इंजिनियरिंग मध्ये नापास झालेला तो मराठी भावगीतातला शुक्रतारा बनला.

पूर्वीच्या काळी इंदौरमध्ये रामुभैय्या दाते म्हणून एक कलेक्टर होते. त्यांना शास्त्रीय संगीतातला रसिकाग्रणी म्हणून ओळखलं जायचं. भले मोठे मोठे तानसेन होतील पण रामुभैय्या यांच्या सारखा कानसेन होणे शक्य नाही असं म्हटल जायचं. त्यांच्या घरी नेहमी गाण्याच्या मैफिली व्हायच्या. दूर दूर वरून मोठमोठे कलावंत फक्त रामुभैय्याच्या समोर गाता यावे म्हणून इंदौरला यायचे.

पण रामू भैय्या यांचं पहिलं प्रेम म्हणजे कुमार गंधर्व हे होते. त्यांच्या घरी कुमार गंधर्वांच्या मैफिली जशा रंगल्या त्याची तोड स्वर्गीय गायनाशीच करता येईल असं जाणकार म्हणत. पंडीत कुमार गंधर्वानां रामुभैय्या आपला धाकटा भाऊ मानत. या दोन्ही कुटुंबियाचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते.

एकेदिवशी कुमार गंधर्व दातेंच्या घरी आले असताना त्यांनी ऐकलं रामुभैय्यांचा थोरला चिरंजीव अरविंद उर्फ अरु तलत मेहमूदचं कोणत तरी गाण गुणगुणतोय. एका क्षणात त्यांना ओळखलं याच्या आवाजात दम आहे. त्यांनी त्याला आदेश दिला,

“उद्या माझ्यासमोर हार्मोनियम घेऊन बस. तुला मी एक गाण शिकवतो”

घाबरत घाबरत अरु त्यांच्याकडे गेला. कुमार गंधर्वांनी त्याच्या आवाजाची जात कुळी ओळखून एक झक्कास गझल शिकवली. तेव्हा अरु होळकर कॉलेजमध्ये शिकत होता. एकदा त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक पुल देशपांडे आले होते. प्रमुख पाहुणे होते पण त्यांना तरुणाईसोबत मिसळायला, त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं.

स्नेहभोजनाच्या वेळी विद्यार्थ्यांची आणि पुल देशपांडेंची मैफिल जमली. तेव्हा कोणीतरी अरु दातेला गाण्याची फर्माईश केली. तो लाजून आढेवेढे घेऊ लागला. पुलं देशपांडे यांची रामुभैय्या दातेंशी ओळख होती. त्यांनी थोड्याशा अधिकारवाणीने अरु ला गाण सुनावायला सांगितले. अरुने कुमार गंधर्वांनी शिकवलेली गझल गायली. त्याचा रेशमी आवाज, भावपूर्ण गायकी यामुळे पुल थक्क झाले. त्यांनी विचारलं

“तुझ्या बाबांना माहित आहे का तू गातोस ते?”

अरुने नकारार्थी मान डोलावली. दुसऱ्या दिवशी पुलं देशपांडे दातेंच्या घरी येऊन थडकले आणि रामुभैय्याना अरुच्या गाण्याबद्दल सांगितलं. अरुने तीच गझल आपल्या वडलाना सुद्धा गाऊन दाखवली. रामुभैय्या दातेनां धक्का बसला. कानसेनाच्या घरी अखेर तानसेन जन्माला आला होता.

एवढी वर्षे अस्सल संगीताचा संस्कार झाला होता, ही गाणी ऐकून ऐकून ते संगीत रक्तात उतरणे साहजिक होते. पुल देशपांडेनी हा हिरा शोधून काढला आणि त्याच्या वडीलाना त्याची नव्याने ओळख करून दिली.

या हिऱ्यावर पैलू पाडण्याची जबाबदारी कुमार गंधर्वांकडे देण्यात आली. खुद्द गंधर्वाकडे गाण शिकायला भाग्य लागते. अशा रीतीने अनपेक्षितपणे अरविंद दाते गायनाच्या वाटेवर आला. पण अजूनही आपल्या गाण्यावर चरितार्थ चालवता येईल हा आत्मविश्वास त्याला आला नव्हता. त्याने टेक्स्टाईल इंजिनियरिंग ला प्रवेश घेतला.

