मोरारजी देसाई यांचा जीव वाचविण्यासाठी वायूसेनेच्या ५ अधिकाऱ्यांनी आपला जीव गमावला होता !

भारतीय सैन्याला शूरवीरतेचा आणि धाडसाचा मोठाच वारसा लाभलेला आहे. युद्धभूमीवर देशासाठी लढताना कितीतरी जणांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलेलं आहे. भारतीय वायुसेनेच्या ५ अधिकाऱ्यांनी देखील अशाच निस्वार्थ वीरतेचं दर्शन घडवताना देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जीव वाचविण्यासाठी आपला जीव गमावला होता.

साल होतं १९७७. नोव्हेंबर महिन्यातली ४ तारीख.

मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचं सरकार देशात सत्तारूढ होतं. पंतप्रधान मोरारजी देसाई त्यावेळी आसामच्या दौऱ्यावर दौऱ्यावर निघाले होते. संध्याकाळी ५ वाजता राजधानी दिल्लीतून उड्डाण घेतलेलं  पंतप्रधानांचं टी यु १२४ पुष्पक हे विमान रात्री ८ वाजेच्या सुमारास आसाममधील जोरहाट येथील विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं.

पंतप्रधानांचं विमान जोरहाट विमानतळापासून काहीच किलोमीटरच्या अंतरावर घिरट्या घालू लागलं होतं आणि अचानक वातावरण बदललं. त्यामुळे विमानाला उतरता आलं नाही आणि विमानाने पुन्हा उड्डाण घेतलं. विमानात इंधन देखील अतिशय कमी शिल्लक राहिलं होतं.

शेवटी जोरहाटपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असताना विमान कोसळलं. विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेल्या वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय धैर्याने प्रसंगावधान राखत विमान समोरच्या बाजूने कोसळेल अशा पद्धतीने विमानाची दिशा बदलली आणि एका शेतात विमान कोसळलं.

वायुसेना अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या अपघातातून पंतप्रधान मोरारजी देसाई तर वाचले, पण त्यासाठी वायुसेनेच्या ५ अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. सी जे डीलीमा, विंग कमांडर जोगेंद्र सिंग, स्क्वाड्रन लीडर व्ही.एस. शंकर, स्क्वाड्रन लीडर एम. सिरीयाक आणि फ्लाईट लेफ्टनंट ओ.पी. अरोरा या ५ अधिकाऱ्यांनी अपरिमित शौर्य दाखवून पंतप्रधानाचा जीव वाचवला होता.

या अपघाताच्या वेळी मोरारजी देसाई यांचे चिरंजीव कांतिभाई देसाई, सर्वोदयी नेते नारायण देसाई, तत्कालीन सीबीआय प्रमुख जॉन लोबो आणि अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री पी.के. थुंगण हे देखील विमानात होते. मोरारजी देसाईंना छोटीशी दुखापत झाली होती पण बाकी लोकांची तर हाडं खिळखिळी झाली होती.

मोरारजींना आधीच देण्यात आला होता दुसरं विमान वापरण्याचा सल्ला 

खरं तर पंतप्रधानांनी पुष्पकची इंधन क्षमता कमी असल्याने या दौऱ्यासाठी ते विमान न वापरता दुसरं मोठं विमान वापरावं, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. मात्र हेकेखोर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मोरारजी देसाई यांनी मोठ्या विमानाच्या इंधनाचा खर्च अधिक होईल, असं कारण देत ते वापरण्यास नकार दिला होता.

इंधनाचे पैसे वाचविण्यासाठी हेकेखोर मोरारजी देसाईंनी पुष्पक विमानाची  निवड केली आणि त्याची  किंमत  देशाला वायुसेनेचे ५ शूर-वीर अधिकारी गमावून मोजावी लागली होती.

वायुसेनेच्या ५ अधिकाऱ्यांनी आपले प्राण देऊन मोरारजी देसाई यांचे प्राण वाचवले मात्र सरकारने मात्र त्यांची अवहेलना केली. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कुठलाही मोठा राजकीय नेता उपस्थित राहिला नाही, शिवाय पुढे ज्यावेळी त्यांना पुरस्कार देण्याची गोष्ट समोर आली तेव्हा हा अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचं कारण देत त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.