अवघ्या एकोणवीस वर्षाच्या पोराच्या डोकॅलिटीनं भारत पे उभी राहिलेय

दुकानात गेल्यावर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तर तुमच्या लक्षात येइल गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारखी ॲप असताना  बरेच दुकानदार भारत पे वापरतायेत. दुकानातल्या काकांना विचारला हे नवीन काय तर काका म्हणाले त्याच दिवशी पैसे जमा होतायत आणि कमिशन पण जवळपास नाहीए.

सुरवातीला भारत पे नावावरनं वाटलं हे गव्हर्नमेंटचं आहे की काय?

पण तसं नव्हतं. कंपनी खाजगीच आहे आणि ती पण भारतातली. पुढं भिडूनं अजून रिसर्च केला तर कळलं दिल्ली आयआयटीच्या अवघ्या १९ वर्षाच्या पोराच्या डोकॅलिटीनं कंपनी चालू झाली होती.

शाश्वत नकरानी आज अवघ्या २३ व्या वर्षी हुरून इंडिया सेल्फ मेड इंडीव्हीडुअल्स यादीत आहे. भारतातल्या कमी वयात श्रीमंत होणाऱ्या तरुण पोरांची ही यादी असते.

शाश्वतला सुचलेली आयडिया तशी भिडू आपल्याला पण कळायला पाहिजे होती. 

सुरवातीला तुम्ही बघितलं असेल तर ही यूपीआय वाल्या कंपन्या गूगल पे,फोन पे, पेटीएम सगळ्या स्वतःचे वेगळे वेगळे क्यूआर कोड लावून दुकानाच्या भिंतीवर पार रांगोळी बनवून टाकायच्या. आणि दुसरी गोष्ट दुकानदार पहिले विचारायचे कॅश असेल तर द्या नसेल तरच मग कोड स्कॅन करा. शाश्वतनं हेच ओळखलं.

मग शाश्वतनं एकच क्यूआर कोड द्यायचं ठरवलं जो सगळ्या ॲप वरून स्कॅन करता येइल.

यूपीआयमध्ये इंटरऑपरेबिलिटिनं असं करणं सहज शक्य होतं पण तोपर्यंत तो ऑप्शन कोणी जास्त वापरला नव्हता.  पण एवढयावरच मार्केटमध्ये एंट्री मारणं शक्य नव्हतं. शाश्वत मग पुढे अश्निर ग्रोव्हरला भेटला. अश्निर ग्रोव्हर हा भारत पेचा कोफाउंडर. आता त्यांचं दुसरं टार्गेट होतं असं रेव्हेनु मॉडेल बनवायचं की ज्यानं दुकानदारांकडून कमिशन  घ्यावं लागणार नाही. आणि लवकरचं आयडिया क्लीक झाली.

भिडू नीट लक्ष देऊन बघ.मार्केट मध्ये कितीही स्पर्धा असली तरी बाजारच्या छाताडावर पाय ठेवून कसं दिमाखात उभा राहायचं याचं हे उदाहरण होतं. 

छोटे छोटे दुकानदार अनेक वेळा माल भरण्यासाठी छोटी मोठी रक्कम इतरांकडून घेतात हे ह्या दोघांच्या लक्षात आलं. झालं ह्यांचं रेव्हेनु मॉडेल ठरलं. दुकानदारांनकडून कमिशन न घेता उलट त्यानंच कर्ज द्यायचे आणि त्यातून मार्जिन काढायचं.दुकानदार आणि भारत पे दोघांसाठी हा चांगला सौदा होता. 

BharatPe ने एक कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.)-आधारित  एक अल्गोरिदम विकसित केले आहे.

जे विविध सिग्नल्स घेते ज्यामध्ये दुकानदार कोणत्या प्रकारचे व्यवहार करतो, प्लॅटफॉर्मवर त्यांचा इतर उत्पादनांचा वापर इ.—ज्यामुळे त्यांना व्यवसायाच्या रोख प्रवाहाची माहिती मिळते. त्यानंतर कर्जाची ऑफर देण्यासाठी व्यापाऱ्याच्या कर्जाचा इतिहास आणि क्रेडिट स्कोअर यांच्या बरोबरीने याचे विश्लेषण केले जाते. इच्छुक दुकानदारासाठी मग कंपनीने करार केलेली NBFC भागीदार कर्जाची प्रक्रिया करते आणि काही दिवसांत व्यापाऱ्याच्या खात्यात जमा करतो. सर्व डिजिटल, त्रास-मुक्त, आणि, कदाचित सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुकानदाराला त्यासाठी काही गहाण ठेवावं लागत नाही.

ज्या बाकीच्या कंपन्या देत नव्हत्या जसी की त्याच दिवशी बँक अकाउंटमध्ये पैसे जमा, कोणतेही छुपी फी नाही यांसारख्या अनेक कारणांनमुळं भारत पे अल्पावधीतच स्वतःची जागा निर्माण करण्यास यशस्वी झालं आहे. बाकीच्या कंपन्या ग्राहकांनावर लक्ष देत होत्या, त्यांना कॅशबॅक,इंसेण्टिव्हज देत होत्या. मात्र भारत पे नं दुसरा मार्ग चोखाळला. यांनी दुकानदारांवर  लक्ष दिलं होतं. भारतात कस्टमर इज किंग च्या ऐवजी दुकानदार बाप आहे हे भारत पेनं बरोबर ओळखलं आहे.

त्यामुळं मार्केटमध्ये काही करायचं असेल ना तर काहीतरी वेगळं करावं लागतंच एवढं मात्र खरं आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.