चर्चा, वाद होत राहिले पण कांताराला ऑस्करसाठी दोन नॉमिनेशन्स मिळाली आहेत…

२०२२ मध्ये ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतातून कोणते चित्रपट जावे यावरून बरेच वाद-विवाद, टीका-प्रतिटीका झालेल्या आपण पाहिल्या. आता २०२३ च्या सुरूवातीलाच ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालेल्या ३०१ चित्रपटांची यादी समोर आली आहे. ही यादी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय सिनेमांचाही समावेश आहे.

आर. आर. आर., गंगूबाई काठियावाडी, द काश्मीर फाइल्स आणि कांतारा या भारतीय चित्रपटांचा त्या यादीत समावेश करण्यात आलाय.

खासकरून कांतारा या सिनेमाला दोन नॉमिनेशन्स मिळाले आहेत त्यामुळे दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभशेट्टी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. कांताराला सर्वोत्कृष्ट पिक्चर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता या दोन पुरस्कारांचं नॉमिनेशन मिळालं आहे.

या नॉमिनेशननंतर रिषभ शेट्टी याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणालाय,

“कांताराला  दोन ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाल्याचे सांगताना आम्हाला आनंद होत आहे! ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आम्ही हा पुढचा प्रवास शेअर करण्यास उत्सुक आहोत.”

याशिवाय मी वसंतराव, तुझ्यासाठी काहीही हे मराठी चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेटेड आहेत. गुजराती चित्रपट चेल्लो शो आणि आर माधवनच्या रॉकेटरीनंही ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळवलंय.

पण, नॉमिनेशन मिळवलंय म्हणजे नक्की काय केलंय? म्हणजे एखादा चित्रपट ऑस्करला जातो तो कसा? त्यासाठीची नेमकी प्रोसेस काय असते? चित्रपट ऑस्करला पाठवायचा की नाही हे कोण ठरवतं?  असे सगळे प्रश्न एकदातरी प्रत्येकाच्याच डोक्यात येऊन गेलेच असतील.

सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे, भारताकडून ऑस्करसाठी जे पिक्चर जातात ते येतात ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’च्या अंतर्गत.

त्यामुळं त्यांची स्पर्धा बऱ्याचदा साऊथ कोरिया, स्पेन, फ्रान्समधल्या पिक्चर्ससोबत असते. भारताचा कोणता पिक्चर ऑस्करला जाणार हे ठरवण्याची जबाबदारी फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एफएफआयवर असते.

आता समजा तुम्ही एखादा पिक्चर काढलाय आणि तुम्हाला वाटतंय की हा पिक्चर खूप भारी झालाय तो फिक्स ऑस्कर मारेल, तर तुम्हीही सिलेक्शनसाठी हा पिक्चर एफएफआयकडे पाठवू शकता. फक्त त्याच्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते.

यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे एकतर ठरवून दिलेल्या तारखेआधी पिक्चर भारतात थिएटरमध्ये रिलीझ झालेला असायला हवा.

सोबतच तो निदान आठवडाभर चाललेला असावा. २०२३ च्या ऑस्करसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांची तारीख यंदा  ही १ जानेवारी २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ अशी होती. हीच तारीख निघून जाऊ नये म्हणून गुजराती सिनेमा छेल्लो शो १५ ऑक्टोबरला रिलीज केला गेला.

यामागचं प्रमुख कारण म्हणजे सिनेमा फक्त पुरस्कारांसाठी तयार केलेला नसावा तर तो लोकांपर्यन्त पोहचलेला देखील असावा.

एफएफआयकडं सिनेमा पाठवायला डिपॉझिटही भरावं लागतं.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे ७० हजार अधिक १८ टक्के जीएसटी असं जवळपास ८३ हजार रुपयांचं डिपॉझिट निर्मात्याला भरावं लागतं. तुमचा पिक्चर सिलेक्ट नाही झाला, तरी हे पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळं अनेक निर्माते बजेटच्या मुद्द्यामुळं आपला पिक्चर एफएफआयकडं पाठवत नाहीत.

उदाहरण द्यायचं झालं, तर कुंभलंगी नाईट्स या पिक्चरचं घेऊ शकतो. समीक्षकांनी गौरवलेला आणि भारी पिक्चर म्हणून कुंभलंगी नाईट्स नावाजाला गेला, मात्र ऑस्करच्या शर्यतीत तो आला नाही कारण निर्मात्यांनी एफएफआयकडे हा पिक्चर पाठवलाच नव्हता.

ऑस्करला जाण्यासाठी देशभरातून साधारण २५ ते ३० पिक्चर एफएफआयकडे येतात

मग या २५-३० सिनेमांचं स्क्रीनिंग करण्यात येतं. हे स्क्रीनिंग बघण्यासाठी एफएफआय १५ जणांची कमिटी नेमते, यातली बहुतांश लोकं ही चित्रपटसृष्टीशी संबंधित असतात. म्हणजे काही अनुभवी डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स असतात. मग हे कमिटी मेम्बर्स या २५ ते ३० पिक्चर्समधून एक पिक्चर सिलेक्ट करतात, जो भारताकडून ऑस्करला पाठवला जातो.

पण यात बॉक्स ऑफिसवरची कमाई, अभिनेत्याचं वलय या गोष्टी फारसा प्रभाव पडत नाहीत. एफएफआयच्या कमिटी मेम्बर्सकडून असं सांगण्यात येतं की,

‘अमेरिकेत जवळपास साडेसहा हजार ज्युरी मेम्बर्स हा पिक्चर बघतात आणि त्यानंतर पिक्चर नॉमिनेशनमध्ये येणार की नाही हे ठरतं. त्यामुळं अमेरिकेतल्या लोकांना आवडेल की नाही ? त्यांना पिक्चर रिलेट होईल का ? या गोष्टींचा विचार केला जातो. तिथं भारतातली झोपडपट्टी, गरिबी याबद्दल आकर्षण आहे. त्यामुळंच स्लमडॉग मिलेनिअर आणि गली बॉयला भारताकडून झुकतं माप मिळालं होतं.’

थोडक्यात काय, तर पिक्चर ऑस्करला पाठवायचा की नाही, हे पूर्णपणे फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि त्यांच्या ज्युरी मेम्बर्सच्या हातात असतं. पिक्चर कुठल्याही भाषेतला किंवा कुठल्याही अभिनेता-अभिनेत्रीचा असला, कितीही हजार कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन असलं किंवा कलेक्शन अगदी कितीही कमी असलं तरी ज्युरी मेम्बर्सला भारी वाटला तरंच त्याचं रीळ पुढे सरकत ऑस्करला पोहचत असतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.