सुरवात गांधींपासून करणारा ‘आप’ सत्तेसाठी आंबेडकर आणि भगत सिंग यांच्याकडे वळला का?

”आईनस्टाईन ने एकदा महात्मा गांधी बद्दल एक गोष्ट म्हटली होती. येणाऱ्या पिढीला विश्वास बसणार नाही की गांधींसारख्या माणूस या भूतलावर होऊन गेला. हीच गोष्ट मी आंबेडकरांना बोलू इच्छितो. येणाऱ्या पिढीला विश्वास बसणार नाही की आंबेडकरांसारखा महामानव या पृथ्वीतलावर होता. आंबेडकरांनी इच्छा होती की गरीब श्रीमंतांची मुले एका शाळेत शिकावीत आणि ते आम्ही दिल्लीच्या शाळांमध्ये करत आहोत ”

पंजाबच्या निवडणुकीच्या दरम्यान केजरीवालांची जी भाषणं फिरवली जात होती, त्यातल्याच एका  भाषणातली ही वाक्य. ह्यात केजरीवालांचं महात्मा गांधी ते आंबेडकर पर्यंत जे ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे त्याची एक झलक मिळते. त्याचबरोबर आंबेडकरांची दलित-सवर्ण ही लाइन न घेता केजरीवाल त्याऐवजी  सोयीस्करपणे गरीब श्रीमंत हा धागा पडकडल्याचंही दिसतं.

गरीब श्रीमंत असं म्हटल्यावर वाद पण  होत नाहीत आणि लोकांना अपिल पण होतं.

केजरीवालांनी त्यांच्या गरीब श्रीमंत स्कीममध्ये अजून एक नाव परफेक्ट बसवलं ते म्हणजे शहीद भगत सिंग.  भगत सिंगांच्या मार्क्सवादी विचारधारेमुळे केजरीवालांना तसं भगत सिंग यांना त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये बसवणं सोपं गेलं.

आणि जेव्हा त्यांची सत्ता आली तेव्हा त्यांनी आपला मेसेज क्लिअर केला.

पहिले दोन मेसेज खुद्द भगवंत मान यांनीच दिले होते. 

भगवंत मान यांनी घोषणा केली की AAP च्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या फोटो न लागता भगतसिंग आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री बी.आर. आंबेडकर यांचेच फोटो लागतील.  आणि दुसरं म्हणजे ते चंदीगडमधील राजभवनात नाही तर भगतसिंग यांच्या खटकर कलान या गावात ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून आपने त्यांचं सिम्बॉलिज्म जाहीर केलं होतं. जसं की बसंती पगडी म्हणजेच पिवळी पगडी.  भगत सिंग खरंच बसंती पगडी वापरत होते का याबद्दल इतिहासकारांमध्ये वाद होते. पण आपच्या नेत्यांच्या मनात मात्र भगत सिंगांची पिवळी पगडी घातलेला सरदार ही इमेज फिक्स आहे.

१६ मार्च रोजी होणाऱ्या पंजाबच्या मुख्यामंत्र्यांच्या शपथविधीसाठी  आम आदमी पार्टीने  पंजाबमधील कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवकांना भगतसिंग यांना श्रद्धांजली म्हणून   पिवळे फेटे घालण्यास सांगितले आहे.

आता सिम्बॉलिज्म म्हणजे नेत्यांची नावं तर जवळपास सगळ्याच पक्षांनी वापरली आहेत त्यामुळे नुसता केजरीवाल बॅशिंग करून असंही काय फायदा नाहीये.  त्यामुळं आपण फक्त त्यांच्या या दोन नेत्यांचा प्रतिकात्मकरीत्या वापर   कारण्यामागचं लॉजिक बघतोय.

