बॅड बॉय, नशीबवान असली लेबल खोडत, आजच्याच दिवशी स्टोक्सनं ऑस्ट्रेलियाला झुकवलं होतं…

२०१६ चं वर्ष. भारतात टी२० वर्ल्डकप होत होता. सगळी टूर्नामेंट भारी खेळलेल्या भारतानं ऐन सेमीफायनलला कच खाल्ल्ली होती. आपल्याला हरवून वेस्ट इंडिजची टीम फायनलला गेली आणि त्यांची मॅच झाली इंग्लंडसोबत. कोलकात्याच्या ईडन्सवर झालेली फायनल वेस्ट इंडिजनं जिंकली आणि तेही कशी तर कार्लोस ब्रेथवेटनं शेवटच्या ४ बॉलवर ४ सिक्स हाणले आणि इंग्लंडच्या हातातली मॅच गेली.

ब्रेथवेटचा जल्लोष करतानाचा फोटो सगळ्यांनी शेअर केला, पण तिथंच खाली हे चार बॉल टाकणारा बेन स्टोक्स हताश होऊन रडत होता.

त्या ४ बॉलमुळं स्टोक्सला अगणित शिव्या पडल्या. त्यात २०१७ मध्ये बारच्या बाहेर भांडणं केल्यामुळं त्याला अटक झाली, लोकांनी स्टोक्सला बाद करुन टाकलं होतं. मात्र दोनच वर्षांनी स्टोक्सनं खतरनाक कमबॅक केलं आणि वर्ल्डकप फायनलमध्ये खुंखार बॅटिंग करत इंग्लंडचे हात वर्ल्डकपपर्यंत पोहोचवले.

पण नेमकं सुपरओव्हरचा राडा आणि न्यूझीलंडला मिळालेल्या सहानुभूतीमुळे स्टोक्सची ही इनिंग झाकोळली गेली. आजही वर्ल्डकपचा विषय निघाला की लोकांना आधी विल्यम्सन आठवतो, मग स्टोक्स.

हिरो बनायचे दोन भारी चान्स स्टोक्सच्या हातातून गेले होते. त्याच्या चाहत्यांना एकच भीती होती की स्टोक्सचा ‘बझ एल्ड्रीन’ होऊ नये. कारण बझ एल्ड्रीन भारी काम करुनही कुणाच्या लक्षात राहिला नव्हता. (एल्ड्रीन कोण, तर चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा माणूस.)

पण स्टोक्सच्या आयुष्यातही एक त्याचा दिवस आला, जेव्हा पुन्हा एकदा सगळ्या जगाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. त्याला हिरो बनायची संधी होती आणि त्यानं ती संधी गाजवलीही.

स्टेज होतं ऍशेसचं, सिरीजमधली तिसरी टेस्ट. पहिली बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची अवस्था १७९ वर ऑलआऊट अशी झाली होती. इंग्लंडला जिंकायचा फुल चान्स होता. मात्र इंग्लंडचा पहिल्या इनिंगमधला स्कोअर होता, ऑलआऊट ६७. टीममधल्या फक्त एका प्लेअरला १२ रन्स करता आले होते, बाकी सगळे टेलिफोन नंबर बनेल अशा आकड्यात आऊट झाले होते.

समोरच्या टीमला एवढ्या स्वस्तात आऊट केल्यावर शांततेनं खेळेल ती ऑस्ट्रेलिया कसली ?

त्यांनी पुढच्या इनिंगमध्ये खतरनाक बॅटिंगला सुरुवात केली होती. हे फिक्स मोठा स्कोअर मारणार असं वाटत होतं, पण बेन स्टोक्सनं त्यांच्या सुसाट सुटलेल्या गाडीला ब्रेक मारला. त्यानं ३ विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला २४६ रन्सपर्यंत मजल मारता आली, आकडा छोटा वाटत असला तरी पहिल्या इनिंगच्या लीडमुळं इंग्लंडला टार्गेट मिळालं होतं, ३५९ रन्स.

