पॅट कमिन्सच्या फटकेबाजीला मटका शॉट समजत असाल, तर जरा हे वाचा

आयपीएल सुरू तर झाली पण चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचे फॅन अशी झुंजच लागेना. कारण सध्या दोन्ही संघ बेकार माती खातायत. त्यामुळं समोरच्या टीमला बोलणार तरी कुठल्या तोंडानी..? मात्र बुधवारच्या रात्री, चेन्नईवाल्यांनी मुंबईवाल्यांना शोधून शोधून चिडवलं असणार… कारण मुंबई कोलकात्याकडून वाईट हरली आणि त्यामागचं कारण होता… 

पॅट कमिन्स.

सगळ्यात आधी आपण बुधवारच्या हायलाईट्स बघू. मुंबई आणि कोलकात्याची मॅच होती. १६२ रन्सचं टार्गेट होतं. पीच बॅटिंगसाठी थोडं अवघड आणि त्यात कोलकात्याची मिडल ऑर्डर ढेपाळली. मॅच गेलीच असं वाटत असताना, पॅट कमिन्स बॅटिंगला आला. आता तसा हा बॉलर, त्यामुळं मॅच काढण्यावर शंका होती. पण या भावानं १४ बॉलमध्येच फिफ्टी पूर्ण केली, डायरेक्ट रेकॉर्डशी बरोबरी. त्याच्या १५ बॉल ५६ रन्समुळं कोलकात्यानं मॅच मारली आणि मुंबई फॅन्सची तोंडं आंबली.

एखादा बॉलर, साक्षात बुमराहला लांब लांब छकडे हाणतो, मुंबईच्या हातातली मॅच खातो. हे बघून लय जण म्हणाले, हा तर मटका शॉट होता. तुम्हालाही तसं वाटत असलं, तर थांबा… आधी पॅट कमिन्सची स्टोरी वाचा आणि मग ठरवा.

सुरुवातीपासून सुरुवात करू. कमिन्स ऑस्ट्रेलियाचा, तिथं फास्ट बॉलर्सची परंपरा आधीच उज्ज्वल, त्यामुळं कमिन्समधलं टॅलेंट पुढं यायला वेळ लागला नाय. वयाच्या अठराव्या वर्षी बाकीची गाभडी चकाट्या पिटत असताना यानं ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये त्यानं कॅलिस, डिव्हिलिअर्स अशा बाप लोकांच्या विकेट घेत ६ गडी बाद केले होते.

पण त्या मॅचमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १८ रन्स हवे होते. शेवटच्या दोन विकेट हातात होत्या आणि बॉलिंगला होता डेल स्टेन. अठरा वर्षांच्या कवळ्या पॅट कमिन्सनं त्यादिवशी स्टेनगनचा पद्धतशीर सामना केला आणि ऑस्ट्रेलिया जिंकली.

पहिल्याच मॅचमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये चमक दाखवल्यावर सगळ्यांना वाटलं होतं, ऑस्ट्रेलियाला नवा मॅकग्रा मिळालाय.

पण २०११ मध्ये पहिली टेस्ट खेळल्यानंतर दुसरी टेस्ट खेळायला कमिन्सला सहा वर्ष वाट पाहावी लागली.

या दरम्यान तो वनडे आणि टी२० क्रिकेट खेळला, पण मानाचं पान असणाऱ्या टेस्ट टीममध्ये त्याचा जॅक लागत नव्हता. याचं कारण होतं त्याला सतत होणाऱ्या दुखापती. आता खेळेल, नंतर खेळेल असं वाटत असतानाच, कमिन्सचा पाय, पाठ असं कायतरी बाद व्हायचं आणि त्याची गाडी अडखळायचीच.

दुखापत आणि कमिन्स यांचं नातं तसं लई जुनंय, कारण लहानपणीच कमिन्सच्या मधल्या बोटाचा तुकडा पडला होता. तेही तो ज्या हातानं बॉलिंग करतो त्याचाच.

पण म्हणून गडी रडत नाय बसला, या बोटाचा वापर त्यानं आपली बॉलिंग भारी करण्यात केला.

