आमिर खानचा पिक्चर हिट होण्याचा मनस्ताप, मुंबईच्या लेडी डॉक्टरांना झाला होता..

सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी कळत नकळतपणे घडून गेलेली एखादी गोष्ट सामान्य नागरिकाच्या जीवनात किती मोठे वादळ निर्माण करून जाते हे कधी लक्षात येत नाही. २००८ साली प्रदर्शित झालेल्या  आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपट  प्रदर्शित झाल्यानंतरचा हा किस्सा आहे.

या चित्रपटात त्याने ‘anterograde amnesia’  म्हणजेच  ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ झालेल्या एका व्यक्तीची भूमिका केली होती. या नायकाच्या प्रेयसीला ज्या खलनायकाने मारलेले असते त्याचा मोबाईल नंबर त्याने आपल्या शरीरावर टॅटूच्या रूपाने गोंदवून घेतलेला असतो. त्याच्या सिक्स पॅक बॉडीवर टॅटू गोंदवून घेतलेले असतात. ज्यातून तो पुढचं आयुष्य जगत असतो.

चित्रपटाचा विषय भन्नाट होता. यापूर्वी कधीच हिंदी सिनेमात असला विषय आला नव्हता. त्यामुळे या सिनेमाला प्रचंड लोकप्रियता लाभली. आमिर खानच्या सिक्स पॅकचे आणि त्याच्या टॅटूचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले. 

पण याच दरम्यान एक गोष्ट झाली, कांजूरमार्ग मुंबईच्या डॉक्टर सुरेखा वर्मा यांना ‘गजनी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वेगवेगळ्या नंबरवरून फोन येऊ लागले. हे फोन रात्री बेरात्री कधी पण येऊ लागले. त्यात अर्वाच्य भाषेत लोक शिव्या देत होते.

डॉक्टर सुरेखा वर्मा यांना सुरुवातीला काहीच कळले नाही. कशामुळे लोक आपल्याला शिव्या देत आहेत? आणि हे फोन आपल्या देशातूनच नाही तर परदेशातून देखील येत होते. त्याचप्रमाणे देशातल्या विविध प्रांतातून येत असल्यामुळे त्यांना न समजणाऱ्या अनेक भाषांमधून त्यांना फोन येत होते. त्यांचा फोन मात्र या असल्या कॉलमुळे व्यस्त राहत होता. डॉक्टर असल्यामुळे त्यांना खूपच त्रास होत होता. त्यांनी मोबाईल कंपनीकडे तशी तक्रार केली. 

भरपूर शोध घेतल्यानंतर असे लक्षात आले की हा मोबाईल नंबर आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटात त्याने त्याच्या अंगावर टॅटूच्या रूपाने गोंदवून घेतला आहे. 

चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाल्यामुळे हा नंबर देखील सर्व लोकांपर्यंत पोहोचला. आणि लोकांनी त्या नंबर वर कॉल करायला सुरुवात केली. त्यातून हा भलताच प्रकार सुरू झाला.

मुंबईच्या एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने याची दखल घेतली आणि डॉक्टर सुरेखा वर्मा यांची बाजू मांडली. त्यांनी फोन बंद करून टाकला. ही बातमी आमिर खान पर्यंत पोहोचली. आमिर खान खूप प्रोफेशनल कलाकार त्याने ताबडतोब डॉक्टर सुरेखा वर्मा त्यांची मनापासून माफी मागितली.

अनवधानाने ही गोष्ट झाली असे सांगितले. कारण टॅटू यार करणार्‍या व्यक्तीने एक काल्पनिक नंबर तयार केला होता. त्याला माहीत नव्हते की हा नंबर कोणाचा तरी असू शकतो आणि त्यातून हा असला भयंकर प्रकार झाला. 

आमिर खानने पुन्हा पुन्हा माफी मागून डॉक्टर सुरेखा वर्मा यांना ३५००० रु. चा नवीन फोन घेऊन दिला. तसेच विदेशी चॉकलेटस आणि निळ्या रंगाच्या ऑर्चिड फुलांचा बुके सोबत ‘सॉरी’ कार्ड पाठवले. आमिर खानच्या या प्रोफेशनल अप्रोचचे सर्वत्र कौतुक झाले.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.