क्युबन मिसाईल क्रायसिसच्या १३ दिवसांच्या आणीबाणीनं जगात तिसरं महायुद्ध पेटवलं असतं…

म्हणता म्हणता युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाला सुरुवात झाली आणि संपूर्ण जगात एक अनामिक भीती पसरली. शेअर मार्केटमध्ये पडझड झाली, कच्च्या तेलाचे भाव वाढत चालले आहेत, सोन्याचे भावही दोन टक्क्यांनी वाढलेत. या सगळ्या दुष्परिणामांसोबतच लोकांमध्ये आणखी एक मोठी भीती आहे ती म्हणजे जीवाची. कारण युद्ध फक्त आर्थिक नुकसान करत नाहीत, तर त्याही पलीकडे घाव घालतात हे सगळ्या जगानं दोन महायुद्धांमुळं अनुभवलंय. आता युक्रेन आणि रशिया यांच्यामधल्या युद्धामुळं तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. या दोन देशातलं युद्ध आणखी पेटणार की ताण निवळणार हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईलच.

पण या आधी जगात एक घटना अशी घडली होती, जेव्हा सगळं जग १३ दिवस तिसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली आलं होतं. लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करायला सुरुवात केली, कित्येकांनी जीव मुठीत धरले होते कारण धोका घोंगावत होता तो अण्वस्त्रांच्या वापराचा.

सुरुवातीपासून सुरु करूयात…

दुसरं महायुद्ध संपून, जवळपास १७ ते १८ वर्ष झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच जग दोन गटात विभागलं गेलं होतं. एक गट होता अमेरिकेचा तर दुसरा गट होता रशियाचा. बहुतांश कम्युनिस्ट देश रशियासोबत होते. १९६२ चा तो काळ… अमेरिका आणि रशियात शीतयुद्ध सुरू होतं. दोन तत्कालीन महासत्ता एकमेकांशी अघोषितपणे झुंजत होत्या. पण संघर्षाचं रण पेटलं होतं, ते क्युबा या बेटावर.

क्युबामध्ये काय घडलं होतं…

लोकसंख्या, आर्थिक आणि लष्करी ताकद या सगळ्या बाबतीत क्युबा अमेरिकेपेक्षा प्रचंड कमकुवत होता. अमेरिकेचं वर्चस्व झुगारत फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यांच्या नेतृत्वात क्युबानं १९५९ मध्ये क्युबन क्रांती घडवून आणली. अमेरिका गप्प बसणारी नव्हतीच. त्यांनी दोन वर्षांनी क्युबामध्ये आपलं वर्चस्व पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण क्युबन लढवय्ये भारी पडले आणि अमेरिकेचं ‘बे ऑफ पिग्स इन्व्हेन्शन’ हे ऑपरेशन फोल ठरलं. जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या अमेरिकेवर फक्त ९० मैल लांब असणाऱ्या क्युबामुळं चांगलीच नामुष्की ओढवली होती.

प्रयत्न फोल ठरला असला, तरी अमेरिका पुन्हा कुरघोडी करणार नाही, याची कुणालाच खात्री नव्हती. त्यामुळं क्युबानं मदत मागितली सोव्हिएत रशियाला. इथं तीन बिंदू जोडले गेले. अमेरिका-क्युबा-रशिया. अमेरिका जसं क्युबाला टाचेखाली घ्यायचा प्रयत्न करत होती, तसाच रशियालाही. त्यांनी जर्मनी, इटली आणि तुर्कस्तानमध्ये फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. इटली आणि तुर्कस्तानमध्ये तर त्यांनी अण्वस्त्रंही सेट केली होती. दुसरीकडे रशियालाही अमेरिकेवर दबाव वाढवायचाच होता.

अशावेळी कम्युनिस्ट क्युबाच्या मदतीला, सोव्हिएत रशिया धावली नसती तर नवल होतं. कारण रशियालाही अमेरिकेच्या नाड्या आवळायच्याच होत्या. त्यामुळं त्यांनी लगोलग सूत्रं हरवली, सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह आणि क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांची भेट झाली, वाटाघाटी झाल्या आणि काही दिवसांतच रशियन शास्त्रज्ञ शेतकरी बनून क्युबामध्ये पोहोचले. रशियानं क्युबामध्ये अण्वस्त्र तैनात करायला सुरुवात केली. फायदा हा होता, की तिथून अमेरिकेचा टप्प्यात कार्यक्रम करणं शक्य होतं.

