पोरानं एक मर्डर केला होता, तो लपवायला त्याच्या आईनंच आणखी दोन करायला लावले…

लहानपणी आमच्या शाळेत एक गोष्ट सांगायचे. एक पोरगा असतोय, तो शाळेत एक पेन्सिल ढापतो. त्याच्या आईला समजतं, पण आई काहीच बोलत नाही. हे ढापाढापीचं प्रमाण वाढत जातं आणि पुढं जाऊन हे पोरगं अट्टल चोर बनतं. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. त्याला शेवटची इच्छा विचारण्यात येते तेव्हा तो म्हणतो, मला माझ्या आईला भेटायचं आहे.

आई भेटायला येते आणि तेव्हा तो तिचा कान चावतो आणि म्हणतो, ‘जर तू मला पहिल्या चोरी वेळेस अडवलं असतं, तर आज ही वेळ आली नसती.’

आता तेव्हा ही बोधकथा म्हणून लय हिट वाटली होती. आता याच्यात लय डीप जाऊ नका, ही गोष्ट आठवायचं कारण म्हणजे मध्यप्रदेशमधली एक केस. जी सोडवताना पोलिस अक्षरश: हॅंग झाले होते. कारण या केसमध्ये ज्याच्यावर आरोपी म्हणून संशय व्यक्त केला जायचा… त्याची डायरेक्ट जळालेली बॉडीच सापडायची.

संशयाची सुई फिरुन फिरुन जिथं थांबली, ते बघून फक्त पोलिसच नाही, तर सामान्य नागरिकही हादरले होते.

मध्य प्रदेशचं गुणा शहर. तिथं ५ मित्रांचा एक ग्रुप होता. घरची आर्थिक परिस्थिती, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एक गोष्ट मात्र पक्की होती ती म्हणजे यांची मैत्री. या ग्रुपमधली काही पोरं अल्पवयीन होती, पण दोस्ती वय बघून थोडीच होते ?

यातलाच एक होता हेमंत मीना, याचे फादर सरकारी कर्मचारी. त्यामुळं गडी पैसेवाला होता. यानं आपल्या घरच्यांकडे बाईकसाठी हट्ट केला. वडिलांनी ४० हजार रुपये दिले आणि सांगितलं, “जा गाडी घेऊन ये.” हेमंत गाडी घ्यायला गेला आणि परत घरी आलाच नाही.

त्याच्या घरच्यांनी सगळीकडे चौकशी केली, त्याच्या मित्रांशीही कॉन्टॅक्ट केला, पण मित्र म्हणाले तो गाडी घेऊन रात्रीच घरी गेलाय.

दोन दिवस उलटून गेले मात्र हेमंतचा पत्ता नव्हता आणि तेवढ्यात त्याच्या वडिलांना एक फोन आला. ”मुलगा सहीसलामत पाहिजे असेल, तर ५० लाख रुपये द्या.” 

हेमंतच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी खंडणीची केस म्हणून तपास करायला सुरुवात केली. पहिला संशय गेला हेमंतच्या मित्रांवर. पण मेन गोम अशी होती की, हेमंतच्या वडिलांना जो फोन आला होता तो, हेमंतच्याच फोनवरुन.

मित्रांकडे चौकशी केली तेव्हा पोलिसांना एक गोष्ट समजली की, हेमंतचा मित्र हृतिक पसार झालाय. त्यामुळं पोलिसांना पहिला डाउट त्याच्यावर आला.

त्याचा शोध सुरु असताना पोलिस जंगलात पोहोचले आणि तिथं त्यांना सापडला, अर्धवट जळालेला, गळा दाबून खून केलेला हृतिकचा मृतदेह. 

पोलिसांना ज्याच्यावर संशय होता, त्याचाच मृतदेह सापडल्यानं पोलिस चक्रावून गेले.

आता डाउट जातो आणखी तीन मित्रांवर, लोकेश लोढा, हनी दुबे आणि आणखीन एक मित्र (हा अल्पवयीन असल्यानं याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.)

या चौकशीत हनी दुबे आणि तो तिसरा मित्र पोलिसांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं देतात, लोकेश लोढा मात्र काहीसा गडबडतो. आता पोलिस त्याच्यावर संशय घेतात, मात्र अधिक तपास करण्याआधीच पोलिसांना सापडतो लोकेशचा मृतदेह. अर्धा जळालेला, गळा दाबून खून केलेला.

आता गुणामधलं वातावरण तापलं, दोन पोरांचे मृतदेह सापडले होते आणि गायब असलेल्या हेमंतचा  अजूनही पत्ता नव्हता.

त्या तिसऱ्या मित्रानं चौकशीत सांगितलेली प्रत्येक गोष्ट अचूक होती, त्यामुळं तो पोलिसांच्या रडारवरुन बाहेर गेला. पण हनी दुबे शिताफीनं उत्तरं द्यायचा प्रयत्न करत राहिला आणि पोलिसांचा त्याच्यावरचा संशय वाढला. पण त्याच्या चौकशीत काहीच ठोस सापडेना. मग रडारवर आली हनी दुबेची आई, पूनम दुबे.

