क्विनाइनच्या विरोधातून होमिओपॅथी या उपचारपद्धतीचा जन्म झाला.

आपल्या पैकी अनेक जण या होमियोपॅथीचे उपचार घेत असतील. छोट्या छोट्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या या गोळ्या सर्दी सारख्या जुनाट रोगावर हमखास प्रभावी ठरतात असा बऱ्याच जणांचा दावा असतो.

या होमियोपॅथीचा शोध लावला सॅम्युअल हानेमान यांनी.

त्यांचा जन्म जर्मनी मध्ये झाला. १७७९ साली लाइपसिक व विएन्ना येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले तसेच एर्लांगेन येथे एम.डी. पदवी प्राप्त केली. वैद्यकीय व्यवसाय करीत असताना आर्थिक गरज म्हणून त्यांनी वैद्यकीय विषयासंबंधीत, विशेषत: रसायनशास्त्रावरची पुस्तके भाषांतरीत करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी रोग झाला की, उलटी अथवा जुलाब होण्यासाठी औषधे दिली जात असत, तर काही वेळा जळवा लावून रोग्याचे रक्त काढले जाई. या उपायांनी रोग बाहेर टाकला जातो अशी तेव्हा समजूत होती.

हे उपचार  हानेमानना पटत नव्हते.

१७९० साली त्यांनी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती घेतली व आपल्या आवडीच्या शास्त्रीय विषयांवरील पुस्तकांच्या भाषांतरावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

१७९० साली विल्यम कलेन या लेखकाचा औषधांवरचा ‘लेक्चर्स ऑन द मटेरिया मेडिका’ या ग्रंथाचे जर्मनीमध्ये भाषांतर करीत असताना त्यामध्ये त्यांना असे वाक्य आढळले की,

सिंकोना या झाडापासून बनविलेले क्विनाइन किंवा कोयनेल हे औषध त्यामध्ये असलेल्या कडूपणामुळे हिवताप बरा करते.

कडू चवीमुळे हिवताप बरा होतो हे कारण हानेमान यांना पटले नाही. तेव्हा त्यांनी या औषधाचा शरीरकार्यावर काय परिणाम होतो ते बघायचे ठरविले.

त्यांनी स्वत: ठराविक मात्रेमध्ये रोज ते औषध घ्यायला सुरुवात केली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना थंडी, ताप व घाम सुटणे असे क्रमाक्रमाने झाले व औषध घ्यायचे बंद केल्यावर ती लक्षणे बंद झाली.

त्यावरून त्यांनी असे अनुमान काढले की, निरोगी माणसाला विशिष्ट द्रव्य दिल्यावरची जी लक्षणे उद्भवतात तशीच लक्षणे एखाद्या रोग्यात आढळली तर तो रोगी त्या विशिष्ट औषधांनी बरा होतो.

हानेमाननी या पद्धतीला होमिओपॅथी असे नाव दिले.

ग्रीक भाषेत होमिओरा म्हणजे समानता व पॅथास म्हणजे रोग. थोडक्यात औषधे व रोगाची लक्षणे यांमधील समानता या तत्त्वावर आधारित म्हणून या औषधपद्धतीला त्यांनी होमिओपॅथी हे नाव दिले गेले.

आज पण आपण पाहतो की प्रत्येक उपचारपद्धतीचे जाणकार दुसऱ्या उपचार पद्धतीला थोथांड मानतात.

अलोपॅथी विरुद्ध होमियोपॅथी भांडण तर खूप जुनं आहे. हानेमान यांनी ही उपचारपद्धती आणल्या आणल्या त्यांची भांडणे सुरू झाली.

हानेमान यांना होमियोपॅथी बद्दल खूप मोठ्या वादळाला सामोरे जावे लागले. बाकीच्या डॉक्टरांच्या विरोधामुळे दरवर्षी व्यवसायाच ठिकाण बदलावं लागलं. एकदा त्यांच्या कडे उपचार घेणारा ऑस्ट्रियाचा राजपुत्र मरण पावला आणि याचा आळ हानेमान आणि त्यांच्या होमियोपॅथीवर टाकण्यात आला.

तरीही हानेमान यांनी चिकाटीने होमिओपॅथीचा प्रसार चालू ठेवला.

त्यांनी १८२८ साली जुनाट आजारासंबंधीच्या उपाय योजनेबाबत लिहिलेल्या दि क्रॉनिक डिसिजेस या ग्रंथात ४८ औषधींचे वर्णन आहे. हानेमान यांनी जवळजवळ २५०० पानांची ग्रंथसंपदा ३२ वर्षात लिहिली गेली. त्याशिवाय वेगवेगळ्या जर्नल्समध्येही  त्यांचे वैद्यकीयसंबंधी लिखाण चालू असे.

अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झाले. त्यातूनच पुढे युरोप व अमेरिकेत होमिओपॅथी ही उपचार पध्दती वापरणारे अनेक डॉक्टर निर्माण झाले. १८३१-३२ च्या युरोपमधील कॉलऱ्याच्या साथीत होमिओपॅथीने अनेकांना जीवदान दिले.

या साथीच्या रोगामुळे होमिओपॅथीचा मोठा प्रसार झाला.

आज असाच कोरोनाविरुद्धचा लढा चालू आहे. सध्यातरी मलेरियावरील हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध या रोगासाठीही वापरले जातय. हे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन बनलंय क्विनिन पासून. म्हणजेच क्विनाइन हेे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन आहे असं मानलं जातं.

हेच क्विनाइन ज्याच्या विरोधातुन होमिथीचा जन्म झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.