अमेरिकाही गप्प नव्हती…

राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या नेतृत्वात अमेरिकेनंही दमदार पावलं उचलायला सुरुवात केली होती. त्यांच्या हेरगिरी करणाऱ्या विमानानं क्युबामधले फोटो काढले आणि सोव्हिएत रशियाची युद्धसज्जता अमेरिकेला कळली. रशियाची तयारी इतकी जय्यत होती, की ते अवघ्या काही मिनिटात न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो नेस्तनाबूत करु शकत होते. अण्वस्त्रांनी अमेरिकेच्या काही पिढ्या उध्वस्त केल्या असत्या, जे त्यांनी जपानमध्ये केलं तेच आता त्यांच्यासोबत होण्याची भीती वाढली होती.

अमेरिकन लष्कराची मागणी होती, की क्युबा वर हल्ला करू. पण केनेडी यांच्या मनात वेगळीच गणितं सुरू होती, आधीच पराभवामुळे त्यांची नाचक्की झाली होती, काही वर्षांवर इलेक्शन आलं होतं आणि क्युबातून हल्ला झाला असता तर तो परवडला नसता. त्यामुळं त्यांनी एक महत्त्वाची चाल खेळली.

अमेरिकन युद्धनौकांनी क्युबाला वेढा घातला. सोव्हिएत रशियाच्या युद्धनौका आता क्युबाकडे पोहचू शकत नव्हत्या. साहजिकच चवताळलेल्या सोव्हिएत रशियाच्या युद्धनौका अमेरिकेची कोंडी करायला निघाल्या. १६ ऑक्टोबरला क्युबात आणीबाणी जाहीर झाली आणि वातावरण आणखी चिघळलं. केनेडी यांनी अमेरिकन नागरिकांशी टीव्हीवरुन संवाद साधला (आपल्याकडे लॉकडाऊन आणि नोटाबंदीवेळी झाला होता तसा.) तरीही अमेरिकेत आणि विशेषत: अमेरिकन माध्यमांमध्ये कल्ला सुरू होता. सैन्य आणि राष्ट्राध्यक्षांच्या आधीच माध्यमांनी असं वातावरण तयार केलं होतं, की अमेरिकेनं युद्धाला तोंड फोडलंय.

WhatsApp Image 2022 02 24 at 5.16.44 PM
उदाहरण म्हणून ही द न्यूयॉर्क टाइम्समधली बातमी पाहा

मग आला ब्लॅक सॅटर्डे

घडामोडी वेगानं घडत गेल्या आणि दिवस उजाडला शनिवार, २७ ऑक्टोबर. आणीबाणीच्या काळातला ब्लॅक सॅटर्डे. त्यादिवशी युद्धाची ठिणगी पडणार… हे जवळपास पक्कं मानलं जात होतं. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएनं एक खळबळजनक रिपोर्ट समोर आणला. त्यानुसार सोव्हिएत रशियानं क्युबामधून हल्ला करायची सगळी तयारी पूर्ण केली होती. क्युबामध्ये अशाप्रकारे क्षेपणास्त्रं पेरण्यात आली होती, की अमेरिकेची सगळी महत्त्वाची शहरं लक्ष्य करता येतील.

WhatsApp Image 2022 02 24 at 9.14.52 PM
सोव्हिएत रशियानं क्युबामध्ये तैनात केलेली क्षेपणास्त्र

 इकडं अमेरिकाही सज्ज झाली. दोन्ही देश अण्वस्त्र डागणार की काय? अशी परिस्थिती होती. तितक्यात क्युबन सैन्यानं अमेरिकेचं हेरगिरी करणारं विमान पाडलं. तणाव आणखी वाढला.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

हे सगळं घडत असतानाच जॉन एफ. केनेडी यांनी चर्चेचा मार्ग बंद केला नव्हता. त्यांनी क्रुश्चेव्ह यांच्याशी चर्चा करण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. युद्धाचा तणाव शिगेला पोहोचलेला असताना, अमेरिकेचे ॲटर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडी आणि रशियाचे राजदूत अँनाटोली डॉब्रिनिन यांच्यात गुप्त बैठक सुरू होती. त्याचवेळी समुद्रात एक घटना घडली… अशी घटना ज्यामुळं सगळ्या मानवजातीचं भविष्य बदलून गेलं असतं.

