असं नाव देण्यात आलेल्या राजपथाचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे.

पण ज्या राष्ट्रपती भवनापासून सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट उभं राहतंय, त्या राष्ट्रपती भवनाची जागा होळकरांच्या दानामुळं मिळाली आहे.   

मराठा साम्राज्याच्या अनेक वीरांनी शिवरायांची कीर्ती देशभर गाजवली. एक काळ असा होता उत्तर असो कि दक्षिण सारा प्रदेश मराठी घोड्यांच्या टापाखाली होता. राघोबादादा आणि मल्हारराव होळकर यांच्या सेनेने अटकेपार पेशावर पर्यंत भगवा झेंडा फडकवला होता. नागपुरच्या भोसलेंची दहशत बंगालपर्यंत पसरली होती तर महादजी शिंदेनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपली हुकुमत स्थापन केली होती.

ज्या वेगवेगळ्या सरदार घराण्यांनी मराठी सत्तेला महाराष्ट्राबाहेर नेल त्यातील प्रमुख नाव म्हणजे इंदूरचे होळकर. 

महापराक्रमी मल्हारराव होळकरांनी  माळवा प्रांतात स्थापन केलेलं हे घराण पुढे त्यांच्या सुनबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या परोपकारी राज्यकारभारामुळे पूर्ण देशात आदर्शवत ठरलं. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात अस्पृश्यता बंदी, हुंडा बंदी, सतीप्रथेला विरोध, आंतरजातीय विवाह असे अनेक प्रयोग केले. संपूर्ण माळवा प्रांतात रस्ते बांधले. देशभर मंदिरे बांधली, नदीवर घाट उभे केले. अहिल्यादेवींचे राज्य म्हणजे कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली.

पुढे यशवंतराव होळकरांच्या नेतृत्वाखाली परत देशभर होळकरांची घोडी दौडू लागली. इंग्रजांच्या तावडीतून मुघल बादशाहाला परत सत्तेत आणायचे प्रयत्न झाले. असं म्हणतात कि प्रकृतीने साथ दिली असती तर यशवंतराव होळकरांनी ब्रिटीशांना भारतातून हाकलून लावले असते. 

अशा या पराक्रमी होळकर घराण्यामध्ये १९०३ साली सत्तेत आले सवाई तुकोजीराव होळकर तिसरे. अल्पवयीन असल्यामुळे सुरवातीला ब्रिटीश रिजंटच्या देखरेखीखाली त्यांनी सुरवातीची काही वर्ष राज्यकारभार हाकला. यांच्या कारकिर्दीत राज्याच्या विकासाची अनेक कामे करण्यात आली. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयापासून ते अलिगढ विद्यापीठ, पुण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते अस्पृश्योद्धार समिती पर्यंत अनेक ठिकाणी लाखो रुपयांची देणगी दिली ज्याची आजच्या काळात किंमत अब्जावधीमध्ये असेल.

एवढच नाही तर मध्यप्रदेशात रेल्वे यावी यासाठी इंदूरच्या होळकर घराण्याच्या या महाराजाने ब्रिटीश सरकारला कर्जपुरवठा केला होता.

१९१० साली तुकोजीराव होळकर यांनी पहिल्यांदा युरोप दौरा केला. लंडनमधील वास्तव्यात असताना त्यांचे ब्रिटीश साम्राज्याचे नवनिर्वाचित सम्राट किंग जॉर्ज पंचम आणि त्यांच्या पत्नी क्विन मेरी यांची अनेकदा भेट झाली. दोघांच्यात चांगला संवाद स्थापन झाला. भारताचा एक तरूण राजा निम्म्या जगावर राज्य करणाऱ्या सम्राटाशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करतो हे एक नवलच समजल जात होत.

नोव्हेंबर १९११मध्ये तुकोजीरावांनी इंदूरचं राज्य अधिकृत रित्या आपल्या ताब्यात घेतल, त्यांचा राज्याभिषेक झाला. पुढच्याच महिन्यात पंचम जॉर्ज भारतात येणार होते. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या भव्य दरबारात कैसर ए हिंद अर्थात भारताचा सम्राट हा राज्याभिषेक करण्यात येणार होता.

१२ डिसेंबर १९११ रोजी हा दरबार भरला. संपूर्ण देशातून राजेमहाराजे गोळा झाले होते. मोठमोठे नजराणे घेऊन सम्राटाची भेट घेतली जात होती. सगळ्या राजांची बसण्यासाठी त्यांच्या संस्थानच्या मह्त्वानुसार व्यवस्था करण्यात आली होती, यात इंदूरच्या तुकोजीराजे होळकरांच विशेष स्थान होतं. या दरबारात पंचम जॉर्जनी भली मोठी घोषणा केली,

भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात येणार.

तोपर्यत इंग्रजांची भारतातली राजधानी कलकत्ता होती. भारताच्या मध्यवर्ती असलेल्या पुरातन काळापासून देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीला राजधानी हलवायची घोषणा तर केली पण तिथे आवश्यक सुखसोई उभा करणे गरजेचे होते.

मग ठरलं नवी दिल्ली नावाची नवी राजधानीच वसवायची. ही जबाबदारी देण्यात आली लॉर्ड ल्युटन्स याच्याकडे. त्याने भारताच्या संसदभवनापासून ते इंडिया गेट पर्यंत अनेक गोष्टी बांधल्या. यात सर्वात महत्वाची वास्तू होती, व्हाईसरॉयचा बंगला. एका अर्थे भारताचा मुख्य राजवाडा. इथे राहूनच व्हाईसरॉय अख्ख्या देशाचा राज्य कारभार हाकणार होता.

याचे ठिकाण नेमके कोणते असावे यावरून बरीच चर्चा झाली. तुघलकाबाद आणखी काही ठिकाणे विचारात घेतली होती पण ल्युटन्सला मुघलांच्या जुन्या दिल्लीच्या जवळच उभी असलेली रायसिनाची टेकडी.

असं सांगितल जात की होळकरांची रायसिना गावात प्रॉपर्टी होती, त्यांनी ती पंचम जॉर्जच्या शब्दाखातर व्हाईरॉयचा बंगला बांधण्यासाठी देऊन टाकली. जवळपास सतरा वर्ष या बंगल्याच काम सुरु होतं. पहिलं महायुद्ध आणि आणखी बर्याच कारणांनी बांधकाम रखडल होतं. पण ल्युटन्सने कोणतीही हयगय होऊ दिली नाही. १९३१ साली हा राजवाडा बांधून तयार झाला.

पुढे स्वातंत्र्यानंतर सी.राजगोपालाचारी हे पहिले भारतीय तिथे राहायला गेले. २६ जानेवारी १९५० रोजी राजेंद्रप्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती बनले आणि या बंगल्याचे नामकरण करण्यात आले राष्ट्रपती भवन.

तुकोजी होळकरांच्या इस्टेटीवर भारताचा अभिमान असलेल राष्ट्रपती भवन उभ आहेच पण असंही सांगतात की प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवनावरती राष्ट्रपतींच्या आगमन प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ जो झेंडा डौलाने मिरवत आणतात तो होळकरांचा राजेशाही झेंडा आहे.

ही फक्त तुकोजीरावांची किंवा होळकरांची नाही तर संपूर्ण  महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Kondiba Sitaram Tambe says

    आज होळकराचे वंशज कोठे आहेत .राजकारणात त्यांना काय किंमत आहे का हे प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतात.

  2. Bhagwan Prakash Narote says

    Aamhala tar garv ahe to dhangar samajatil Raja and ahilyabai holkar yanchya prakramacha…. Jai malhar

Leave A Reply

Your email address will not be published.