नांदेडमध्ये ज्या कार्यक्रमामध्ये पोलिसांवर हल्ला झाला ते ‘होला मोहल्ला’ नेमका काय आहे?
काल नांदेडमधील सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराच्या परिसरात होला मोहल्ला दरम्यान ३०० ते ४०० जणांच्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली. त्यात चार पोलिस जखमी झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सध्या तिथं कडक लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांकडून शिख समाजाच्या ‘होला मोहल्ला’ मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती.
यावर्षी हा कार्यक्रम गुरुद्वारामध्येच आयोजित करायचं ठरलं होतं, मात्र त्यानंतर देखील निशान साहिब प्रवेश द्वारासमोर आल्यावर काही भाविकांमुळे वातावरण तणावग्रस्त झालं आणि त्यात पोलिसांशी झटापट केली.
मात्र ‘होला मोहोल्ला’ हा कार्यक्रम नेमका आहे तरी काय?
आपल्या देशात जेवढे सण-उत्सव तेवढं त्यांना साजरं करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि परंपरा. या मग प्रत्येक भागानुसार, प्रदेशानुसार परंपरा बदलत जातात. होळीचा सण देखील अगदी त्याच प्रमाणं प्रत्येक भागात वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो.
शिख समाजात प्रत्येक वर्षी होळी दरम्यान धूलिवंदन दिवशी ‘होला मोहल्ला’ हा कार्यक्रम होतं असतो, आणि याला ऐतिहासिक महत्व देखील आहे.
शिख समाजाचे १० वे गुरु गोबिंद सिंह महाराज यांनी खालसा पंथाची स्थापना केल्यानंतर १७५७ साली होळीच्या दुसऱ्या दिवशी होला मोहल्ला नावाचा कार्यक्रम सुरु केला. श्री आनंदपुर साहिब इथल्या होलगढ नावाच्या ठिकाणावरून त्यांनी याची सुरुवात केली होती.
त्यापूर्वी देखील शिख समाजात होळी साजरी होत असायची, त्यात एकमेकांवर फुलं उधळून, गुलाल किंवा अन्य रंगाच्या उधळणीत हा सण साजरा होत असे. पण गुरु गोबिंद सिंग यांनी होळी सणाचं स्वरूप केवळ रंग खेळण्याइतकंच मर्यादित झाल्यामुळे या प्रथेमध्ये १६८० साली बदल केला.
खालसा समाचारचे संस्थापक भाई वीर सिंह ‘कलगीधर चमत्कार’ मध्ये लिहितात,
होला मोहल्ला हा एक प्रकारचा बनावट हल्ला असतो. ज्याच्यात पायी किंवा घोड्यावरून शस्त्रधाऱ्यांना दोन गटात विभागल जातं, आणि त्यांना एका विशिष्ट ठिकाणी हल्ला करण्यास सांगितलं जातं. वीर सिंह मोहल्ला शब्दाचा अर्थ सांगताना ‘मय हल्ला’ असा सांगतात. यात मय म्हणजे बनावट किंवा खोटा असा होतो.
लोकांमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी हा गुरूंचा त्यापाठीमागचा मूळ उद्देश होता.
१६८० साली गुरु गोबिंद यांनी दोन गट बनवून एका गटाला सफेद वस्त्र घालायला दिलं आणि दुसऱ्या गटाला केसरी. या नंतर गुरूंनी एका गटाला होलगढवर नियंत्रण मिळवायला सांगितलं आणि दुसऱ्या गटाला पहिल्या गटाकडून होलगड सोडवून आणण्यास सांगितलं. अट अशी होती की, कोणालाही कसलीही शारीरिक हानी न देता.
त्यावेळी बाण, बंदूक अशी हत्यार बाळगण्यास मनाई केली गेली. कारण दोन्ही फौजा या गुरुनींच तयार केल्या होत्या. अखेरीस केसरी वस्त्र घातलेला गट होलगडवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाला.
गुरु गोबिंद सिंग यांना देखील हा बनावट हल्ला प्रचंड आवडला. त्यानिमित्तानं त्यांनी त्यावेळी दोन्ही फौजेमधील योद्ध्यांना गोड-धोड करून घातलं होतं. त्या दिवसानंतर आजतागायत आनंदपुर साहिब मधील ‘होला मोहल्ला बघण्यासाठी विविध भागातून लोकं आवर्जून येत असतात.
त्यावेळी हत्ती, घोड्यांवरील शास्त्रधारी योध्यांवर गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली जाते.
कवी निहालसिंग यांनी होला मोहल्लाच्या बाबतीत खूपच सुंदर शब्दांमध्ये लिहून ठेवलं आहे. ते म्हणतात,
बरछा ढाल कटारा तेगा,
कड़छा देगा गोला है।
छका प्रसाद सजा दस्तारा,
और करदौना टोला है।
सुभट सुचाला और लखबांहा, कलगा सिंह सू चोला है।
अपर मुछहिरा दाड़ा जैसे तैसे बोला
होला है।
आनंदपुर साहिबमधील यंदाच्या होला मोहल्लासाठी तब्बल ४००० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले होते. या दरम्यान चरण गंगा स्टेडियम निहंग सिंह घोड्यांची स्पर्धा, गतका बाजी आणि तिरंदाजी असे विविध खेळ दाखवले जातात.
एकूणच शिख धर्मीयांमध्ये होला मोहल्ला कार्यक्रमास विशेष महत्त्व असल्याचं दिसून येत. नांदेडमधली होला-मोहाल्ला मिरवणूक पाहण्यासाठी देखील दरवर्षी देशाच्या आणि राज्याच्या विविध भागातून लोक येत असतात.
हे हि वाच भिडू.
- मराठवाड्याच्या नांदेडला शिख धर्मपरंपरेत इतके महत्व का आहे?
- पेटलेला पंजाब शांत करण्याचे श्रेय या मराठी माणसाला जातं.
- सोनिया गांधींनी सुवर्ण मंदिरात जाऊन शीख दंगलीबद्दल माफी मागितली होती.