बिहारसारखं मागास राज्य IAS-IPS उमेदवारांची फॅक्टरी कशी बनली?

आज यूपीएससीचा निकाल लागलाय. त्यामुळे पुढचे काही दिवस देशभरात या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची चर्चा असणार आहे. त्यांचे सत्कार, त्यांची भाषण, त्यांचा अभ्यासाचा पॅटर्न, त्यांचा स्ट्रगल असं सगळं जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असणार आहेत. पण भिडुनो तुम्हाला माहित आहे का कि भाषण करणाऱ्या उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त उमेदवार असतात ते,

देशातील सगळ्यात मागास राज्य असलेल्या बिहारचे. 

आणि फक्त UPSC नाही तर, IIT, IIM अशा संस्थांच्या परीक्षांमध्ये पण बिहारी पोरांचा आकडा जास्त असतोय. जर आकडेवारीत सांगायचं झालं तर, सध्या देशातील जवळपास ४ हजार ९६४ IAS अधिकाऱ्यांपैकी ४१६ जण बिहारी आहेत. म्हणजे देशात जवळपास ९ टक्के IAS एकट्या बिहारचे आहेत. बिहारमध्ये २.८१ लाखांपैकी १ उमेदवार प्रत्येकवर्षी IAS बनून बाहेर पडतो.

आता हे फक्त १-२ वर्षांचीच गोष्ट आहे का? तर नाही. २००७ ते २०१६ च्या दरम्यान देशभरात IAS झालेल्या १ हजार ६६४ उमेदवारांपैकी १२५ जण बिहारचे होते. त्याआधीच देखील सांगायच झालं तर १९८७ ते १९९६ या ९ वर्षाच्या काळात ९८२ जण IAS केडरसाठी निवडले गेले होते. यातील १५९ जण बिहारचे होते. म्हणजे तो दर जवळपास १६.१९ टक्के होता.

असं म्हणतात कि बिहारमध्ये गरिबातील गरीब मुलांपासून ते मंत्री, आमदारांच्या मुलांपर्यंत सगळे जण IAS, IPS बनण्याचं स्वप्न बघत असतात.

पण या मागील नेमकी कारण काय आहेत?

तर यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे बिहारचे मागासलेपण. होय. बरोबर वाचलं आहे. बिहारचे असलेले मागासलेपण हेच बिहारमध्ये सगळ्यात जास्त IAS-IPS असण्याचं कारण आहे. आता  कसं ते पण विस्कटून सांगतो.

बिहार हे राज्य म्हणजे एकेकाळी संपूर्ण जगाचे शिक्षणाचं केंद्र होते. त्यावेळी बिहारमध्ये नालंदा, तक्षशिला अशी जागतिक दर्जाची विद्यापीठ होते. मात्र कालांतराने बिहारचे हे शैक्षणिक केंद्र म्हणून नाव मागे पडले. स्वातंत्र्यानंतर हि परिस्थिती अधिकच बिघडत गेली.

आज परिस्थिती अशी आहे कि, एका आकडेवारीनुसार ६-१४ या वयोगटातील जवळपास २५ लाख विद्यार्थी शाळा बाह्य झालेत. मागच्या एका वर्षात हा आकडा ७ लाखांनी वाढला आहे. आज बिहारमध्ये शिक्षकांची अवस्था, शैक्षणिक संस्थांची अवस्था देखील अत्यंत बिकट आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दिल्ली, महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यांमध्ये स्थलांतर करत आहेत.

सोबतच बिहारमध्ये रोजगाराची अवस्था देखील काहीशी बिकट आहे. आज जवळपास ५० लाख बिहारी हे देशाच्या विविध भागात कामासाठी स्थलांतरित झाल्याचे आकडेवारी सांगते. यातील तब्बल २५ लाख बिहारी हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागात कामासाठी आले आहेत.

बिहारमध्ये शेतीवर अवलंबून असलेल्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. बिहारमध्ये एकूण लोकसंख्येच्या तब्बल ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशातच बेभरवशी निसर्ग, जमिनीचं तुकडीकरण, महापूर अशा विविध कारणामुळे या शेतीची अवस्था देखील काहीशी दयनीय आहे.

बिहारमध्ये खाजगी उद्योग देखील मोठ्या प्रमाणावर नाहीत. राज्यात नोएडा, पुणे, बंगरुळु अशा शहरांसारखी एखादी IT सिटी देखील उभी राहिलेली नाही. जे काही मोठे आणि जास्त रोजगार देणारे साखर कारखाने होते ते देखील राज्याच्या विभाजनादरम्यान झारखंडमध्ये गेले.

या सगळ्या कारणांमुळे बिहारमधील बेरोजगारीचा दर देशात जास्त आहे, आणि नेमक्या याच कारणांमुळे शिक्षणानंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतात.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकांकडे चांगला जॉब हातात नसतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक पाठबळ देखील नसते. परिणामी ‘मुले सरकारी नोकरीत जाऊन आर्थिक परिस्थिती सुधारणे’ हा मार्ग स्वीकारताना दिसतात.

यात सगळ्यात आघाडीवर असते UPSC ची परीक्षा. या सोबत उमेदवार राज्य लोकसेवा आयोग, बँकिंगच्या परीक्षेची तयारी देखील करत असतात.

अजून एक कारण म्हणजे बिहारची तत्कालीन राजकीय परिस्थिती देखील जबाबदार असल्याचं तज्ञ सांगतात. कारण लालू प्रसाद यादव यांच्या राजवटीमध्ये बिहारच्या परिस्थितीची तुलना ‘जंगलराज’ म्हणून केली जायची. राज्यात वाढलेला भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती या गोष्टींमुळे राज्यात अधिकाऱ्यांचे राज्य चालायचे.

त्यामुळे लाल दिव्याची गाडी आणि अँबेसिडर कार यांचं आकर्षण तरुणांच्या मनावर खोलवर रुजलं आणि बिहारची पोरं पद आणि सत्ता या गोष्टींच्या मागे पाळायला लागले. परिणामी बिहारमध्ये अधिकाऱ्यांची संख्या वाढत राहिली. सरकारी नोकरी या मुलांना एक प्रकारे आर्थिक स्थिरता आणि देशाची सेवा करण्याची संधी अशा दोन्ही गोष्टी उपलब्ध करून देते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.