स्पर्धा संपल्यावर भाषणाला गेलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी पहिलं बक्षीस मारलं होतं…

अटल बिहारी वाजपेयी. भारताचे माजी पंतप्रधान, राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्यांचा साधेपणा, राजकारणावरची पकड या गोष्टी कायम चर्चेत राहिल्या. याच बरोबर आणखी एक गोष्ट चर्चेत राहिली, ते म्हणजे अटल बिहारी यांचं वक्तृत्व. अमोघ वक्तृत्व म्हणजे काय हे त्यांचं भाषण ऐकल्यावर समजलं, असं कित्येक राजकीय नेते, तज्ञ सांगतात. वाजपेयी भर सभेत बोलत असतील किंवा संसदेत त्यांचं भाषण असलं की लोकं खिळून राहायचे हे नक्की.

अनेकांना प्रश्न पडायचा की, वाजपेयी ही भाषणकला शिकले कशी? आणि ते त्यांच्या शालेय जीवनात कसे बोलत असतील?

वाजपेयींचा जन्म झाला, मध्य प्रदेशमधल्या ग्वालियरमध्ये. त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे पेशानं शिक्षक. आता शिक्षकाच्या पोरावर सगळ्या शाळेचं पार बारकाईनं लक्ष असतं. तो काय करतो, कसा वागतो, कसा बोलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसे मार्क पाडतो या सगळ्या गोष्टी कित्येकांच्या रडारवर असतात. साहजिकच अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरही करडी नजर असणारच.

कुठल्याही शाळेतल्या मुलाचा आणि भाषणाचा संबंध कधी येत असेल, तर तो वक्तृत्व स्पर्धेत. आपल्या शाळेबाहेरची पोरं-पोरी, ओळख नसलेले परीक्षक आणि गर्दीसमोर भाषण करायचं म्हणलं की फिक्समध्ये घाम फुटतो. त्यात अटल बिहारी म्हणजे मास्तरांचा मुलगा, त्यामुळं असल्या स्पर्धांमध्ये त्यांच्याकडनं अपेक्षाही खूप.

एकदा मध्य प्रदेशात आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा होती. त्यांच्या शाळेकडून अर्थातच अटल बिहारी यांची निवड झाली. पण स्पर्धा होती दुसऱ्या शहरात. त्यामुळं अटल बिहारींना रात्रीचा प्रवास करुन स्पर्धेचं ठिकाण गाठायचं होतं. स्पर्धा होती सकाळच्या वेळेत, गर्दीनं भरलेल्या रेल्वेमधून रात्रभर प्रवास करुन ते स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले, पण पोहोचायला झाली दुपार.

तोवर स्पर्धा संपलेली, सगळ्या स्पर्धकांची भाषणंही झाली होती. आपण उशीरा पोहोचलो, याबद्दल त्यांना वाईट वाटलं. पण ते आयोजकांकडे गेले, त्यांना विनंती केली, ‘मी सगळी तयारी करुन आलोय, मला कृपया भाषण करण्याची संधी द्या.’ परीक्षक पोरांची भाषणं ऐकून वैतागलेले. पण त्यांनी नाईलाजानं होकार दिला.

अटल बिहारी भाषणाला उभे राहिले. त्यांनी नेहमीप्रमाणं दमदार भाषण केलं. ते ऐकून आयोजक, परीक्षक, प्रेक्षक सगळेच खुश झाले. पण स्पर्धा मात्र संपली होती… निकाल लागायचा बाकी होता. वाजपेयींच्या भाषणाची मोहिनी इतकी होती, की सर्वांनी एकमतानं लहानग्या अटल बिहारी वाजपेयींना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला.

उशीरा पोहोचलेला तो मुलगा, स्पर्धा संपल्यावर बोलायला उभा राहिला आणि पहिलं बक्षीसही जिंकला. पुढे जाऊन अटल बिहारींच्या वक्तृत्वानं देशभरात कित्येकांची मनं जिंकली, जे पाहून कदाचित त्या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षकांनाही आनंद होत असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.