शर्टाच्या बटणावरुन १० हजार जणांचा तपास करत महाराष्ट्र पोलिसांनी आरोपी शोधून काढलेला

लहानपणी आपण सगळेच सीआयडी बघायचो, कुठलाही क्राईम झाला की, एसीपी प्रद्युमन आणि त्यांची टीम दरवाजा तोडून बिडून तिथं पोहोचायची. आधीच मेलेल्या माणसाकडे बघून, ‘अरे ये तो मर गया है’ हे म्हणल्यावरून आपण त्यांची मापं काढायचो खरी, पण सीआयडी होतं लई भारी.

एखाद्या केसमध्ये काय घावत नसलं, की पुन्हा पुन्हा क्राईम सिनची पाहणी करुन अजून काय घावतंय का? कुठला पुरावा मिळतोय का? याचिका अनेकदा तपासणी व्हायची. मग कायतरी छोटी गोष्ट सापडायची आणि त्यावरुन सगळ्या केसचा उलगडा व्हायचा.

मग दया आरोपीला कानपट्टा द्यायचा आणि तो कार्यकर्ता डायरेक्ट जेलात दिसायचा.

पण हे फक्त सीआयडीमध्येच व्हायचं असं नाही, तर खऱ्या आयुष्यात पोलिसांनीही केलेलं. तेही महाराष्ट्र पोलिसांनी.

बेनेट रिबोलो केसमध्ये तर मुंबई पोलिसांकडे एक शर्टचा तुकडा होता. त्यावरुन त्यांनी टेलरचा शोध घेला आणि त्यानंतर मग खुन्यापर्यंत पोहोचले, त्या केसबद्दल बोल भिडूनं लिहून ठेवलंच आहे.

मुंबई पोलीस ग्रेट का आहेत, एका छोट्या पुराव्यावरून असा शोधलेला खूनी.. 

२०१९ मध्ये औरंगाबादमध्ये एक घटना घडली. वाईन शॉपचे मॅनेजर आणि त्यांच्या सहकाऱ्यावर काही लुटारूंनी हल्ला केला. त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्यात आली आणि या सगळ्यात वाईन शॉपचे मॅनेजर भिकन जाधव यांचा खून झाला. तर त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला.

हल्ला लुटीच्या दृष्टीनं झाला असला, तरी या हत्येमुळं गुन्ह्याला गंभीर वळण लागलं होतं. त्यात जाधव यांच्या नातेवाईकांनी न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिस चौकीत जाऊन त्यांना जाबही विचारला. सिल्लोडमधलं वातावरण पेटलं होतं. वाहतुक कोंडीही झाली, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं खरं, पण तरीही हत्त्येचा उलगडा झाला नव्हता.

पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. हल्ला झालेल्या ठिकाणची कसून तपासणी करण्यात आली, पण कुठलाच ठोस पुरावा सापडला नाही, काय सापडलं असेल तर एक शर्टाचं बटण.

कित्येक शर्टाची बटणं सारखीच असतात. त्या एवढ्याश्या तुकड्यावरुन कसलाच अंदाज लागणं कठीण होतं. मात्र पोलिसांनी मात्र कसून तपास करायला सुरुवात केली होती.

खबऱ्यांचं नेटवर्क कामाला लागलं होतं, पण तिथून काहीच लीड मिळेना. कॅलेंडरची पानं पलटत होती आणि खुनी मात्र मोकाटच होते, पोलिसांवरचा दबाव आणि जबाबदारीही वाढत होती.

पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं, ते म्हणजे शर्टाच्या बटणावरुन आरोपी शोधणं.

ते बटण अगदी साधं असलं, तरी त्यावर ‘rope last stich’ हे शब्द कोरलेले होते. हाच पोलिसांना मिळालेला एकमेव क्लू होता. आपण जरी हे गुगल केलं तर आपल्याला कपड्यांचे हजारो फोटो दिसतात. साहजिकच हजारो लोकं हे शर्ट घेत असतील.

मात्र पोलिसांनी ठरवलं होतं, ‘करना है, तो करना है.’

त्यांनी हे शर्ट विकत घेणाऱ्यांची माहिती काढली, तेव्हा त्यांना तब्बल १० हजार लोकांची लिस्ट मिळाली. त्यातल्या प्रत्येक खरेदी करणाऱ्यांची माहिती घेण्यात आली, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड चेक करण्यात आलं. डोंगर पोखरुन उंदीर काढायचा होता आणि त्यातही पोलिसांना असे २४६ जण सापडले ज्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी होती.

त्यात हे २४६ जण एकाच ठिकाणचे नव्हते, तर वेगवेगळ्या राज्यात पसरले होते. तिथल्या पोलिसांशी संपर्क साधून, तिथल्या खबऱ्यांचं नेटवर्क वापरुन तपासाची चक्र पुन्हा एकदा फिरू लागली.

हा तपास करता करता पोलिसांना एक लिंक सापडली, ती म्हणजे अजय रगडे या औरंगाबाद मधल्याच माणसाचं नाव यात होतं. त्यानं मागवलेल्या गोष्टींची यादी काढली तेव्हा पोलिसांना समजलं की काही दिवसांपूर्वी त्यानं दोन सुरेही मागवले आहेत.

पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. आणखी खोलात जाऊन चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, त्यानं हे सुरे हल्ल्याच्या दोन दिवस आधीच घेतले होते. पोलिसांनी सापळा रचला आणि रगडे ला ताब्यात घेण्यात आलं.

त्याची चौकशी करताना पोलिस गुन्ह्यात सामील असलेल्या आणखी दोन आरोपींपर्यंत पोहोचले. संदीप गायकवाड आणि चेतन गायकवाड यांना अटक करण्यात आली. तपासात त्यांच्याकडे रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आढळली.

तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘चेतन गायकवाडला या हत्येचा मास्टरमाईंड होता, तर त्यानं आणि संदीप गायकवाडनं याआधीही एक वाईन शॉप लुटल्याचं तपासात पुढे आलं.’

थोडक्यात पोलिसांनी एक नाही तर दोन गुन्ह्यांची उकल केली, जाधव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला. या तपासाचं काम बघणाऱ्या पोलिसांच्या टीमला ३० हजारांचं बक्षीसही मिळालं आणि या सगळ्यात आणखी एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे, पोलिस कुठल्याही पुराव्यापासून आरोपीला गाठू शकतातच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.