भाड्यानं घेतलेल्या कारच्या ड्रायव्हरनं बल्ल्या केला आणि मालकाला ओला कॅब्सची आयडिया सुचली
भारीतल्या हॉटेलमध्ये जायचंय, पण जवळ गाडी नाही? ‘ओला कर की.’ आज जरा जास्तच झालीये, गाडी तुझा भाऊ चालवणार नाही (हे जरा लईच दुर्मिळ झालं), ‘हा ओके. तू ओलामधून घरी जा.’ मदर-फादरना लग्नाला पाठवायचंय, ‘तुम्हाला ओला करुन देतो, मला यायला नाय जमणार.’ ठरलेले प्रसंग आणि ठरलेलं उत्तर म्हणजे ‘ओला कॅब्स’.
घरातून निघताना गाडी बुक करायची, थाटात हवं तिथं जायचं ही सवय भारतीयांना अजिबात नव्हती. बससाठी थांबा, रिक्षासाठी वाट बघा, या सगळ्या टेन्शनमधून या कॅब सिस्टीमनं लोकांची सुटका केली. सुरुवातीला ओला आणि उबेर या दोन्ही ब्रँडमध्ये तशी टक्कर वाटत होती, पण ओलानं उबेरचं मार्केट खाल्लं आणि सिंगल हॅण्ड हवा केली. आता आपल्यातले कित्येक लोक असे असतील, ज्यांनी कधी ना कधी ओला कॅब वापरली असेल आणि कधी ना कधी कॅबमध्ये बसल्यावर प्रश्न पडला असेल, की या ओला कॅब्सचा शोध लावला तरी कुणी?
उत्तर आहे, भाविश अगरवाल.
आता हा शोध कसा लागला याची स्टोरी लय भारी आहे. लुधियानामध्ये जन्मलेल्या भाविशला फिरायची लय आवड, त्यातूनच भावानं ओला ट्रिप डॉट कॉमला सुरुवात केली. यातून तो लोकांना विकेंडच्या ट्रिपा आणि हॉलिडे पॅकेजेसचं प्लॅनिंग करुन द्यायचा. या कामासाठी त्याला फिरायला लागायचं.
बँगलोरवरुन बंदीपूरला चालला होता, यासाठी त्यानं एक कार भाड्यानं घेतली होती. भाऊ रस्त्यात होता आणि तेवढ्यात ड्रायव्हरनं गाडी थांबवली, भाविशला म्हणला, ‘पैसे वाढवून दे.’ भाविश काय त्याला तयार झाला नाही आणि ड्रायव्हरनं त्याला डायरेक्ट कल्टीच दिली. त्यामुळं भाविशला भर रस्त्यात थांबावं लागलं आणि तेव्हा त्याच्या डोक्यात आलं की, अशी कित्येक लोकं असतील ज्यांना ड्रायव्हर लोकांनी बल्ल्या केल्यामुळं रस्त्यात थांबावं लागलं असेल. त्यामुळं त्याला आयडिया सुचली की, ड्रायव्हर आणि पॅसेंजर लोकांना कनेक्ट करणारी काहीतरी सिस्टीम पाहिजे, त्यातून जन्म झाला ओला कॅब्सचा.
भाविशनं २०१० मध्ये ओला कॅब्सला सुरुवात घेतली, पार्टनर आणि को-फाऊंडर अंकित भाटीसोबत त्यानं ही स्टार्टअपची आयडिया पुढे नेली. भाविशच्या घरातले सुरुवातीला त्यानं ‘ट्रॅव्हल एजंट’ बनावं या कल्पनेच्या विरोधात होते, पण जसं ओला कॅब्सला फंडिंग मिळू लागलं तसं त्यांचाही विचार बदलला.
ओला कॅब्सला पहिलं फंडिंग दिलं स्नॅपडीलनं. कुणाल बहल, रेहान यार खान आणि अनुपम मित्तल या स्नॅपडीलच्या संस्थापकांनी ओला कॅब्सला इन्व्हेस्टमेंटच्या भाषेत एंजल फंडिंग दिलं. भाविशनं प्रॉडक्ट मॅनेजर उषा लौटोंगबाम यांच्यासोबत डिझाईनचं काम पूर्ण केलं. पण अजून ॲप बनवणं बाकी होतं.
आता बऱ्याच कंपन्या अशा असतात, जिथं इंटर्न लोकांना फार संधी मिळत नाही किंवा त्यांच्याकडं महत्त्वाचं काम दिलं जात नाही. पण ओला वाल्या कार्यकर्त्यांनी वेगळी स्कीम टाकली. त्यांनी ॲप डिझाईन करायची जबाबदारी अजिंक्य पोतदार आणि खुशाल बोकादे या इंटर्न्सकडे दिली. या गड्यांनी अँड्रॉईड आणि आयओएसच्या ॲपचं पहिलं डिझाईन केलं, तेही दोन महिन्यांच्या इंटर्नशिप दरम्यान. (सीव्ही कसला स्ट्रॉंग झाला असेल भिडू.)
एकदा ओलातून जात असताना, ड्रायव्हर भावानं लय खच्ची गाणी लावली. आपल्या मनात उगा भलते विचार यायला नको म्हणून उगाच कायपण विचार करत बसलो. सारखं डोळ्यांसमोर दिसणाऱ्या ‘OLA’ या नावाचा अर्थ काय असेल? हा प्रश्न पडला. असं वाटलं की तीन शब्दांची पहिली अक्षरं घेऊन केलं असेल. तर काय जुळणी होईना. मग गुगलवर शोधलं तेव्हा लक्षात आलं की, आपण रामराम म्हणतो तसं स्पॅनिश लोक होला म्हणतात. त्या होलामधूनच या ओलाचा जन्म झाला. सिम्पलमध्ये डिम्पल नाव ठेवायचं म्हणत, ओलावाल्यांनी हे नाव ठेवलं आणि तेच प्रत्येकाच्या तोंडी बसलं.
ओलानं फक्त कारच नाही तर रिक्षा आणि बाईक सेवाही सुरू केली आहे. एवढंच नाही तर, त्यांनी ओला फूड्स नावानी फूड डिलिव्हरीही सुरू केली. ओला एस वन नावानं इलेक्ट्रिक बाईकही मार्केटमध्ये आणल्या. फाऊंडर भाविश पटेलचा प्लॅन पुढं जाऊन सामान पोचवायला इलेक्ट्रिक ड्रोन वापरायचा आहे. आजच्या घडीला जवळपास १ कोटीपेक्षा जास्त युझर्स असणाऱ्या ओलाला या प्लॅनमध्ये किती यश मिळतंय ते पाहावं लागेल.
सोबतच प्रवाशांच्या तक्रारी आणि रिक्षावाल्यांविरोधात असलेला संघर्ष यातूनही ओलाला मार्ग काढणं गरजेचं आहे.
हे ही वाच भिडू:
- रिक्षावाले ओला, उबेर बाइकवाल्यांना विरोध का करतायेत ?
- उत्तर बरोबर दिलं, तर रिक्षाचं भाडं माफ करणारा अद्भुत टोटोवाला…
- कर्ज काढून ओला, उबरला गाडी लावणाऱ्यांच आजचं “हाल” माहित आहे का..?