तसं केजरीवाल यांनी सुरवातीपासूनच  स्वतंत्रसैनिक अगदी खुबीने वापरले आहेत. ‘आप’चे सुरुवातीचे दिवस बघितले  आम आदमी पार्टीच्या अभियानात तर भगतसिंगांपेक्षा महात्मा गांधीं नेहमीच जास्त दिसत होते. २०११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चळवळीतून AAPचा जन्म झाला. ती चळवळ जे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गांधीवादी विचाराने जास्त प्रेरित होती.

AAP च्या राजकारणावर एवढी गांधीवादी छाप  होती की महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी देखील २०१४ मध्ये पक्षात सामील झाले होते.

मात्र २०१४ नंतर गांधींना बॅकसीट मिळायला सुरवात झाली. आणि भगतसिंग पुढे येत गेले.  २०१४ मध्ये जेव्हा पंजाबमधून आप ला कार्यकर्ते मिळत गेले त्याचाही या बदलावर परिणाम होता. त्याचबरोबर २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ मिशनसाठी गांधी निवडले आणि आता गांधी स्वछ्तेचे सिम्बॉल झाले.

 AAP ला त्यामुळे आता नव्या वारशाची गरज होती आणि इथेच भागात सिंग यांना पकडण्याचा आपला फायदा झाला.  

गांधींना विरोध करणारा समाजात मोठा वर्ग आहे याउलट भगतसिंग यांना उजवे आणि डावे दोन्ही मानतात. भगतसिंग यांचा देशभरात आदर आहे आणि त्यांचा नावाने मतदारांचे ध्रुवीकरण पण होत नाही.

भगतसिंग यांच्या बाबतीतली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची लेगसी इतक्या वर्षांनंतरही कोणत्या राजकीय पक्षाला घेता आली नाहीये. ती संधी ही आपने बरोबर ओळखली. त्याचबरोबर भगत सिंग यांचं पंजाबी असण्याबरॊबरच कम्युनिस्ट पक्षाने पंजाबमध्ये त्यांना चांगले दिवस असताना घरोघरी पोहचवले होते. त्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग तयार झाला होता.

कम्युनिस्टांच्या जाण्याने भगत सिंग समर्थकांची जी पोकळी निर्माण झाली होती ती आम आदमी पार्टीने बरोबर भरून काढली.

तेच झाले बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत. मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा वापर कोणाच्या विरोधात नं जरा आपने पूर्ण समाजाला अपील होईल असं त्यानं पुढे आणलं. उदाहरणार्थ जिथं जिथं चांगल्या शिक्षणाचा विषय येत होता तिथं तिथं केजरीवाल आंबेडकरांचा उल्लेख करत होते. त्याचबरोबर दलितांना हाक घालण्यासाठीही त्यांना याचा फायदा झाला. पंजाबमध्ये दलित मतदारांचे प्रमाण देशात सगळ्यात जास्त आहे. आणि त्यांना साद घालण्यास या फ्रेमचा खूप फायदा झाला.

याचबरोबर आपची त्यांच्यातला राष्ट्रवाद दाखवण्यासाठी जी धडपड चालू आहे त्यात हे दोन महापुरुष त्यांनी बरोबर बसवले आहेत.  

अर्थसंकल्पात, दिल्लीतील AAP सरकारने देशभक्तीशी संबंधित उपक्रमांसाठी ४५ कोटी रुपये राखून ठेवले होते. त्यामध्ये  प्रत्येकी १० कोटी रुपये भगतसिंग आणि आंबेडकर यांच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या कार्यक्रमांसाठी राखीव ठेवले आहेत. त्याचबरोबर आंबेडकर आणि भगतसिंग या फ्रेम्स आम आदमी पार्टीला जी पुढे देशभर वाटचाल करायची आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत असं राजकीय जाणकार सांगतात. 

त्यामुळे दिल्लीतल्या विकासकामांबरोबरच तेवढ्याच ताकदीनं केलेलं महापुरुषांचं प्रोजेक्शन हे आपच्या विजयामागील गुपित आहे एवढं नक्की.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.