आजवर इंग्लंडनं कधीच इतकं मोठं आव्हान पार केलं नव्हतं, साहजिकच विषय अवघड होता. हातात अडीच दिवस असले, तरी क्रीझवर खुंटा गाडून उभं राहणं गरजेचं होतं.

ते काम केलं इंग्लंडचा सगळ्यात भरवशाचा बॅट्समन जो रूटनं. तिसरा दिवस संपेपर्यंत इंग्लंडनं तीन विकेट्स घालवल्या होत्या. क्रीझवर होता फिफ्टी मारणारा रुट आणि बेन स्टोक्स. चौथ्या दिवशी इंग्लंडला जिंकायला २०३ रन्स हवे होते, स्टोक्स इतका निवांत खेळत होता की १३ रन्स पूर्ण करायला त्यानं ८३ बॉल घेतले होते. तोवर वॉर्नरनं घेतलेल्या वर्ल्ड क्लास कॅचमुळं जो रुट आऊट झालेला.

बेअरस्टोनं जरा कुठं बॉल उचलायला सुरुवात केली होती, मात्र तोही ३५ वर गेला. स्टोक्सच्याच चुकीमुळे जोस बटलरही रनआऊट झाला. ख्रिस वोक्सही एका रनवरच आऊट झाला आणि इंग्लंड पक्की कचाट्यात सापडली.

स्टोक्सनं मात्र कासवगतीनं का होईना, पण स्कोअरबोर्ड हलता ठेवला होता. त्यानं फिफ्टी पूर्ण करायला ११२ बॉल घेतले होते.

ऑस्ट्रेलियाला दोन गोष्टी माहिती होत्या, स्टोक्स म्हणजे काही द्रविड नाही जो दिवसभर थांबून खेळेल आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ द्यायला लक्ष्मणही नाही. त्यामुळं विकेट्स काढल्या तर मॅच आणि ट्रॉफी दोन्ही आपलंच आहे.

होतही तसंच होतं, समोरच्या बाजूनं कुणीच स्टोक्सला हवी तशी साथ देत नव्हतं, आर्चरनं ज्या स्पीडनं तीन चव्वे मारले त्याच स्पीडनं तो आऊट झाला आणि ब्रॉडचं तर दांडकं उडालं होतं. इंग्लंडच्या हातात फक्त एक विकेट होती आणि क्रीझवर होते…

जॅक लीच आणि बेन स्टोक्स.

लीच पडला बॉलर, त्यात ऑस्ट्रेलियन तोफखाने आग ओकत होते, त्यामुळं या माऱ्यासमोर लीचचं टिकणं अवघड होतं. स्टोक्सकडे एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे हाणामारी करणं. त्यानं सुरुवात केली नॅथन लायनपासून. लायनला दोन खणखणीत छकडे बसले, पॅट कमिन्सनंही एक खाल्ला. टार्गेट ५० च्या आत आलं.

मग बॉलिंगला आला हेझलवूड. याला विकेट मिळू शकते असं कमेंटेटर्स बोलत होते. दडपण वाढलं होतं आणि स्टोक्सनं एक फोर आणि दोन सिक्स मारत त्याच्या बॉलिंगमधली हवा काढून घेतली. टार्गेट आता २० रन्सच्याही आत आलं होतं आणि आता कुठे मॅचला खरा रंग चढला. स्टोक्स आणि लीचनं ३७ बॉलमध्ये ५० रन्सची पार्टनरशिप केली. यात लीचचा वाटा शून्य रन्सचा होता.

अशातच कमिन्स बॉलिंगला आला, जिंकायला १७ रन्स हवे होते. स्टोक्सनं शॉट खेळला खरा पण कॅच उडाला, मॅच इंग्लंडच्या हातून गेलीच होती आणि तेवढ्यात मार्कस हॅरिसनं कॅच सोडला. त्याच्या पुढच्या दोन्ही बॉलवर स्टोक्सनं फोर मारली आता टार्गेट उरलं ९ रन्सचं.

