भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं जायचं…..

सोशल मीडियावर फोटोंची रेलचेल असते. पण ठराविक लोकांचे फोटो हे कायम व्हायरल झालेले असतात. पत्रकारितेतील फोटो हे कायम काहीतरी वेगळं दाखवत असतात, निसर्गाचं सौंदर्य असो किंवा भीषण रूप असो अशा विविध प्रकारचे फोटो आपल्याला दिसतात. दरवेळी आपण महिलांना फोटोत बघतो, पण आजचा किस्सा आहे भारतातल्या पहिल्या महिला फोटो जर्नालिस्टचा.

होमी व्यारावाला या भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नालिस्ट होत्या.

९ डिसेंबर १९१३ रोजी गुजरातच्या नवसारीमधील एका मध्यमवर्गीय पारसी कुटुंबात झाला. होमी यांचे वडील पारसी उर्दू थिएटरमध्ये अभिनेते होते. यानंतर त्यांचं कुटुंब मुंबईत राहायला आलं. मुंबईमध्येच होमी व्यारावाला यांनी आपल्या शाळा सोबतीकडून फोटोग्राफी शिकायला सुरवात केली. पुढे त्यांनी मुंबईच्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये ऍडमिशन घेतलं.

होमी व्यारावाला यांनी फोटोग्राफर म्हणून सुरवात १९३० साली केली. १९७० सालापर्यंत होमी व्यारावाला यांनी या क्षेत्रात काम केलं. या काळात त्यांनी देश विदेशात भरपूर नाव कमावलं. भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट म्हणून होमी व्यारावाला यांचं नाव घेतलं जातं. पण त्यांचा सुरवातीचा प्रवास फारच कठीण होता. 

होमी व्यारावाला यांनी काढलेला पहिला फोटो हा बॉंबे क्रोनिकल या वृत्तपत्रात आला होता. ज्यावेळी होमी वृत्तपत्रासाठी काम करत होत्या तेव्हा त्यांना प्रत्येक फोटोमागे एक रुपया मिळत असायचा. यानंतर होमी यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये फोटो जर्नालिस्ट म्हणून काम करणाऱ्या माणेकशॉ जमशेटजी व्यारावाला यांच्यासोबत लग्न केलं. लग्न झाल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

दिल्लीमध्ये होमी व्यारावाला ब्रिटिश सूचना सेवामध्ये नौकरी करू लागल्या. याच काळात त्यांनी स्वतंत्रता आंदोलनांचे फोटो काढण्यास सुरवात केली. दिल्लीत आल्यानंतर होमी व्यारावाला यांच्या कामाची चर्चा राष्ट्रीय स्तरावर होऊ लागली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात होमी यांनी काढलेल्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांचे फोटो भरपूर चर्चेत राहिले. 

दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळात होमी व्यारावाला यांनी इलेस्ट्रेटिड विकली ऑफ इंडिया मॅगेझीनसाठी काम करायला सुरवात केली जे १९७० पर्यंत चाललं. या काळात होमी व्यारावाला यांनी काढलेले फोटो दीर्घकाळ चर्चेत राहिले. जगभरात त्यांना डालडा-१३ या नावाने ओळखलं जायचं. या नावामागे सुद्धा एक मजेदार कारण आहे.

होमी व्यारावाला यांचे फोटो सुरवातीच्या काळात डालडा-१३ या नावाने प्रकाशित होत असे. १३ हा त्यांचा लकी आकडा होता. याचासुद्धा एक इतिहास आहे.

होमी यांचा जन्म १९१३ साली झाला होता. त्यांच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत त्यांनी भेट वयाच्या १३ व्या वर्षी झाली होती. याशिवाय त्यांच्या पहिल्या गाडीचा नंबरप्लेट हा डी.एल.डी १३ होता. या डी.एल.डी १३ वरून त्यांचं नाव डालडा १३ पडलं.

होमी व्यारावाला यांनी आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून देशाच्या त्यावेळच्या सामाजिक आणि राजनैतिक परिस्थितीचं वास्तव दाखवलं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकणे असो किंवा भारतातून लॉर्ड माउंटबेटनचं प्रस्थान असो, महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या अंत्ययात्रेचे फोटो हे सगळं होमी व्यारावाला यांच्या फोटोग्राफीतून आलं होतं.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सिगारेट पितानाचा फोटो हा होमी व्यारावाला यांनी काढलेला आहे, आज आपण जितके नेहरूंचे फोटो बघतो ते सगळे होमी व्यारावाला यांनी काढलेले आहेत. 

१९७० मध्ये होमी यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यांनी पत्रकारिता सोडली. नंतर त्या आपल्या मुलाकडे राजस्थानमध्ये गेल्या. पण १९८९ मध्ये त्यांच्या मुलाचंही कॅन्सरमुळे निधन झालं, होमी पुन्हा एकट्या पडल्या. पुढे उर्वरित आयुष्य त्यांनी वडोदरामध्ये काढलं. पुढे १५ जानेवारी २०१२ रोजी होमी व्यारावाला यांचं निधन झालं.

आजसुद्धा होमी व्यारावाला यांनी काढलेला प्रत्येक फोटो हा आयकॉनिक मानला जातो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.