काय होती ती घटना…

अण्वस्त्र वाहून नेणारी रशियन पाणबुडी क्युबाकडं जात होती. समुद्रात वादळ उसळलं होतं, पाणबुडीचा जमिनीशी संपर्क होऊ शकत नव्हता. मार्ग भटकण्याची पूर्ण शक्यता होती. त्याचवेळी गस्त घालणाऱ्या अमेरिकन युद्धनौकेनं रशियन पाणबुडीला रोखण्यासाठी बॉम्ब सोडला. जो रशियन पाणबुडीच्या दोनशे फूट लांब फुटला. पण यामुळं पाणबुडीच्या कॅप्टननं युद्ध सुरू झाल्याच्या गैरसमजातून अण्वस्त्र डागण्याची तयारी केली.

पण रशियन नेव्हीचा एक नियम होता. जर अण्वस्त्र डागायचं असेल, तर पाणबुडीवरच्या तिन्ही अधिकाऱ्यांचं एकमत होणं गरजेचं होतं. कॅप्टन आणि पॉलिटिकल ऑफिसरचं मत होतं, अण्वस्त्र डागायचं. पण सेकंड इन कमांडर ऑफिसर वासिली आर्खीपोव अण्वस्त्र न डागण्यावर ठाम होता. पाणबुडीवर राडा झाला, पण तरीही या ऑफिसरनं आपलं मत बदललं नाही. 

अण्वस्त्र न डागताच पाणबुडी किनाऱ्याला लागली. त्याचवेळी बातमी आली… 

रॉबर्ट एफ. केनेडी आणि अँनाटोली डॉब्रिनिन यांच्यातली बैठक यशस्वी ठरली आणि करारानुसार युद्ध होणार नाही, हे नक्की झालं.

आणीबाणीचा अखेरचा दिवस ठरला २८ ऑक्टोबर, या करारानुसार रशिया क्युबामध्ये तैनात असलेली क्षेपणास्त्रं आणि अण्वस्त्रं मागं घेणार होती, तर अमेरिकाही रशियावर दबाव टाकण्यासाठी तैनात असलेली क्षेपणास्त्रं तुर्कस्तान आणि इटलीमधून हटवणार हे नक्की झालं. पुढं जाऊन अण्वस्त्रप्रसार बंदी करारही झाला. जगावर घोंगावणारं अणुयुद्धाचं संकट टळलं. केनेडी आणि क्रुश्चेव्ह यांनी दाखवलेला समजूतदारपणा आणि मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली होती. हे संहारक युद्ध टाळण्यात जितका वाटा या दोन राष्ट्रप्रमुखांचा होता, तितकाच वाटा अण्वस्त्र डागू न देणाऱ्या सेकंड इन कमांडर ऑफिसर वासिली आर्खीपोवचाही होता. 

रशियानं अमेरिकेचं हेरगिरी करणारं विमान पाडलं होतं, त्यात पायलटचा मृत्यू झाला होता. फक्त एक मृत्यू होऊन, १३ दिवस सुरू असलेली आणीबाणी, शीतयुद्ध संपलं आणि संभाव्य अणुयुद्ध टळलं. भारतात तेव्हा भारत चीन युद्ध सुरू होतं, रशियानं चीनला बळ पुरवलं असतं… तर कदाचित भारतातली परिस्थितीही बदलली असती. जे हिरोशिमा-नागासाकीमध्ये झालं, ते न्यूयॉर्क-वॉशिंग्टनमध्ये घडलं असतं? क्युबा जगाच्या नकाशावरुन गायब झालं असतं? पण सुदैवानं… १३ दिवस तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असलेलं जग बेचिराख होता होता राहिलं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.