स्वतःची शंभर एकर जमीन दान देऊन या शेतकऱ्याने भूदान चळवळीचा यज्ञ पेटवला.
साल होतं १९५१. आंध्र तेलंगणा भागात दंगलीनी थैमान घातलं होत.
शेतमजुरांनी आपल्या जमीनदार मालकाच्याविरोधात लढा उभारला होता. गांधीजींना जाऊन नुकतीच तीन चार वर्षे होत आली होती. त्यांचे अध्यात्मिक वारसदार म्हणून प्रसिद्ध असलेले आचार्य विनोबा भावे प्रचंड अस्वस्थ होते. बापूंच्या जाण्याच्या नंतर आजही लोकांना आपल्या प्रश्नांसाठी हिंसेचा आधार घ्यावा लागतो याचं त्यांना वैषम्य होत.
हैद्राबादजवळ शिवरामपल्लीमध्ये सर्वोदयी कार्यकर्त्यांच शिबीर होत. विनोबा त्याशिबिरासाठी हैद्राबादला आले होते. शिबीर आटोपल्यावर त्यांनी दंगलग्रस्त भागात जायचं ठरवलं. हिंसाचार असलेल्या गावांना भेट देत विनोबा फिरत होते. लोकांचे प्रश्न समजावून घेत होते. हिंसेच उत्तर प्रेम असते या गांधीजींच्या शिकवणीचा त्यांना पुनःप्रत्यय येत होता.
१८ एप्रिल १९५१. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्हयातल्या पोचमपल्ली गावात विनोबा पोहचले. हे गाव शेतमजुरांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते.
सहासातशे कुटुंब असलेलं छोटसं गाव. गावात दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. संध्याकाळी काही गावकरी विनोबांना भेटायला त्यांच्या कुटीबाहेर जमले. फाटके तुटके कपडे, खपाटीला गेलेले पोट दीनवाण्या चेहऱ्याची ही मंडळी. त्यांच्यासाठी काय करता येईल? विनोबांनी या कुटुंबाना विचारलं,”तुम्हाला काय हवं?”
त्यांनी सांगितलं,
“आम्हाला काम हवं. राबायची आमची तयारी आहे पण आमच्याकडे जमीनच नाही. पोटाला पुरेल एवढा जमिनीचा तुकडा एवढीच आमची गरज आहे “
विनोबानी अशा भूमिहीनाची संख्या मोजली. जवळपास चाळीस दलित कुटुंब होती. प्रत्येकी दोन एकर म्हणजे एक एकर ओलिताखालील आणि एक एकर कोरडवाहू एव्हढी जरी जमीन त्यांना मिळाली तरी त्यांना पुरेसं ठरणार होत. पण एवढी जमीन कुठून येणार?
विनोबा स्वतः फाटके संन्यासी होते. त्यांनी त्या शेतमजुरांना सांगितलं,
“प्रशासनाशी बोलू, गावकऱ्यांशी बोलू यातून काही मार्ग काढता येत का बघू.”
रात्री विनोबांची गावात सभा भरवण्यात आली. सगळे गावकरी हजर झाले होते. विनोबांनी आपल्या भाषणावेळी सगळ्यांना विचारलं,
“संपत्तीच केंद्रीकरण हा सगळ्या असंतोषाच कारण आहे. तुमच्याच गावचे काही बांधव भूमिहीन आहेत. त्यांच्या पोटापान्यासाठी त्यांना जवळपास ८० एकर जमीन लागणार आहे. तुम्ही काही मदत करू शकता का?”
सगळ्यांची कुजबुज सुरु झाली. गावकऱ्यापैकी एकजण हात जोडून उभा राहिला. साध्या कपड्यामध्ये असणाऱ्या त्या माणसाकडे विनोबांनी थोड्या शंकेनेच बघीतल. त्याचं नाव रामचंद्र रेड्डी होत.
तो म्हणाला “बाबा मी मदत करतो.”
विनोबा म्हणाले,” किती रुपये दान करणार?”
रामचंद्र रेड्डी म्हणाला,”शंभर एकर.”
विनोबा थक्क झाले. बांधाच्या इंचाइंचां वरून भाऊबंदकी करणाऱ्या या जगात अशीही माणसे आहेत यावरून माणुसकीवरची श्रद्धा अढळ होत होती.
रामचंद्र रेड्डीचं हे पाउल पुढे भूदान चळवळीत रुपांतर झालं. गावोगावी पायी हिंडून विनोबांनी भूदानाचा हा यज्ञ आरंभला.देशभरातल्या शेतकऱ्यांनी आपल्याला शक्य होईल एवढ्या जमिनी दान दिल्या. राजेरजवाडे जमीनदार सुद्धा याबाबतीत मागे नव्हते.
एकेकाळी आपल्या कंजूषपणासाठी आणि अन्यायी राजवटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हैद्राबादच्या नवाबाने चौदा हजार एकर जमीन भूदान चळवळीमध्ये दान दिली. झारखंडच्या राजानी मिळून एक लाख एकर जमीन दान दिली. पुढे या भूदान चळवळीचे पुढचे पाउल म्हणून ग्रामदान चळवळ सुरु झाली.
भारतात अनेक भूमिहीन कुटूंबाच कल्याण करणाऱ्या या चळवळीची सुरवात जिथून झाली त्या पोचमपल्ली गावाचे नाव भूदान पोचमपल्ली से करण्यात आले.
हे ही वाच भिडू.
- विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?
- गांधीवादी बाळासाहेब भारदे आणि दोनशे रुपयांच्या पोत्यावर दोन लाखांच कर्ज वाटलेली बॅंक
- गांधीवादी मुळशी पॅटर्न : “सेनापती बापट विरुद्ध टाटा”.