मराठी माणसानं अपमानाचा बदला म्हणून एशिया कप सुरु करुन दाखवला…

मागच्या वर्षी हुकला असला, तरी एशिया कपमध्ये असलेलं भारताचं वर्चस्व कुणीच नाकारु शकत नाही. भारताकडे असलेले सर्वाधिक ७ एशिया कप हे याचं एकमेव कारण नाही, तर मुळात एशिया कपच एका भारतीय माणसाननं सुरू केलाय आणि तेही ब्रिटिशांनी केलेल्या अपमानाचा बदला म्हणून.

गोष्ट सुरु होते, १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकपपासून. “ओय एक मॅच तो जितके जाओ,” असले टोमणे ऐकणाऱ्या भारतीय टीमनं कपिल देवच्या नेतृत्वात थेट वर्ल्डकप जिंकून दाखवला होता. मोठमोठ्या टीमला अस्मान दाखवत भारताच्या टीमनं फायनल गाठली. फायनलला समोर होती वेस्ट इंडिज. त्यावेळची सगळ्यात डेडली टीम. फायनलमधली लढाई आपल्या सगळ्यांना माहीत आहे…

पण त्याचवेळी मैदानाबाहेर एका नव्या लढाईची ठिणगी पडली होती.

बीसीसीआयचे तत्कालीन प्रेसिडेंट एनकेपी साळवे यांना केंद्रीय मंत्री सिद्धार्थ शंकरराय यांचा फोन आला. त्यांनी फायनलची दोन तिकीटं मागितली, साळवे म्हणाले, ‘करतो नियोजन.’ साळवे केंद्रीय मंत्री, आयसीसीचे मेम्बर, बीसीसीआयचे प्रेसिडेंट त्यामुळं दोन तिकीटं म्हणजे काय जड विषय नव्हता. पण इंग्लंड बोर्डाच्या अधिकाऱ्यानं साळवेंना ही तिकीटं दिलीच नाहीत. 

वर सांगितलं ‘आधीच दोन तिकिटं दिलीयेत ना, मग अजून मिळणार नाहीत.’

 त्यात फायनलच्या दिवशी एमसीसी मेम्बर्ससाठी राखीव असलेल्या खुर्च्या रिकाम्या पाहून साळवे आणखीनच चिडले. त्यांनी अपमान तात्पुरता पचवला… पण ते हा अपमान विसरले नाहीत.

साळवेंनी एक गोष्ट पक्की डोक्यात ठेवली होती, क्रिकेट म्हणजे फक्त इंग्लंड नाही, हे जगाला दाखवून द्यायचं. कारण तोवर तिन्ही वर्ल्डकप इंग्लंडमध्येच झाले होते. क्रिकेटचे कारभारी असणाऱ्या आयसीसीवरही इंग्लंडचं वर्चस्व होतं. इंग्लंडची रेष खोडता येणार नव्हती, त्यामुळं साळवेंनी आपली रेष मोठी करण्याचं ठरवलं. 

वर्ल्डकपला महिनाही झाला नव्हता आणि त्यांनी प्लॅन आखून मिटिंगचा सपाटा लावला. सप्टेंबर महिन्यात त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नूर मोहमद खान, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष गामिनी दिसनायके यांच्यासोबत लाहोरमध्ये मिटिंग घेतली. साळवेंच्या प्लॅनला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत आणि राजकीय पाठिंबा लागणार होता. त्यासाठी साळवेंना मदत मिळाली आयएस बिंद्रा आणि भारताच्या क्रिकेटमध्ये पैसा आणणारे डॉलरमिया अर्थात जगमोहन दालमिया यांची. 

सगळी टीम एकत्र आली आणि मग साळवेंनी प्लॅन सांगितला. हा प्लॅन होता, इंग्लंडचं कौतुक बास झालं, पुढचा वर्ल्डकप भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळवायचा.

आत्ता ऐकायला भारी वाटत असलं तरी त्याकाळ ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. इंग्लंडच्या हातात इतकी ताकद होती की, इतर देश इंग्लंडच्या विरोधात जाऊन भारताला मदत करतील याची सुतराम शक्यता नव्हती. पण दालमिया आणि साळवेंनी आपली पॉवर वापरली, त्यांनी बाकीचे देशही आपल्याकडे वळवता येतील याचं गणित मांडलं. 

८३ च्या वर्ल्डकपला वर्षही पूर्ण झालं नव्हतं आणि एनकेपी साळवेंनी आपला बदला पूर्ण करण्यासाठीचा पहिला फासा फेकला, 

एशियन क्रिकेट कौन्सिल.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये राजकीय तणाव असला, तरी क्रिकेट ही एकमेव गोष्ट या देशांना जोडणारी आहे. याच आधारे साळवेंनी १९ सप्टेंबर १९८३ ला दिल्लीमध्ये श्रीलंका, पाकिस्तान, भारत, मलेशिया, बांगलादेश आणि सिंगापूर या देशांच्या एशियन क्रिकेट कॉन्फरन्सची स्थापना केली. हीच संघटना पुढं जाऊन एशियन क्रिकेट कौन्सिल बनली. आयसीसीच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी साळवेंनी आपल्या खंडाची एकी दाखवली. 