स्टोक्सनं लीचला स्ट्राईक दिली, कमिन्सचा बॉल लीचच्या पायावर आदळला, जिंकायच्या टेन्शनमध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियानं रिव्ह्यू घेतला, पण तो फेल ठरला. हा ऑस्ट्रेलियाचा शेवटचा रिव्ह्यू होता.

ओव्हर संपली स्टोक्स पुन्हा स्ट्राईकवर आला.

लायननं पहिले दोन बॉल डॉट टाकले, तिसरा बॉल स्टोक्सनं स्टॅन्डमध्ये भिरकावून दिला. क्रिकेट बघणाऱ्या प्रत्येकाच्या बत्त्या डीम झालेल्या. टेस्ट क्रिकेटनं किरकोळीत टी-२० क्रिकेटची मापं काढावीत असा हा किस्सा होता.

तेवढ्यात गेम फिरली, ओव्हरच्या पाचव्या बॉलला स्टोक्सनं रिव्हर्स स्वीप केला आणि पळायचा इशारा दिला, जॅक लीच निम्म्यापेक्षा पुढं आला होता आणि मग स्टोक्स म्हणला… ‘NOOOOOOOO!!’

तोवर बॉल तिकडं लायनच्या हातात पोहोचलाच होता, पण गडबडीत त्यानं स्टम्प उडवायची संधी घालवली.

थरार कायम राहिला…

स्टोक्सची एकाग्रता आणि कॉन्फिडन्स दोन्ही गंडले होते, पुढचा बॉल तो हुकला आणि सरळ पॅडवर लागला. त्याचं नशीब जोरावर होतं की अंपायरनं आऊट दिला नाही आणि ऑस्ट्रेलियाचे रिव्ह्यू पण संपले होते. स्टोक्स वाचला खरा, पण या सगळ्यात एक गडबड झाली होती, ती म्हणजे स्टोक्सला स्ट्राईक स्वतःकडे घेता आली नव्हती.

आता सामना रंगला जॅक लीच विरुद्ध पॅट कमिन्स…

पहिला बॉल बाउन्सर, लीचच्या डोक्यावरुन गेला. दुसरा पुन्हा अंगावर, भावानं सोडून दिला. स्टेडियममधल्या लोकांची बिअर गरम झाली होती, कारण ती प्यावी असंही कुणाच्या डोक्यात येत नव्हतं. लीचनं आपला चष्मा काढला आणि पुसला, पुढचा बॉल परत चांगल्या हाईटला आला पण यावेळी मात्र लीचनं एक रन काढलाच.

आता स्कोअर बरोबरीत होते, जे काही ओझं होतं ते स्टोक्सच्या खांद्यावर होतं. त्यानंही निराशा केली नाही, कमिन्सला कव्हर्समधून खणखणीत बाउंड्री बसली आणि इंग्लंडनं मॅच जिंकली.

३३० मिनिटं क्रीझवर उभ्या राहिलेल्या स्टोक्सनं इतिहास लिहिला, त्याचा नॉटआऊट १३५ स्कोअर आणि शेवटचा चौका इतिहासात अजरामर झाला. जॅक लीचच्या त्या एका रनला सेंच्युरी इतकं महत्त्व मिळालं. वर्ल्डकप फायनलपेक्षाही स्टोक्सनं त्या इनिंगमध्ये केलेली कामगिरी महत्त्वाची होती.

याच इनिंगमुळं त्याचा पराक्रमी तरीही दुर्लक्षित बझ एल्ड्रीन होता होता राहिला… बेंजामिन अँड्र्यू स्टोक्सनं त्यादिवशी टेस्ट क्रिकेटमधली सगळ्यात बाप इनिंग खेळली.

ती तारीख होती २५ ऑगस्ट २०१९ आणि नंतर तशी इनिंग खेळणं कुणालाच जमलेलं नाही, विषय एन्ड!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.