एका हिरव्या पडद्यावर जाऊ नका, बिअर ग्रिल्स आपल्याला लय आधीपासून गंडवतोय

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला, त्यात खुंखार, प्राणीभक्षक, ओरिजिनल खिलाडीयोंका खिलाडी, अक्षय कुमारचा पणजोबा बिअर ग्रिल्स हिरव्या पडद्यासमोर बसून स्टंटची तयारी करताना दिसतोय.

WhatsApp Image 2022 05 17 at 8.07.45 PM

आता हा हिरवा पडदा असतोय क्रोमाचा, याच्यासमोर जे काही करता ते एडिट करुन मागचा सीन बदलता येतो, पार सुपरहिरो पिक्चर्सपासून, न्यूज चॅनेलपर्यंत सगळीकडे हा क्रोमा वापरला जातो. म्हणजे तुम्ही त्या हिरव्या पडद्यासमोर बसून चहा पित असाल, तर एडिटिंगमध्ये तुम्ही पॅरिसमध्ये चहा पिताय असं सहज दाखवता येऊ शकतं.

थोडक्यात काय, तर या पडद्यामुळं लोकांना गंडवता येतंय, पिक्चर किंवा न्यूज चॅनेल्सचं आपण समजू शकतो. पण बिअर ग्रिल्स असतंय जंगलात, धबधब्यापाशी, गुहेत-बिहेत आणि तो असं रिस्कमध्ये राहतो हेच बघायला तर आपल्याला आवडतं.

मग हा गडी आपल्याला आतापर्यंत चुना लावतोय का? असा प्रश्न सगळ्या जनतेला पडला.

नंतर मग ग्रिल्सची पूर्ण पोस्ट पाहायला मिळाली, ज्यात हे सगळं त्याच्या आगामी ॲनिमेशन फिल्मसाठी आहे. साहजिकच लोकांना वाटायला लागलं, ग्रिल्स भाऊ डेअरडेव्हील आहे.

पण त्याचं असंय की या ग्रीन पडद्याचा विषय एका पिक्चर पुरता आहे, बिअर ग्रिल्स आपल्याला लय आधीपासून चुना लावत आलाय, अगदी आपल्याला सोडून गेलेल्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्याही आधीपासून.

मार्च २००६ मध्ये ‘Man vs Wild’ चा पहिला एपिसोड टीव्हीवर आला, त्यात बिअर ग्रिल्स नावाचा एक भिडू, जंगल, ज्वालामुखी अशा भागात राहतो आणि जगण्यासाठी काय काय करतो हे दाखवलं. कधी त्याला अन्न मिळत नाही, कधी प्यायचं पाणी नसतं. मग का कधी सापच मार, कधी किडेच खा अशा गोष्टी करुन जिवंत राहतो. त्याला पाणी मिळालं नाही की आपल्याला भीती वाटायची, कधी तो वाहत्या नदीत अडकला की पार कसा जाणार हा प्रश्न पडायचा…

लय प्रामाणिकपणे सांगा, आपल्यातली किती लोकं अशी जंगलात अडकणारेत? तर लय कमी.

 इथं ट्रेकिंगला जायला दोन दिवस आधी तयार होणारी जनता आता संसारात अडकली. जे आजही आवडीनं जातात, ते सगळी काळजी घेतात. त्यामुळं असं बिअर ग्रिल्ससारखं हायटेक मोगली म्हणून जगणं आपल्या तर नशिबात नाय, हे माहीत असूनही आपण शो बघायचो.

आपल्याला कौतुक वाटायचं की गडी केवढ्या लडतरी करतोय. कधी कधी वाटायचं लयच एक्स्ट्रीम कंडिशन आली, तर बिअर ग्रिल्सचं कसं व्हायचं.

पण गड्यांनो ग्रिल्सनं आपल्याला लय स्कीमा दिल्यात ज्यावर आपण सपशेल गंडलोय-

स्कीम क्रमांक एक –

एका एपिसोडमध्ये बिअर ग्रिल्स तापत्या लाव्हावरुन जाताना दिसतो, जमिनीतून धूर येत असतो. इमॅजिन करुन आपल्या अंगावर काटा येतो आणि बघतानाही. पण खरं म्हणजे स्पेशल इफेक्ट्स आणि स्मोकिंग मशीन वापरुन तशी व्हिज्युअल्स करण्यात आली होती. म्हणजे तिथून आपणही निवांत चालत गेलो असतो.