क्रिकेटविश्वात पहिल्यांदाच एखादी रिजनल क्रिकेट संघटना उभी राहिली. इंग्लंडच्या बरोबरीची रेष साळवेंनी आखली होती.

आता वेळ होती दुसरा फासा फेकण्याची. साळवेंनी आयसीसीकडे एक प्रस्ताव दिला, १९८७ चा वर्ल्डकप एशियात आयोजित करण्यात यावा. पण साळवेंना दुसरा अपमान सहन करावा लागला. आयसीसीनं सांगितलं, ‘एशियात फार फार तर ४० ओव्हर्सच्या मॅचेस होतात, तिथं ना चांगले पिच आहेत, ना चांगली लाईटची सोय. त्यामुळं ६० ओव्हर्सचा वर्ल्डकप तिकडे होऊच शकत नाही.’ साळवे, दालमिया यांनी हे सुद्धा ऐकून घेतलं, पण फक्त वर्षभरात घडलेल्या घडामोडी बघता स्वस्थ बसण्याचा विषयच नव्हता.

साळवेंनी दुसरा प्लॅन आखायला घेतला, त्यांना आयसीसीला दाखवून द्यायचं होतं की एशियात मॅचेस खेळवल्या जाऊ शकतात. यासाठी एशियन टीम्समध्ये एक वनडे स्पर्धा खेळवण्यात यावी, जिचं नाव असेल एशिया कप. 

पण स्पर्धा आयोजित करण्यासाठी पैसा लागणार होता आणि सोयीसुविधा असलेलं ठिकाणही. साळवेंनी आपल्या हुकमाच्या एक्क्याला पाचारण केलं, अब्दुल रेहमान बुखातिर. 

हा माणूस म्हणजे क्रिकेटचा हबीबी. शारजा क्रिकेट स्टेडियमची स्थापना करणाऱ्या बुखातिर यांना क्रिकेटचा शौक होता, ते अनऑफिशिअल मॅचेसचं शारजात आयोजन करायचे. तिथं गावसकर, मियांदाद सारखे मोठे क्रिकेटर्स खेळलेले. त्यामुळं साळवेंनी बुताखिर यांना एक स्कीम दिली. ‘तुम्ही शारजामध्ये आमच्या मॅचेस खेळवा, या मॅचेस ऑफिशिअल असतील. तुमच्या ग्राउंडचं महत्त्व वाढेल.’

बुखातिर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, त्यांनी शारजाचं ग्राऊंड तर उपलब्ध करुन दिलंच पण सोबतच विजेत्याला ५० हजार यूएस डॉलर्सचं बक्षीस, मॅन ऑफ द मॅचला ५ हजार यूएस डॉलर्सचं बक्षिसही जाहीर केलं. एशिया कपला ठिकाण मिळालं आणि पैसाही. साळवेंनी डाव जिंकला होता.

त्यानंतर शारजामध्येच एशियन क्रिकेट कौन्सिलतर्फे एशिया कप आयोजित करण्यात आला. पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये सोडून दुसऱ्या खंडात अधिकृत इंटरनॅशनल क्रिकेट टूर्नामेंटचं आयोजन होत होतं. संयुक्त अरब अमिराती आयसीसीचे फुल मेंबरही नव्हते, पण तरीही त्यांनी हा आयोजनाचा विडा उचलला. 

६ एप्रिल १९८४, एशिया कपच्या रुपानं शारजानं आपली पहिली अधिकृत इंटरनॅशनल मॅच होस्ट केली. क्रिकेटमध्ये क्रांती घडायला सुरुवात झाली.

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान मॅचपासून सुरुवात केलेल्या शारजाच्या नावावर आज सर्वाधिक २८२ मॅचेस होस्ट करण्याचा विक्रम आहे. पहिला एशिया कप फक्त ३ टीम्समध्ये झाला होता, ज्यात भारतानं दोन्ही मॅचेस जिंकल्या आणि पाकिस्तानला हरवत एशिया कपवर आरामात नाव कोरलं. शारजामध्ये मिळवलेल्या या विजयामुळं गावस्करच्या नेतृत्वातली टीम खुश होती, शारजाला नवी ओळख मिळाल्याबद्दल अब्दुल रेहमान बुखातिर खुश होते, पण सगळ्यात खुश होते, एनकेपी साळवे.

साळवेंनी आयसीसीला दाखवून दिलं की एशियातही इंटरनॅशनल टूर्नामेंट होऊ शकते, तेही यशस्वीपणे. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या रुपानं त्यांनी जागतिक क्रिकेटवर भारताचं वर्चस्व वाढवायला सुरूवात केली. एशियातले सगळे देश त्यांनी एकत्र आणले आणि इंग्लंडपेक्षा मोठी रेष आखली.

पुढं जाऊन साळवेंनी इंग्लंडमधला वर्ल्डकप भारतात खेचून आणला.

२ तिकिटं नाकारण्याचा बदला किती महाग जाऊ शकतो, हे एकेकाळी क्रिकेटमधली महासत्ता असणाऱ्या इंग्लंडला एका मराठी माणसानं दाखवून दिलं. म्हणूनच आज एशिया कप गाजत असला तरी त्यासाठी एनकेपी साळवे नावाच्या हीरोनं दिलेलं योगदान विसरुन चालत नाही. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.