उद्धव ठाकरेंचं बेरजेचं राजकारण कितपत फायद्याचं ठरणार ?

जरा जून महिन्यातल्या बातम्या आठवून बघा, एकनाथ शिंदेंचं बंड हि प्रमुख बातमी आणि त्यानंतर शिवसेनेला हादरा, आणखी काही आमदार गुवाहाटीत अशा बातम्या सतत येऊ लागल्या. आधी आमदारांपुरतं मर्यादित असलेलं हे लोण खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं. शिवसेनेचे दोन गट पडले हे साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं. 

पुढं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं इथपर्यंत गोष्टी गेल्या.

हा सगळा वाद चर्चेत असतानाच शिवसेनेत होत प्रवेशाच्या बातम्याही सातत्यानं येत आहेत. नुकतीच उद्धव ठाकरेंनी शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा केली, तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेना प्रवेश केला. 

कधीकाळी शिवसेनेच्या विरोधात उभे ठाकलेल्या संघटना, नेते सध्या शिवसेनेत प्रवेश करतायत, उद्धव ठाकरे हे बेरजेचं राजकारण कशाप्रकारे करतायत ? याचा त्यांना काय फायदा होऊ शकतो ? हेच या व्हिडीओमधून पाहुयात.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी चांगलीच गाजली. आंबडेकरी चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख असणाऱ्या सुषमा अंधारे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. राष्ट्रवादीच्या स्टेजवरुन बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर ‘महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही’ अशी टीकाही केली होती. मात्र जुलै महिन्यात उद्धव ठाकरेंचं कौतुक करत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रवेशावेळीच त्यांना पक्षाचं उपनेतेपदही देण्यात आलं.

अंधारे यांच्या रुपानं शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला चेहरा मिळाला.

बाळासाहेब ठाकरेंनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायला हव्यात असं विधान केलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि रामदास आठवलेंचा आरपीआय पक्ष बरीच वर्ष युतीत एकत्र होते. मात्र जशी भाजप-शिवसेना युती तुटली, तसं आरपीआय भाजपसोबत गेलं. त्यामुळं शिवशक्ती-भीमशक्तीचा फॉर्म्युला पुन्हा वापरण्यासाठी अंधारे सेनेसाठी महत्त्वाच्या ठरु शकतात.

सोबतच दलित मतदारांमध्ये सुषमा अंधारे चांगल्याच लोकप्रिय आहेत. राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदार संघात किमान १५ हजार दलित मतदार आहेत, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय अशा वेगवेगळ्या पर्यायांमुळे या मतांचं विभाजनही मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळं दलित मतदारांचं पाठबळ मिळवण्यासाठी आणि सर्वसमावेशक भूमिका आणखी व्यापक करण्यासाठी शिवसेनेनं ही भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.

मागच्याच आठवड्यात उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणूका शिवसेना संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊन लढवणार असल्याची घोषणा केली.

संभाजी ब्रिगेडनं २०१६ मध्ये राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये संभाजी ब्रिगेडनं शिवसेना भवनावर असलेला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढून टाकावा अशी मागणी केली होती. त्यावरुन वातावरण बरंच तापलं होतं. बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरूनही हे दोन पक्ष आमनेसामने आले होते. मात्र आता आगामी मेळाव्यांमध्ये, निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र दिसतील.

एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे नेते, त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदारांमध्येही बहुतांश मराठा नेते आहेत, मराठा मोर्चावरच्या व्यंगचित्रामुळं शिवसेनेवर आजही टीका होते, संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेला संधी न दिल्यानंही वाद झाला होता, त्यामुळं राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या मराठा राजकारणात शिवसेना बॅकफुटवर गेल्याचं बोललं जात होतं. अशावेळी मराठा मतांचं गणित साधण्यासाठी शिवसेनेला मराठा समाजातील तरुणांचा भरणा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा निश्चितच फायदा होऊ शकतो.

मराठा मतांसोबत उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडला साथीला घेत मराठवाडा या बालेकिल्ल्याला झालेलं डॅमेज भरुन काढण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. 

मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात संभाजी ब्रिगेड चांगलीच लोकप्रिय आहे, त्यामुळं तिथंही बंडखोरांविरुद्ध लढण्यात शिवसेनेला मदत मिळू शकते. या एका युतीतून उद्धव ठाकरेंनी मराठा मतं आणि मराठवाड्यातलं कमबॅक अशी दुहेरी बेरीज साधली आहे, असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही.

