भुकंपानंतर ढिगाऱ्याखाली माणूस जिवंत कसा राहतो?

जमिनीला भेगा पडल्यात, इमारती कोसळल्यात, कोसळलेल्या इमारतींच्या भिंतींचे ढीग पडलेत. आतापर्यंत ८,३०० च्या वर लोकांचा मृत्यू झालाय. तुर्कीमध्ये झालेल्या भुकंपामुळे तिथे भयावह परिस्थिती निर्माण झालीये. जीवित हानी, वित्त हानी सोबतच अख्खा तुर्की देश खचलाय. एकट्या तुर्कीमध्येच नाही तर, सीरियामध्येही या भुकंपाचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय.

आता हे ढिगारे बाजुला करण्याचं काम सुरू असताना मृतदेहांचा आकडा वाढतोय. या सगळ्या मध्ये एक फोटो समोर आलाय आणि या फोटोने एक आशा निर्माण केलीये.

या फोटोत एक व्यक्ती ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर निघाल्याचं दिसतंय. तो माणूस त्या भिंतीच्या ढिगाऱ्यावर चढून वर येताना दिसतोय. हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे, तुर्कीमधल्या या ढिगाऱ्यांखाली लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जातीये आणि त्यामुळे, एक आशेचा किरण निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

बरं, लोक जिवंत असतील तरीही किती दिवस जिवंत राहतील हा प्रश्न येतोच…

या विषयात सगळ्यात आधी बघावं लागेल की, अशा वेळी रेस्क्यू ऑपरेशन किती दिवस चालतं? कधी बंद केलं जातं? याविषयी माहिती घ्यावी लागते. तर, अशावेळी युनायटेड नेशन्स ही ऑर्गनायझेशन घटनेच्या ५ ते ७ दिवसांनंतर रेस्क्यू आपरेशन बंद करण्याचा निर्णय घेते.

रेस्क्यू आपरेशन बंद करण्याचा निर्णय अगदी ७ दिवसांच्या आत घेतलाच पाहिजे असं नसतं. तर, रेस्क्यू ऑपरेशन २ दिवस सुरू आहे आणि त्या काळात एकही जिवंत व्यक्ती सापडली नाही तर, ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय घेतला जातो.

सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, माणसाला जगण्यासाठी काय आवश्यत असतं? तर, अन्न, पाणी आणि हवा.

आता यातलं अन्न आणि पाणी हे अशा परिस्थितीत उपलब्ध असण्याची शक्यता अगदीच कमी असते. हवा उपलब्ध असते, पण मग त्या भागात व्हेंटिलेशन कसं आहे? हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. व्हेंटिलेशन किती असेल? अन्न उपलब्ध असेल की नाही? पाणी मिळत राहील की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही परिस्थितीनुसार बदलत राहतात.

पण माणूस अन्न, पाण्याशिवाय सामान्य परिस्थितीत किती वेळ जिवंत राहू शकतो? याचं उत्तर मात्र आपल्याला मेडिकल सायन्समध्ये मिळतं. अगदी अन्नाचा विचार केला तर, एखादा माणूस हा अन्नाशिवाय अगदी २ महिनेसुद्धा जगू शकतो.

पाण्याशिवाय जगण्याचा विचार केला तर, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय ३ ते ५ दिवस जगू शकते. असं असलं तरी, पाणी न पिल्यास आपल्या किडनीवर ताण येऊ शकतो. शरीर डीहायड्रेट होऊ शकतं आणि ब्लड प्रेशरवरही या गोष्टीचा परिणाम होतो.

आता मेडिकल सायन्सने सांगितलेल्या या थिअरीज या सामान्य परिस्थितीसाठीच्या आहेत.

इथे मात्र परिस्थिती सामान्य असण्याची शक्यता कमी असते. शिवाय वाचलेला माणूस हा धडधाकट असेलच असंही छातीठोकपणे सांगता येत नाही. त्यामुळे, ही थिअरी लागू होण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

तज्ज्ञ म्हणतात, मानसिक स्थिती अतिशय महत्तवाची.

अशा प्रकारे अन्न आणि पाण्याशिवाय जगण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थितीही महत्त्वपुर्ण ठरते. जर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीला बाहेरून आपल्यासाठी मदत केली जात आहे, आपल्याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरू आहेत असे काहीसे आवाज आले तर, त्या व्यक्तीची जिवंत राहण्याची शक्यता वाढते.

आपल्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती बाहेर आपली वाट बघतेय म्हणून आपल्याला जगायचंय हा विचार किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग आहे म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी जिवंत राहायची इच्छा असेल तरी माणूस जगण्याची शक्यता वाढते असं तज्ज्ञ सांगतात.

थोडक्यात काय? तर, तज्ज्ञांच्या मते अन्न, पाणी यापेक्षा जगण्यासाठी महत्त्वाचं काही असेल तर, ती जगण्याची इच्छा.

त्यामुळे भुकंपानंतर ढिगाऱ्याखाली जगलेल्या माणसांचे किस्से आपण ऐकलेले आहेत. अगदी जानेवारी महिन्यात एक घटना घडली होती. लकनऊमध्ये घर कोसळलं होतं. घरातले सर्व सदस्य या घटनेत मेले पण ६ वर्षांचा मुस्तफा जिवं राहिला.

मुस्तफाला विचारलं तू कसा वाचलास? त्यावर मुस्तफा म्हणाला,

“मी डोरेमॉनमध्ये बघितलं होतं की, भूकंप यायला लागला की आपण बेडखाली लपायचं मग आपण जिवंत राहतो. मला अचानक हे आठवलं आणि मी बेडखाली लपलो. त्यामुळेच मी जिवंत आहे.”

भूकंप आल्यावर बेड, टेबलखाली लपायचं असतं हे खरं आहे. पण यासोबतच मुस्तफा वाचला तो त्याचा डोरेमॉनवर असलेल्या विश्वासामुळे.

आता तुर्कीसारख्या मोठ्या दुर्घटनेमध्ये बेडखाली लपणं वगैरे फारसं फायदेशीर ठरणार नसलं तरी, तज्ज्ञांच्या मते, ‘जर तुम्ही जिवंत आहात आणि तुमच्याकडे अन्न-पाणी नाहीये तर तुम्हाला जिवंत ठेऊ शकते ती तुमची इच्छा शक्तीच.’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.