या एका माणसामुळं आज सौरव गांगुली आणि जय शहांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे…

पाच-साडेपाच फूट उंची, जाडसर तब्येत, कपाळावर आलेले केस, हातात कागदपत्रांचा गठ्ठा या अशा अवतारातला माणूस आपल्याला चहाच्या टपरीवर आपल्या शेजारी बसून चहा पिताना हमखास दिसू शकतो. असाच एखादा माणूस तुम्हाला दिसला आणि तुम्ही त्याला जज करण्याआधीच तुम्हाला कुणीतरी सांगितलं की, ‘शेठ, या माणसानं एन श्रीनिवासन सकट सगळ्या बीसीसीआयला झुकवलं होतं. याच माणसामुळं सध्या गांगुली आणि जय शहाला टेन्शन आहे.’ तुम्हाला खरं वाटणार नाही, विश्वास बसणार नाही.

पण या माणसाचं नाव आदित्य वर्मा असेल, तर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. कारण दिसायला साधा असणाऱ्या या आदित्य वर्मानं भल्याभल्यांना पाणी पाजलंय.

सध्या बीसीसीआयच्या वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे सौरव गांगुलीचं अध्यक्षपद आणि जय शहा यांचं सेक्रेटरीपद टिकणार का ? लोढा कमिटीच्या शिफारशीनुसार राज्य क्रिकेट संघटना आणि बीसीसीआयमध्ये काम करताना दोन सलग टर्म्सनंतर तीन वर्षांचा विरामकाळ (कुलिंग ऑफ पिरियड) घेणं आवश्यक असतं. गांगुली आणि जय शहा या दोघांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. मात्र बीसीसीआय अशी मागणी करतंय की, कुलिंग ऑफ पिरियडचा नियम रद्द करण्यात यावा. ज्याचा फायदा म्हणून साहजिकच गांगुली-शहा जोडीला आपल्या पदावर कायम राहता येईल.

मात्र लोढा कमिटीच्या शिफारशी लक्षात घेता कोर्ट काय निर्णय घेणार यावर या जोडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे…

या लोढा कमिटीच्या शिफारशींचा फटका जय शहा-गांगुली यांना बसू शकतो, पण याआधी बीसीसीआयचे सुप्रीमो म्हणून ओळख असणाऱ्या एन. श्रीनिवासन यांनाही आपली खुर्ची गमवावी लागली आहे.

बीसीसीआयमध्ये एवढी मोठी खळबळ करणाऱ्या लोढा समितीबद्दल विस्तृत माहितीसाठी एक वेगळा लेख लिहावा लागेल. पण ही समिती बसली ती आदित्य वर्माच्या प्रयत्नामुळं.

हा आदित्य वर्मा भिडू आहे कोण ?

बिहारमधला हा गडी कॉलेजकडून, युनिव्हर्सिटीकडून क्रिकेट खेळलेला, पण रणजी टीममध्ये काही निवड झाली नाही. आदित्यच्या वडिलांचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम होतं. देशात जिथं टेस्ट मॅच असेल तिथं ते फ्लाईटनं जायचे. भारतीय टीम जिथं राहतिये, त्याच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचे.

 एकेदिवशी घरातल्या सोफ्यावर बसून भारताची मॅच बघत असतानाच सिनियर वर्मा यांना अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं.

आपल्या वडिलांचं क्रिकेट प्रेम आदित्यमध्ये उतरलं होतं. तो टाटा कंपनीत चांगल्या पदावर काम करायचा, मात्र बिहार क्रिकेटच्या भल्यासाठी त्यानं नोकरीमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्याचं झालं असं होतं की जेव्हा बिहारचं विभाजन झालं, तेव्हा बीसीसीआयनं झारखंडला फुल मेम्बरचा दर्जा दिला. मात्र बिहारला नाही. त्यामुळं बीसीसीआयकडून फंड मिळवण्यापासून ते अगदी खेळाडूंना मिळणाऱ्या संधीपर्यंत बिहारच्या क्रिकेटवर अनेक निर्बंध आले होते. यातून एकच मार्ग निघू शकत होता, तो म्हणजे बिहारला फुल मेम्बरचा दर्जा मिळणं.