या पूनम दुबेची मोठ्या लोकांसोबत उठबस होती, मजबूत कॉन्टॅक्ट होते आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे गायब झालेल्या हेमंतसोबत मैत्रीही. पोलिसांनी तिचं कॉल रेकॉर्डिंग शोधायला काढलं आणि सर्व्हर डाऊन असल्यानं त्यांना या साध्या कामाला उशीर झाला. या गोष्टीची बातमी झाली आणि सगळ्या देशभर चर्चाही. शेवटी पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंग तपासलं, पण ठोस पुरावा सापडला नाही.

पोलिसांनी या दुबे माय लेकांची चौकशी केली आणि तपासाला पुन्हा सुरुवात केली…

यावेळी त्यांना सापडला हेमंतचा मृतदेह. जळालेला आणि गळा दाबून खून केलेला. पुन्हा एकदा पूनम आणि हनीची चौकशी झाली आणि त्यांना उलगडली..

हेमंत, लोकेश आणि हृतिक या तिघांची मर्डर मिस्ट्री.

पूनम आपल्या मुलाला हनीला घेऊन नवऱ्यापासून वेगळी राहत होती. त्यांच्या घराजवळच हेमंतचं घर होतं. तिला हेमंतशी मैत्री करायची होती, त्यामुळं तिनं आधी हनीला त्याच्याशी मैत्री करायला लावली. हेमंतचं साहजिकच हनीकडे येणं जाणं वाढलं आणि पूनमनं फासा फेकला. तिनं हेमंतशी जवळीक वाढवली. पुढं जाऊन ती त्याच्याकडून पैसेही उकळू लागली, या पैशासाठी ती हेमंतला स्वतःच्याच घरात पैसे आणि दागिने चोरायला लावू लागली.

पण हेमंतचं रात्री अपरात्री घरी येणं, आईसोबत बोलणं हनीच्या डोक्यात जात होतं. त्यातच त्याला एक दिवस बोलता बोलता समजलं की, हेमंत वडिलांकडून ४० हजार रुपये घेऊन गाडी घ्यायला चाललाय. तोही हेमंतसोबत निघाला, आपल्या मित्रांनाही बोलवून घेतलं आणि पार्टी केली.

दारू पिऊन झाल्यावर त्यानं जुन्या रागातून तीच दारूची बाटली हेमंतच्या डोक्यात घातली, त्याचा गळा दाबून खून केला आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळला सुद्धा.

हे सगळं केल्यावर हनी घरी गेला आणि आईला आपण काय केलं याबद्दल सांगितलं.

इथून सगळ्या प्रकरणाची सूत्र हातात घेतली, ती पूनम दुबेनं.

तिनं या सगळ्यातून आणखी पैसे कमवण्याचा प्लॅन केला. हृतिकला सांगितलं की लांब इंदौरला जाऊन हेमंतच्या घरी फोन कर आणि खंडणी माग, हे खंडणीचे पैसे आपापसात वाटून घेऊ. मात्र हेमंतचे वडील पोलिसात गेले, त्यामुळं खंडणीचा विषय आलाच नाही.

साहजिकच हृतिक म्हणायला लागला, ‘माझ्या वाट्याचे पैसे आधीच द्या. माझा तुमच्यावर विश्वास नाही.’ हृतिक आणि लोकेशनं हनीला हेमंतला मारताना पाहिलेलं, त्यामुळं पूनमला धोका पत्करायचा नव्हता.

तिनं हनीला सांगितलं की, ह्रतिकला मारुन टाक.

आता धोका लोकेशकडून होता, त्यामुळं पूनम हनीला त्यालाही मारायचा सल्ला देते. काही दिवसांच्या अंतरात हेमंत, ह्रतिक आणि लोकेश तिघांचाही खून होतो आणि खून करणारा असतो, त्यांचाच मित्र हनी दुबे आणि या सगळ्या प्रकरणाची मास्टरमाईंड असते, हनीची आई पूनम दुबे.

पोलिसांनी तपासामधून ही सगळी केस उलगडली, तेव्हा त्यांना समजलं की पूनमनं आपल्या पोरानं रागाच्या भरात केलेला पहिला खून लपवण्यासाठी त्याला आणखी दोन खून करायला लावले आणि हे सगळं ती करत होती क्राईम सिरियल्स बघून.

५ वर्ष ही केस चालल्यानंतर न्यायालयानं हनी आणि पूनम या दोघांनाही ऑगस्ट २०२२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गुन्हा करताना हनी अल्पवयीन होता, मात्र त्याच्या गुन्ह्याची तीव्रता बघता न्यायालयानं त्याला कठोर शिक्षा सुनावली.

पूनम दुबेच्या दोन चुका फक्त हनी दुबेचंच नाही, तर हेमंत, लोकेश आणि हृतिकच्या कुटुंबाचंही आयुष्य उध्वस्त करणाऱ्या ठरल्या… म्हणूनच कान चावण्याची गोष्ट पुन्हा एकदा आठवली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.