ते ड्रग्ज कांड झालं आणि महाजनांच्या राहुलचा पॉलिटिकल बल्ल्या झाला

प्रमोद महाजन म्हणजे भारतीय राजकारणातलं सभ्य आणि सुसंस्कृत नाव. सेना-भाजप युती करून देणं असेल किंवा भाषण कसं करावं याचे धडे देणं असेल महाजन यांनी आपल्या कृतीतून कायम जनतेसमोर आदर्श ठेवला. राजकारणात अजातशत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनांचा अंत मात्र अत्यंत दुर्दैवी झाला. त्यांच्या सख्ख्या भावानं राहत्या घरात गोळ्या घालून त्यांची हत्त्या केली. महाजनांचा सुसंस्कृत वारसा त्यांचा मुलगा राहुल चालवेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. भारतीय जनता पक्षानंही युथ विंगमध्ये त्याला मोठी जबाबदारी देण्याचं ठरवलं. नेमकी राहुलच्या आयुष्यात एक रात्र आली आणि त्याचं पॉलिटिकल करिअर सुरु होण्याआधीच खलास झालं.

तारीख १ जून २००६. महाजनांच्या मृत्यूला जवळपास एक महिना होत आला होता. आपल्या वडिलांच्या अस्थी ब्रह्मपुत्रेत विसर्जित करण्यासाठी राहुल आसामला निघाला होता. जात जात तो महाजनांच्या दिल्लीतल्या बंगल्यावर थांबला आणि त्या रात्रीच कांड झालं.

राहुलनं प्रमोद महाजन यांचा पीए बिबेक मैत्रासोबत ड्रग्स पार्टी केली आणि दुसऱ्या दिवशी बिबेकनं जगाला रामराम केला. राहुलवर ड्रग्स घेतल्याचा, मैत्राच्या मृत्यूचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप केला गेला. सगळा किस्सा हळूहळू समोर येऊ लागला आणि त्या रात्री नक्की काय घडलं याची उत्सुकता वाढत गेली.

या केसमधल्या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार, राहुल आणि मैत्रा त्या रात्री महाजनांच्या बंगल्यावर होते. तिथं साहिल झारू हा मुंबईतला तरुण त्याच्या मित्रांना घेऊन आला. झारु बंगल्यात जाऊन महाजन आणि मैत्राला भेटून आला. तेव्हा राहुलनं त्याला ड्रग्स आणायला पाठवलं. झारुनं आपल्या राहुल मल्होत्रा नावाच्या मित्राला रस्त्यात सोडलं आणि करण अहुजा आणि तो ड्रग्स आणायला साऊथ दिल्लीत गेले. तिथं नायजेरिन ड्रग डीलरकडून त्यांनी १२ हजार ५०० रुपयांचे ड्रग्स घेतले आणि ते सफदरजंग रोडवरच्या महाजनांच्या बंगल्यावर परतले. तिथं महाजन आणि मैत्रा शॅम्पेन मारत बसले होते.

झारू तिथं पोहोचल्यावर त्याला समजलं की, ड्रग्स घेऊन मैत्राच्या बत्त्या डीम झाल्यात. आता त्याला डोस जास्त झाला असेल, पण राहुलसाहेब म्हणाले ‘झारू तुला गंडवलाय, हे ड्रग्स नकली आहेत, जाऊन बदलून आण.’ आता झारूशेठ पण चिंग झालेले. त्यामुळे महाजनांचा ड्रायव्हरही त्याच्यासोबत गेला. या दोघांनी ड्रग्स बदलून आणले, येता येता अहुजाला घरी सोडलं आणि त्रिशय खन्ना नावाच्या मित्राला पिक केलं.

हे तिघं बंगल्यावर पोहोचले आणि हँग झाले. महाजन आणि मैत्रा गाढ झोपेत होते, पण त्यांची हालचाल होत नव्हती. झारू आधीच हवेत तरंगत होता, ड्रायव्हरला काय समजंना त्यामुळं खन्नानं महाजन, मैत्रा आणि झारू तिघांना हॉस्पिटलमध्ये नेलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी बिबेक मैत्राचा मृत्यू झाल्याचा घोषित करण्यात आलं. राहुल महाजनला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं. राहुल त्यातून बचावला पण मैत्राच्या मृत्यूचं गूढ कायम राहिलं. त्यात त्यांच्या ब्लड टेस्टमध्ये हेरॉईन आणि कोकेन सापडलं. सबळ पुरावा म्हणून ड्रग्सचं पाकीटही सापडलं. गुन्हा सिद्ध झाला, राहुलला शिक्षा मिळाली आणि जामीनही.

या सगळ्यात राहुलच्या हातातून एक लई मोठी संधी गेली. प्रमोद महाजनांच्या अकाली मृत्यूमुळे राहुलला जबरदस्त सहानुभूती मिळाली होती. वडलांच्या अंत्यसंस्कारावेळी पाणवलेले त्याचे डोळे लोकांच्या स्मरणात होते. भारतीय जनता पक्षानं त्याचा वारसा आणि सहानुभूतीची लाट पाहता त्याला युथ विंगमध्ये जबाबदारीचं पद देण्याचा निर्णय घेतला होता. हे नक्की होणार तेवढ्यात हे ड्रग्स कांड झालं आणि भाजपनं राहुलला परत कधीच जवळ केलं नाही.

त्याची बहीण पूनम महाजन उत्तर मध्य मुंबईची खासदार झाली. राहुल मात्र बिग बॉस, बॉलिवूड आणि लग्न यांच्या चक्रात अडकून बसला. पोरगं गप आसामला पोहोचलं असतं, तर आज राजकीय चित्र वेगळं असतं. पण पावडरच्या नादापायी त्याच्या पॉलिटिकल करिअरचा रितसर बल्ल्या झाला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.