सक्काळ सक्काळ दुधात पिलं जाणारं हॉर्लेक्स पहिल्या महायुद्धातल्या सैनिकांनी भारतात आणलाय…

बारकी पोरं मोठी होतांना त्यांच्या आया त्यांना एक गोष्ट अवर्जून देतात. ती गोष्ट म्हणजे दुधात घालून दिला जाणारं हेल्थ ड्रिंक. भारतात अनेक प्रकारचे हेल्थ ड्रिंक्स आहेत परंतु नेहमी टॉपला असतो तो हॉर्लेक्स. 

अगदी लहान मुलांना हेल्थ ड्रिंक देण्याचा सल्ला देणारी मंडळी सुद्धा, मुलाला हॉर्लक्स द्या! असाच सल्ला देतात. भिडू लोक्स तुम्ही पण लहानपणी हॉर्लेक्सची चव चाखलीच असेल. 

परंतु भिडूंनो बारक्या पोरांसाठी बनवलेला हा हॉर्लेक्स बारक्या पोरांऐवजी थोरलेच जास्त प्यायचे. एवढंच नाही तर हा हॉर्लेक्स भारतात सुद्धा थोरल्या लोकांमुळेच आलाय.  

तर झालं असं की, इंग्रजांच्या देशात म्हणजेच ब्रिटनमध्ये जेम्स आणि विल्यम हॉर्लेक्स असे दोन धडपडे भाऊ रहायचे. त्या दोन भावांपैकी जेम्स हॉर्लेक्स हा पेशाने केमिस्ट होता. तर विल्यम हॉर्लेक्स हा धंदेवाईक माणूस होता. केमिस्ट असलेला जेम्स एका बेबी फूडच्या कंपनीत काम करायचा आणि धंदेवाईक असलेला विल्यम कामा धंद्याच्या शोधात अमेरिकेला चालला गेला. 

ब्रिटनमध्ये बेबी फूडच्या कंपनीत काम करणाऱ्या जेम्सला काम करतांना एका नवीन हेल्थ ड्रिंकचा फार्म्युला घावला. फार्म्युला घावल्यामुळे त्याने नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 

परंतु भांडवलाची कमतरता आणि व्यवसायाचा अनुभव नसल्याममुळे त्याला व्यवसाय काही उभा करता येऊना. परंतु संकटात देव धावून याव असा चमत्कार झाला. अमेरिकेत गेलेला त्याचा भाऊ विल्यम अमेरिका सोडून परत ब्रिटनमध्ये आला. 

विल्यम्स ब्रिटनमध्ये परातल्यानंतर बऱ्याच वर्षांनी दोन्ही हॉर्लेक्स भाऊ एकमेकांना भेटले आणि दोघांची चर्चा सुरु झाली.  

जेम्स म्हणाला मला हेल्थ ड्रिंकचा फार्म्युला घावलाय पण धंदा कसा करावा हे सुचत नाही. त्यावर विल्यम म्हणाला डोन्ट वरी ब्रो, मी आहे ना!! 

मग काय दोन्ही भावांनी आज तुफानी करते हैं म्हणत १८७३ मध्ये हेल्थ ड्रिंक बनवण्यास सुरुवात केली. आता व्यवसाय दोन भावांनी एकत्रित रित्या सुरु केला होता त्यामुळे या हेल्थ ड्रिंकला नाव दिलं ‘जे अँड डब्ल्यू हॉर्लेक्स‘.

परंतु बाकी हेल्थ ड्रिंक आणि या ‘जे अँड डब्ल्यू हॉर्लेक्स‘ मध्ये एक फरक होता. तो असा की हा हॉर्लेक्स दुधामध्ये पूर्णपणे एकजीव व्हायचा. 

हॉर्लेक्सच्या या गुणधर्मामुळे दोघांनी या हॉर्लेक्सचं पेटंट करायचं ठरवलं. हा गुणधर्म बघून पेटंट करणाऱ्या संस्थेने ५ जून १८८३ रोजी हॉर्लेक्सला पेटंट मिळाला आणि हॉर्लेक्स हा पेटंट मिळवणारा जगातील पहिला माल्टेड मिल्क प्रोडक्ट बनला.

१९०८ मध्ये दोन्ही भावांनी मिळून अमेरिकेच्या शिकागोमध्ये हॉर्लेक्सचा कारखाना सुरु केला. कारखान्यामुळे हॉर्लेक्सचं प्रोडक्शन वाढू लागलं आणि खप सुद्धा वाढायला लागला होता. 

या हॉर्लेक्सची चव आणि एनर्जी इतकी जबरदस्त होती की, गिर्यारोहक आणि उत्तर ध्रुवावर संशोधन करणारे लोकं सुद्धा हॉर्लेक्स पिऊ लागले होते. रिचर्ड बर्ड नावाच्या एका गिर्यारोहकाने तर हॉर्लेक्सचं नाव बदलून माऊंटेन हॉर्लेक्स असं ठेवलं होतं. 