मार्च २०१७ मध्ये मिशेल स्टार्क ऐनवेळी जखमी झाला आणि आपल्या सोफ्यावर बसून निवांत मॅचेस बघणाऱ्या कमिन्सला डायरेक्ट मॅच खेळण्यासाठी भारतात बोलावण्यात आलं. भावानं पण भारताच्या पाटा पिचेसवर पद्धतशीर ३ विकेट्स काढल्या. तिकडून मग गडी सुटला तो सुटलाच. ऑस्ट्रेलियाला त्याचं महत्त्व समजलं आणि जगातल्या इतर क्रिकेट संघांना त्याची भीती बसली.

पॅट कमिन्स आता क्रिकेटमधला हुकमी एक्का बनला होता, भावाच्या बॉलिंगवर सनासना विकेट्स पडत होत्या आणि २०१९ मध्ये तो टेस्ट क्रिकेटमधला नंबर वन बॉलर बनला. कधीकाळी जे पोरगं पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळायला सहा वर्ष वाट बघत होतं, त्याची आता नुसती हवा नाय तर दहशत होती.

पण गोष्ट इथंच संपली नाही,

पॅट कमिन्सनं कोविड काळात संकटात असलेल्या भारताला ५० हजार डॉलर्सची मदत केली. यावरुन त्याचं प्रचंड कौतुक झालं. त्याचा दिलदारपणा तर दिसून आलाच होता, पण वेळ होती डेरिंग बघायची.

२०२२ ची ॲशेस तोंडावर होती, तेवढ्यात कांगारु कॅप्टन टीम पेनला एका दणक्यात कॅप्टन्सी सोडावी लागली. ॲशेसचं प्रेशर काय असतं हे काय वेगळं सांगायला नको. टीम फुल प्रॉब्लेममध्ये असताना कमिन्सकडे कॅप्टन्सी गेली. आता फास्ट बॉलर कसोटी संघाचा कॅप्टन बनलाय, हे चित्र तसं फार कमीवेळा पाहायला मिळतं. पण आजपर्यंत ८ मॅचेसमध्ये नेतृत्व करत कमिन्सनं ऑस्ट्रेलियन टीमला पराभवाचं तोंड पाहू दिलेलं नाही.

पाकिस्तान दौऱ्यात जेव्हा सिरीज ड्रॉ होईल अशी परिस्थिती होती, तेव्हा कमिन्सनं डेरिंग दाखवली. आपल्या बॉलर्सवर विश्वास दाखवत डाव घोषित केला. जिथं बॉल धड बाउन्सही होत नव्हता, अशा पिचेसवर बॉलिंगनं राडा घातला. 

जितक्या ताकदीची बॉलिंग, तितक्याच ताकदीची कॅप्टन्सी, त्यामुळंच पाकिस्तानला आपल्या होम ग्राऊंडवरही जिंकता आलं नाही. आता आधी ५० हजार डॉलर्स आणि नंतर पाकिस्तानला हरवणं, साहजिकच पॅट कमिन्स सगळ्या भारताचा फेव्हरेट झाला.

आपण फक्त बॉलिंगमध्येच नाही, तर बॅटिंगमध्येही बाप आहोत… हे कमिन्सनं काल पुन्हा एकदा दाखवून दिलं. 

दोन वर्ष आधीच्या आयपीएलमध्ये त्यानं बुमराहला ओव्हरमध्ये चार छकडेही मारले होते, बुधवारी मात्र त्यानं सगळ्यावर कळस चढवला आणि उगं आंधीधुंदी शॉट न खेळता पद्धतशीर फिफ्टी केली. 

ज्यांना मुंबई आवडते त्यांचा मूड ऑफ झाला, ज्यांना कोलकाता आणि चेन्नई आवडते त्यांनी रसगुल्ला खाऊन लुंगी डान्स केला. आणि ज्यांना क्रिकेट आवडतं त्यांनी एका फास्ट बॉलरची लय भारी बॅटिंग बघितली. 

असा फास्ट बॉलर ज्यानं दुखापतीला, प्रेशरला, पाकिस्तानला आणि आता मुंबई इंडियन्सयलाही हरवलंय, तेही थाटात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.