पण बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये अनेक अंतर्गत वादही होते, या वादांमुळं प्रकरण वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यात बिहार क्रिकेटवर बॅनही लागला. 

मात्र तरीही आदित्य वर्मानं लढायचं ठरवलं. बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी बोलणं व्हावं, त्यांच्याशी भेट व्हावी म्हणून तो बीसीसीआयच्या ऑफिसबाहेर ताटकळत उभा राहायचा. त्याला कधी कधी फक्त काही मिनिटं बोलण्याची संधी मिळायची, पण अनेकदा तर तिकडून हाकलूनच दिलं जायचं. पण तरीही त्यानं प्रयत्न करणं काही सोडलं नाही.

मग आली आयपीएल…

२०१३ मध्ये सगळ्या जगभरातल्या माध्यमांमध्ये आयपीएलची चर्चा होती आणि त्याचं कारण होतं स्पॉट फिक्सिंग. आयपीएलमध्ये गैरव्यवहार चालतो याबद्दल याचिका दाखल करणारा व्यक्ती आदित्य वर्माच होता. याच याचिकेमुळे तपासाची सुत्र हलली आणि एस. श्रीशांत, अजित चंडिला, अमित सिंह आणि अंकित चव्हाण या क्रिकेटर्सला अटक झाली. हा फक्त आयपीएलच नाही, तर सगळ्या भारतीय क्रिकेटमधला काळा दिवस ठरला होता.

याच प्रकरणामुळं बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना आपल्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं. बीसीसीआयपासून आयसीसीपर्यंत सगळीकडे होल्ड ठेवणाऱ्या एन श्रीनिवासनसारख्या मोठ्या माणसाला खुर्चीवरुन खाली खेचल्यानं आदित्य वर्मा हे नाव भल्याभल्यांच्या रडारवर आलं होतं.

पण आदित्य वर्माची मुख्य लढाई होती, बिहारला फुल मेम्बरचा दर्जा मिळवून देण्याची. त्यामुळं श्रीनिवासन विरोधात असतानाही त्यानं ही लढाई सुरुच ठेवली होती.

२००६ पासून सुरु असलेलं हे प्रकरण २०१८ मध्येही सुप्रीम कोर्टात होतं. सुनावण्यांचा खर्च मोठा येत होता. त्यातच एके दिवशी सुनावणीच्या फक्त २४ तास आधी एका हाय प्रोफाइल वकीलानं ऍडव्हान्सची मागणी केली. तेव्हा वर्मानं आपल्या बायकोचे दागिने विकले पण केस लढणं सुरुच ठेवलं. बीसीसीआय मधल्या गैरव्यवहार, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अशा अनेक गोष्टींविरुद्ध त्यानं लढा दिला. श्रीनिवासन यांच्यासारखा बलाढ्य माणूस समोर असतानाही तो कचरला नाही.

अखेर २०१८ मध्ये बिहारवरची बंदी उठवण्यात आली आणि तिकडचे प्लेअर्स पुन्हा एकदा आपल्या राज्याकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळू शकले. सोबतच बीसीसीआयचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टानं लोढा समितीची नेमणूक केली आणि आता या कमिटीच्या शिफारशींचं पालन करणं बीसीसीआयसाठी बंधनकारक असणार आहे.

वर्मानं हा बीसीसीआयविरुद्धचा सामना जिंकला…

कधीकाळी बीसीसीआयच्या ऑफिसबाहेर कागद घेऊन थांबलेल्या एका माणसानं श्रीनिवासन सारख्या माणसाला काही काळापुरतं का होईना पण सत्तेवरुन खाली खेचलं होतं. आता आदित्य वर्माचा मुलगाही बिहारकडून रणजी क्रिकेट खेळतो, त्यामुळं गांगुली-शहा प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित असलेले वर्माजी नेमकी काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.