ती जाहिरात बघितली आणि मन काडेपेटीच्या छापातून थेट बालपणात गेलं…

गेल्या दिवाळीमधली गोष्ट आहे. आपलं डिजिटल पाकीट झालेल्या गुगल पेनं एक स्कीम आणली. वेगवेगळ्या ठिकाणी गुगल पे वापरायचं आणि मग त्या बदल्यात तुम्हाला वेगवेगळे स्टिकर्स मिळणार. ज्याच्याकडे सगळी स्टिकर्स तो बादशहा. आता प्रत्येकालाच बादशहा बनायचं होतं, त्यामुळे या स्टिकर्सची देवाणघेवाणही सुरू झाली. हे सगळं खेळून आणि बघून मन डायरेक्ट बालपणात गेलं.

बालपण… आपल्या आयुष्यातला सगळ्यात भारी काळ. भविष्याची काळजी नसायची, भूतकाळाचा पश्चाताप नसायचा, खिशातले दोन रुपयेही मोठी प्रॉपर्टी वाटायची, रडावंसं वाटलं तर आईच्या कुशीत शिरता यायचं आणि प्रत्येक गोष्टीला आजीच्या गोधडीचा वास असायचा. याच बालपणात आणखी एक भारी गोष्ट होती, ती म्हणजे मित्र. सगळेच आपले आणि आपल्यासारखेच. गुगल पे मुळं झालेली स्टिकर्सची देवाणघेवाण बालपणीची एक हळवी आठवण छेडून गेली…

मोबाईल, क्रिकेट, व्हिडीओ गेम या सगळ्याच्या आधी पोरांची सगळ्यात मोठी संपत्ती होती, माचिस. चाराण्याला मिळणारी एक माचिस संपेपर्यंत घरात दुसरी माचिस यायची नाही. पण पोरं आपली लाईन शाळेत यायची जितकी वाट पाहत नसतील, तितकी घरातले माचिस आणतील याची वाट पाहायचे. कारण लई साधं होतं… माचिसवर असणारे छाप. मोजून काही सेंटीमीटरचा तो कागद, पण त्याच्यावर असलेला ताजमहाल, खारुताई, कमळाचं फुल आणि कित्येक चित्रांनी आपलं बालपण भारी केलं.

जो सगळ्यात जास्त छाप जमवेल, त्याला पोरांमध्ये एक वेगळीच इज्जत असायची. आणि तेव्हाही सगळ्यांनाच बादशहा बनायचं होतं.. त्यामुळे या काही सेंटीमीटरच्या छापांची देवाणघेवाण व्हायची. काय काय बिलंदर पोरं, आपल्याकडच्या लय रेअर छापाच्या बदल्यात पोरांकडून दहा दहा छाप घ्यायची. पुढं डब्ल्यूडब्ल्यूएफचे कार्ड आले खरे, पण ताजमहाल आणि खारुताईची सर जॉन सीना, अंडरटेकर आणि गोल्डन मार्क हेन्रीला कधीच नाय आली.

आता घरात माचिस असताना, फक्त पोराचं मन राखायला म्हणून दुसरी माचिस आणायला पैसे देणारी एकच व्यक्ती होती… आज्जी!

ज्यांचं बालपण आज्जीपाशी गेलंय, त्यांनाच बालपण काय असतंय, हे खऱ्या अर्थानं माहितीये. तिची कंबर दुखत असली, तरी आपल्याला आवडते म्हणून ताटात पुरणपोळी असायची. अशी एक रात्र नसायची जेव्हा पांघरुणावर पडताना आपलं पोट रिकामं असायचं. झोप आली नाही, तर डोक्यातून एक थोडासा सुरकुतलेला हात फिरायचा आणि झोपाळू आवाजातून गोष्टी ऐकायला मिळायच्या. म्हणूनच बालपण भारी असायचं कारण आज्जी होती.

माचिसचे छाप जमवायला नव्या माचिस घ्यायच्या असतील, तर दिवसभर गुणी बाळासारखं वागायचं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील, तरी गाव उंडारत बसायचं नाही. अधून-मधून माचिसच्या पैशांची आठवण करुन द्यायची. छोट्या-मोठ्या कामांमध्ये आजीला मदत करायची. ती लोणचं करत असेल, तर तिला डबे आणून दे, कैऱ्यांची राखण कर, फोडणीचा धूर आला की खिडकी उघड. मग संध्याकाळी चेहऱ्यावरुन मोडलेल्या बोटांचा आवाज यायचा, माचिस घ्यायला चांगला रुपया मिळायचा आणि सगळ्यांपेक्षा जास्त लोणचं आपल्या ताटात असायचं.

पुढं त्या रुपयाच्या बदल्यात मिळालेल्या माचिसचे छाप पोरांमध्ये आपली कॉलर टाईट करायचे. त्या छापांच्या बदल्यात चिंचं घेतली, बिस्किटं घेतली, रुबाब तर लय केला, आजोबांकडे हट्ट करुन एक लई भारी पेटी घेतली. ज्यात मलमलच्या बारीक कापडावर ते छाप ठेवले… त्या वयात कुणी हिरे दिले असते, तरी बदल्यात छाप दिले नसते. कारण त्यांची मार्केट व्हॅल्यू अंबानीलाही लाजवेल अशी होती.

मध्यंतरी एक जाहिरात बघितली, एका बाईच्या पुढ्यात कुणीतरी शिळ्या भाकऱ्या ठेवलेल्या. भुकेला शिळं-पाकं कळत नसलं, तरी हवेसोबत भाकरी पचवता येत नाही. त्याचवेळी एक बारकं पोरगं तिथून जात असतं. त्या बाईची भूक भागावी म्हणून आपल्याकडच्या सुट्ट्या पैशात तो गडी दुकानवाल्याला  लोणचं मागतो. पैसे कमी असतात, पण या बारक्याचं मन मोठं असतं. गडी पुढचा मागचा विचार करत नाही, तो आपल्याकडचे छाप द्यायला तयार होतो. मालकाला कदाचित त्यांची मार्केट व्हॅल्यू माहीत असावी, तो फक्त एका छापाच्या बदल्यात लोणच्याचं पाकीट तर देतोच, पण रुपयाही घेत नाही. त्या बाईची भूक पोराच्या मायेनंही भागते आणि लोणच्याच्या चवीनंही…

कधीकाळी महत्त्वाची संपत्ती असणारा एकही छाप आज जवळ नाही, आता डोक्यातून सुरकुतलेला हातही फिरत नाही. कामासाठी लांबच्या शहरात जाताना नेलेला आजीनं बनवलेल्या लोणच्याचा डबाही संपला. पण आईनं बॅगेत लोणच्याचं एक पाकीट ठेवलंय. कधी भाकरीसोबत भाजी नसली, तर त्या लोणच्याची चव भूकही भागवते आणि आजीच्या मायेची आठवणही करुन देते. आज जवळ शंभर छाप जरी असते, तरी आजीच्या मायेची आणि सुंदर बालपणाची आठवण करुन देणाऱ्या या जाहिरातीसाठी हसत हसत देऊन टाकले असते…

बालपण डोळ्यांसमोरुन जाणं म्हणजे काय असतं, हे पाहायचंय..? ही प्रवीण लोणच्याची जाहिरात बघा…

 

  • Advertising Credit – Setu Advertising

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.