स्कीम क्रमांक दोन-

हे तुम्हाला आठवत असेल. एका एपिसोडमध्ये बिअर ग्रिल्सला एक दरी पार करायची असते, आजूबाजूला तुटलेले दगड, पाय घसरला की दरीत आणि दगडावर पडला तरी कपाळमोक्ष. पण ग्रिल्स अगदी सेफमध्ये उडी मारतो आणि पलीकडे जातो. नंतर याचा पूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर समजतं की तो दरीचा भागही किरकोळ आहे आणि जरा पुढं गेलं, तर मोकळं मैदान आहे, जिथून आरामात कुठंही जाता येईल.

स्कीम क्रमांक तीन-

पहिल्याच सिझनमधला किस्साय. ग्रिल्स जंगलात असतो आणि तिथं काही जंगली घोडे असतात. हा भाऊ त्यांच्याशी एकदम निवांत मिक्स होतो, ते घोडे याला लाथही मारत नाहीत आणि किंचाळतही नाहीत. आपल्याला लय अप्रूप वाटतं, पण नंतर स्पष्ट होतं की जंगली घोडे नाहीतच. एका जवळच्या कॅम्पमधून हे घोडे आणण्यात आले होते, जे माणसाळलेले होते. त्यामुळं ग्रिल्सला काय अडचण आली नाही.

स्कीम क्रमांक चार-

तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल की ग्रिल्स पावसात, आजूबाजूला वेली असताना झोपलाय. त्याला झोप लागत नसल्याचंही त्यानं अनेकदा सांगितलंय. पण एका पेपरनं बातमी केली होती की, ग्रिल्स जवळच्या छोट्या हॉटेल्समध्ये झोपतो, जंगलात नाही. आयोव, हे तर लईच घातक निघालं. ग्रिल्सनं याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं, तो म्हणला ‘मी नेहमीच जंगलात झोपायचो असं नाही, जेव्हा आम्ही त्या भागात आहोत पण शूटिंग सुरु नाहीये तेव्हा मी इतर सहकाऱ्यांसोबत हॉटेल्समध्ये जायचो किंवा फार दमलो असेल, तर हॉटेलमध्ये झोपायचो.’

तशा या प्रातिनिधिक स्कीमा आहेत, अजून लय वेळा आपला गंडेलशहा झालाय. मात्र इतक्या वेळा मॅटर समोर आला असला, तर डिस्कव्हरीवाल्यांनी यावर काही केलं का नाही? तर उत्तर आहे हो.

त्यांनी धडधडीत कबूल केलं, की शो चा मूळ उद्देश हा अशा परिस्थितीत कसं सर्व्हाइव्ह करायचं हे दाखवायचा आहे. त्यामुळं शो मधले सिक्वेन्स स्क्रिप्टेड असतात. काही एपिसोड्सनंतर त्यांनी थेट ‘मेकिंग’ दाखवायला सुरुवात केली. सोबतच ते प्रत्येक एपिसोडच्या आधी एक लाईन दाखवू लागले, 

Bear Grylls and the crew receive support when they are in potentially life-threatening situations, as required by health and safety regulations. On some occasions, situations are presented to Bear so he can demonstrate survival techniques. Professional advice should always be sought before entering any dangerous environment.

म्हणजे लईच अडचणीची वेळ असेल, तर ग्रिल्स आणि त्याच्या क्रूला मदत मिळायची. ग्रिल्स स्वतःवर अघोरी उपचार करत असला, तरी त्यांच्याकडं मेडिकल किटही असायचं. लईच डेंजर लडतर झाली, तर मदतीला हेलिकॉप्टरही असायचं.

आता या सगळ्याचं कारण सिम्पल होतं, बिअर ग्रिल्सला एकच गोष्ट दाखवायची होती, की अशी वेळ आलीच तर कसं जगाल. पण अनेक जण म्हणतात, त्यानं दाखवलेल्या ट्रिक्सही काय उपयोगाच्या नाहीत. त्यानं रिॲलिटी शो केला, ज्यात रिॲलिटी तेवढी नव्हती.

वाचून विश्वास बसला नसेल तर व्हिडीओही बघून घ्या.

 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.