पण व्हायचं तेच झालं. इंजिनियरिंगच्या पहिल्याच वर्षात अरविंदने गटांगळ्या खाल्ल्या. आता घरी कसं सांगायचं याच टेन्शन घेऊन तो रडू लागला. गाणं वगैरे सगळ सोडून आता फक्त अभ्यास करायचा निर्णय त्याने घेतला. पण जेव्हा रामुभैय्यानां हे कळाल तेव्हा त्यांनी आपल्या पोराला एक मोलाचा सल्ला दिला,

“तू इंजिनीअरिंगची परीक्षा या नाही तर पुढच्या वर्षी पास होशील. हे सगळे इंजिनीअर कुठल्या ना कुठल्या कंपनीत काम करतील; पण तू गाणे मन लावून शिकलास, तर जग तुला ओळखेल.”

इतके सांगून ते गप्प बसले नाहीत तर त्यांनी पेढे मागवले आणि संपूर्ण आळीला वाटले. वडीलानी एवढा मोठा विश्वास दाखवल्यामुळे अरविंद दातेने गाण सोडलं नाही. इंजिनियरिंग सोबत गाण्याचा रियाझ चालू ठेवला. पुढे नोकरी मिळाली, लग्न झालं. अरविंद संसारात गुंग झाला. आवड म्हणून कधी तरी रेडियोवर गझल गायचा.

एकदा त्याचं रेडियोवरच गाण मुंबईला सुप्रसिध्द संगीतकार श्रीनिवास खळेनी ऐकलं. त्यांनी अरविंदला एक गाण गाण्याची ऑफर दिली. पण  अरविंदने त्या गाण्याला नकार दिला. एक तर त्याने पूर्वी कधी मराठी गाण गायलं नव्हत , शिवाय मराठीला इंदौरी टोन होता यामुळे ते उच्चार जमतील का याची शंका होती. 

सगळ्यात महत्वाच म्हणजे स्वतःच्या गायनावर विश्वास नव्हता.

आयुष्यभर वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, बेगम अख्तर, लता मंगेशकर अशा दिग्गज गायकांना गाताना जवळून पाहिलं असल्यामुळे त्याला खरी गायकी काय असते हे ठाऊक होते त्यामुळे स्वतःच्या आवाजाच्या मर्यादा त्याला ठाऊक होत्या. त्यामुळे खळेना ठाम नकार त्याने कळवला.

श्रीनिवास खळे हे देखील जिद्दी होते. त्यांनी सरळ रामूभैय्या दातेंची भेट घेतली आणि सांगितलं जर अरविंद  गाणार नसेल तर मी हे गाण कचरापेटीत टाकून देईन.रामुभैय्यानी अरविंदला खूप झापलं. तो अखेर श्रीनिवास खळेंच गाण गायनासाठी तो तयार झाला.

आकाशवाणीवर जेव्हा या गाण्याच रेकोर्डिंग होणार होत तेव्हा स्वतः पुलं देशपांडे, यशवंत देव, मंगेश पाडगावकर असे अनेक दिग्गज आपल्या लाडक्या रामुभैय्याच्या मुलाचं गाण ऐकण्यासाठी तिथे हजर होते. 

गाण रेकोर्डिंगच्या वेळी गायकाच नाव विचारल्यावर ए.आर.दाते असं सांगण्यात आलं. पुढे गाण जेव्हा ब्रॉडकास्ट होणार होत तेव्हा रेडियो मधून गायकाच पूर्ण नाव काय हे विचारायला यशवंत देव यांना फोन गेला. त्यानाही खर नाव ठाऊक नव्हत, त्यांनी रामुभैय्यानी त्याला अरु म्हंटलेलं ऐकलं होत. यशवंत देवना वाटलं अरु म्हणजे अरुण. या गोंधळामुळे अरविंदचा अरुण दाते झाला.

“शुक्रतारा मंद वारा”

हेचं ते गाण.  मराठी भावगीतांचं नशीब पालटणार हे गाण ठरलं. सुगम संगीताच्या विश्वात एक नवीन तारा उदयास आला होता. अरुण दाते या नवीन नावानेच तो घराघरात पोहचला. आपल्या आवाजाच्या मर्यादाना त्यान आपलं बलस्थान बनवलं होतं. 

भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी , या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, दिवस तुझे हे फुलायचे अशी अनेक अजरामर गाणी त्यांनी गायली.

मराठी भावसंगीताचा त्यांच्यामुळे पुनर्जन्म झाला. आपल्या आवाजातील हळुवारपणा, माधुर्य, रेशमी पोत, गाण्याच्या बोलाचे प्रासादिक उच्चारण, स्वराला असलेले भिजलेपण, शब्द प्रधान गायकी ही सारी भावगीतांसाठीची बलस्थाने ठरवली आणि रसिकांच्या हृदयात शुक्रताऱ्यासारखेच अढळस्थान निर्माण केले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.