सोमवारी २९ तारखेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रीय पातळीवर आणि राज्यातही शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद अनेकदा आमने-सामने आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. 

विश्व हिंदू परिषद ही राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघासारखीच कडव्या हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे. शिवसेनेच्या राजकारणाचा पायाही याच कडव्या हिंदुत्वाच्या आधारे रचला गेलाय. मात्र शिवसेना महाविकास आघाडीत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का? अशी टीका सातत्यानं करण्यात आली. बंडखोर आमदारांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजपसोबत जात असल्याचं वारंवार सांगितलं. 

या सगळ्यात आपण हिंदुत्व सोडलेलं नाही, भाजपपेक्षा आपलं हिंदुत्व वेगळं आहे आणि आजही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची शिवसेनेलाच पसंती आहे, हे लोकांवर ठसवण्यासाठी, बंडानंतर मिळालेली सहानुभूती टिकवण्यासाठी शिवसेनेनं या कार्यकर्त्यांना जुने विरोध विसरुन शिवबंधन बांधल्याचं बोललं जातंय. 

आणखीन एक गोष्ट म्हणजे हे कार्यकर्ते कोकणातले आहेत, शिवसेनेचं वर्चस्व असणाऱ्या कोकणाला बंडखोरीमुळे मोठं खिंडार पडलं आहे, त्यामुळं हिंदुत्ववादी इमेज जपण्यासोबतच बालेकिल्ल्यात पुन्हा ताकद मिळवण्यासाठी शिवसेनेसाठी ही बेरीज महत्त्वाची ठरु शकते.

शिवसेनेनं साधलेली आणखी एक महत्त्वाची बेरीज म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अजूनही न सोडलेली साथ.

शिंदे गट आणि भाजप एकत्र असल्यानं आधीच बलवान आहेत, त्यात भाजप नेते आणि राज  ठाकरेंच्या भेटी बघता मनसेही त्यांची साथ देऊ शकते. शिवसेनेचा मुख्य सामनाच मुळात भाजप-शिंदे गटाशी आहे. बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांना पराभूत करु शकतील, असे उमेदवार देणंही त्यांच्यासाठी कठीण आहे. ४० बंडखोर आमदारांपैकी २३ जणांच्या मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा उमेदवार होता. अशा मतदार संघात आघाडी म्हणून लढण्यातच शिवसेनेला फायदा होऊ शकतो.

‘उद्धव ठाकरेंनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवं’ अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली होती. इतर बंडखोर आमदारांनीही असाच सूर लावलेला, मात्र अजूनही उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये झालेली ही बेरीज तशीच ठेवण्यावर भर दिलाय, कारण हाताशी असलेले आमदार आणि संजय राऊत, अनिल परब या महत्वाच्या नेत्यांच्या चौकश्या यातून स्वबळावर सत्तेत येणं जवळपास अशक्य आहे, त्यासाठी सेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत लागूच शकते.

नुकतंच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ‘बहुजन, वंचित, मुस्लिम समाज शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत. एक वेगळे वातावरण, चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.’ असं वक्तव्य केलं. 

मागच्या काही दिवसात संभाजी ब्रिगेड, विश्व हिंदू परिषद यांच्यासोबतच मराठा समाजाची छावा संघटना, धनगर समाजाची यशवंत सेना, बंजारा समाजाचे, ओबीसी समाजाचे नेते यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं एक एक करत मराठी आणि हिंदुत्वाच्या राजकारणाच्या पलीकडे जात, उद्धव ठाकरे बेरजेचं राजकारण करुन शिवसेनेला सर्वसमावेशक रुप देत आहेत अशी चर्चा सुरू आहे.

सोबतच भाजपच्या कडव्या आणि ब्राह्मणबहुल हिंदुत्वाला प्रबोधनकार ठाकरेंच्या बहुजनबहुल हिंदुत्वाच्या विचारसरणीतून शह देण्याची आखणी उद्धव ठाकरे करत आहेत का ? असा प्रश्नही उपस्थित होतोय. तसं झाल्यास आपली हिंदुत्ववादी इमेज जपण्यासोबतच त्याच मुद्द्यावरुन शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर मात करण्यासाठी आणखी जोरदार प्रयत्न नक्कीच करु शकतं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.