परंतु सामान्य माणसं आणि गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध असलेला हॉर्लेक्स लवकरच ब्रिटिश सैनिकांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाला.

थेट ब्रिटिश सैनिकच हा हेल्थ ड्रिंक पितायत म्हटल्यावर पब्लिसिटी आणि महत्व तर वाढणारच. ब्रिटिश आणि अमेरिकन सैनिकांमध्ये हॉर्लेक्स प्रसिद्ध होत होता तेंव्हाच पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्या पहिल्या महायुद्धात युनायटेड किंग्डम आणि आघाडीचा विजय झाला. यूकेच्या विजयामुळे हॉर्लेक्सला जास्तच महत्व मिळायला लागलं होतं.

पहिलं महायुद्ध संपल्यानंतर पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या काही ब्रिटिश सैनिकांची नियुक्ती भारतात करण्यात आली होती. 

जेंव्हा पहिल्या महायुद्धात सहभागी झालेले ब्रिटिश सैनिक भारतात आले तेव्हा ते आपल्यासोबत हॉर्लेक्स सुद्धा घेऊन आले. ब्रिटिश सैनिक हॉर्लेक्स पित होते त्यामुळे त्यांचे अनुकरण करणाऱ्या बॉम्बे, मद्रास, कलकत्ता यांसारख्या शहरातील श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांनी हॉर्लेक्स प्यायला सुरुवात केली.

सुरुवातीला हॉर्लेक्सचा केवळ माल्ट हा एकमेव फ्लेवर होता. परंतु हॉर्लेक्सचा हा माल्ट फ्लेवर भारतीयांना खूप आवडला. त्यामुळे हॉर्लेक्स भारतात आणखी प्रसिद्ध व्हायला लागला. मात्र भारतातील सामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती, दुधाची कमतरता आणि हॉर्लेक्स अमेरिकेतून आयात करावा लागत होता त्यामुळे याचा प्रसार सामान्य माणसापर्यंत झाला नव्हता. 

परंतु भारतातील वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने १९६० सालात पंजाबमध्ये म्हशीच्या दुधापासून हॉर्लेक्स बनवण्याचा कारखाना सुरु केला. त्या कारखान्यामुळे भारतातलं हॉर्लेक्सचं उत्पादन वाढायला लागलं. 

भारतात हॉर्लेक्सचं उत्पादन सुरु होण्यासोबतच १९७०-८० च्या दशकात भारतात धवल क्रांती घडून आली. या धवल क्रांतीमुळे भारतात दूध सुद्धा मुबलक प्रमाणात मिळू लागलं होतं. त्यामुळे दुधाच्या मागणीबरोबरच हॉर्लेक्सची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढायला लागली. 

२००५ मध्ये हॉर्लेक्सने एक सर्वे केला ज्यात कंपनीने दावा केला होता की, हॉर्लेक्स पिणारी मुलं इतर मुलांपेक्षा जास्त उंच आणि तंदुरुस्त असतात. त्यामुळे मुळातच भारतीयांमध्ये प्रसिद्ध असलेला हॉर्लेक्स आणखीनच प्रसिद्ध झाला. 

भारतात हॉर्लेक्सची प्रसिद्धी आणि विक्री इतकी वाढायला लागली की, २०१७ च्या आकडेवारीनुसार जगातील एकूण हॉर्लेक्स विक्रीपैकी ५७ टक्के हॉर्लेक्सची विक्री एकट्या भारतात होते. 

जेम्स आणि विल्यम हॉर्लेक्स या भावांच्या मृत्युनंतर कंपनीचे अनेक तुकडे झाले. तसेच हॉर्लेक्सची मालकी वेगवेगळ्या लोकांच्या हातात गेली. त्यातच २०१८ मध्ये भारतातील हॉर्लेक्सला हिंदुस्थान यूनिलिव्हरने खरेदी केलं.  

भारतात दिवसेंदिवस प्रसिद्ध होणाऱ्या हॉर्लेक्सने आपल्या फ्लेवरमध्ये सुद्धा अनेकदा वेगवेगळे बदल केलेत. जेव्हा हॉर्लेक्सचं भारतात आगमन झालं होतं तेव्हा हॉर्लेक्स फक्त माल्ट फ्लेवरमध्ये मिळायचा. परंतु आता हॉर्लेक्सचे वॅनिला, चॉकलेट, टॉफी, हनी, इलायची, केसर-बदाम असे वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध झालेले आहेत. 

त्यामुळेच १९१८ मध्ये ब्रिटिश सैनिकांनी आणलेलं हॉर्लेक्स अल्पावधीतच भारतीयांचं फेवरेट फॅमिली ड्रिंक बनलं. 

आजच्या घडीला भारतात जेष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्व वयोगटात हॉर्लेक्स प्रसिद्ध आहे. यासोबतच महिला, गरोदर महिला, लहान मुलं, किशोरवयीन मुलं, जिम करणारी बॉडीबिल्डर मुलं आणि जेष्ठांसाठी वेगवेगळे पर्याय हॉर्लेक्सने उपलबध करून दिले आहेत.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.