गडी एकटा गेला नाही, भाजपमध्ये जाताना कॉंग्रेसला चांगलच डॅमेज करुन चाललाय…

गुजरात मध्ये काय चालू आहे ? तर ओन्ली हार्दिक पटेल ! का ? तर हार्दिक पटेल भाजप मध्ये ग्रँड एंट्री करणार आहेत. कशामुळे ? तर २०२२ वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत 

थेट विषयाला सुरुवात करू..

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हार्दिक भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. आता या चर्चांना ब्रेक लागला असून अलीकडेच हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आणि येत्या २ जून रोजी ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. 

हार्दिक पटेल जे अगदी ४-५ महिन्याच्या आधी पर्यंत भाजपचे आणि मोदींचे सर्वात मोठे टीकाकार समजले जात होते तेच हार्दिक पटेल भाजपमध्ये जातायेत ही गोष्टच मोठी आश्चर्यकारक मानली जाते.

हार्दिक पटेलांनी काँग्रेस पक्ष का सोडला ?

हार्दिक पटेल यांची राजकीय महत्त्वाकांक्षा सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत गुजरातमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला राजकीय महत्त्व मिळत नसल्याचा रागही हार्दिक यांच्या मनात होता तसं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलं.

गुजरात काँग्रेसचे जुने नेते आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत किंवा पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नसल्याचे खुद्द हार्दिकने म्हटले होते. गुजरात काँग्रेसच्या कोणत्याही पोस्टरमध्ये त्यांना स्थान दिले जात नव्हते.  त्यामुळे त्यांना पक्षात एकटेपणा जाणवू लागला आणि थेट भाजपमध्ये एंट्री मारायचं डन केलं.

काँग्रेसने हार्दिक पटेलांच्या रूपाने एक तरुण खमक्या नेता गमावला असला तरी भाजपाला मात्र लॉटरी लागलीये….पण कशी काय ?

कारण एकटे हार्दिक पटेल भाजप मध्ये जात नसून त्यांच्या सोबत तब्बल १,५०० कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

हार्दिक पटेल भाजपमध्ये येण्याचे फायदे थोडक्यात बघायचे झाल्यास ते असे…

१. गुजरात मध्ये ‘पाटीदार’ खूप महत्त्वाचे आहेत.

गुजरातच्या एकूण लोकसंख्येपैकी १.५ कोटी लोकसंख्या ही पाटीदार समाजाची आहे. आणि या समाजाचा जवळपास ७० विधानसभेच्या जागांवर थेट प्रभाव आहे. थोडक्यात गुजरातमध्ये कुणाचं सरकार येणार हे पाटीदार मतदार ठेवतो म्हणल्यास वावगं ठरणार नाही. 

गुजरातमधील एकूण १८२ विधानसभा जागांपैकी सुमारे ७० जागांवर ‘पाटीदार मतदार’ थेट प्रभाव टाकतात. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार आंदोलनामुळे भाजपला या जागांचे नुकसान झाले होते. पक्षाला १०० जागांचा आकडाही पार करता आला नव्हता. भाजपला केवळ ९९ तर  काँग्रेसला ८२ जागा मिळाल्या. सर्वात जास्त नुकसान सौराष्ट्र भागात झाले आहे. जिथे काँग्रेसने ५६ पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी भाजपला अवघ्या २२ जागांवर समाधान मानावे लागले.

२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३६ आमदार पाटीदार समाजाचे होते, तर २०१७ मध्ये त्यांची संख्या २८ झाली. तर काँग्रेसचे २० पाटीदार उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते.. गुजरातमध्ये सध्या भाजपचे पाटीदार समाजाचे ४४ आमदार आहेत आणि ६ खासदार आणि तीन राज्यसभा खासदार आहेत. अर्थातच भाजपला ही आकडेवारी वाढवायची आहे.

२.  याच पाटीदार समाजाचे हार्दिक पटेल मोठे नेते आहेत.

हार्दिक पटेल यांनी कॉलेजच्या काळापासूनच पाटीदार समाजातील प्रश्नांना हात घातला. आपल्या समाजातील केवळ गरीबच नाही तर श्रीमंत असलेल्या मुलांना देखील सरकारी नोकरी मिळतं नाही, आणि या गोष्टीला केवळ आरक्षण जबाबदार आहे. हे त्याच्या लक्षात आलं. पाटीदारांच्या जमिनींच पण मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण झाले होते पण त्यांना नोकऱ्या दिल्या नव्हत्या असं हार्दिक पटेल यांचं म्हणणं होतं. त्यांनी हा प्रश्न लावून धरला आणि पाटीदार समाजातील एक मोठा गट हार्दिक पटेल यांच्या प्रभावाखाली आहे.

सद्द्याला हा पाटीदार समाज भाजपपासून बराच दूर गेलेला असतांना हार्दिक पाटलांच्या भाजप प्रवेश होतोय. येत्या विधानसभेत पटेल यांना तिकीट द्यायचं आणि नाराज असलेला पाटीदार गट भाजपकडे पुन्हा आकर्षित करायचा हाच मुख्य उद्देश हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशाचा आहे. पाटीदार आंदोलनातून हार्दिक पटेल हे मोठे नेते बनले आणि त्यांच्यात त्यांची चांगली पकड आहे.  त्यामुळे भाजपला हार्दिककडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

३. हार्दिक पटेलांचे पाटीदार आंदोलन ज्यामुळे भाजपला मोठा फटका सहन करावा लागला होता.

हार्दिक पटेल यांनी ‘पाटीदार अनामत आंदोलन समितीची’ स्थापना केली आणि वयाच्या २२ व्या वर्षी आरक्षणाची मागणी घेऊन राज्यसरकारच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. या मागणीला उचलून धरतं ६ जुलै २०१५ त्यांनी एक छोटीशी रॅली काढली होती. त्यांच्या जशा सभा वाढत गेल्या तसा त्यांना प्रतिसाद देखील वाढत गेला.

२५ ऑगस्ट २०१५ रोजी अहमदाबादमध्ये केलेलं आंदोलन हे पाटीदार समाजासाठी आजवरचं सर्वात मोठं आंदोलन होतं. हार्दिक पटेल, ज्यांनी या पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व केले.

पाटीदार आंदोलन ज्याने गुजरातच्या राजकारणाची दिशा बदलून टाकली होती. युवकांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावं आणि इतर मागास जातींमध्ये त्यांच्या समाजाचे नाव समाविष्ट करावे अशी मागणी केली. आंदोलकांनी हार्दिक पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS) स्थापन केली. संस्थेने स्वतःला एक बिगर राजकीय संघटना म्हणून घोषित केले. याऐवजी अनेक पटेल समाजाच्या संघटना आणि संस्था या देखील या पाटीदार आंदोलनात सामील झाल्या होत्या. 

या आंदोलनात सरदार पटेल सेवा दलाचे कार्यकर्ते, पाटीदार अनामत आंदोलन समितीचे कार्यकर्ते,  लालजी पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरदार पटेल ग्रुप, पाटीदार संकलन समितीचे लोकं, पाटीदार आरक्षण समिती कार्यकर्ते, खोदलधाम ट्रस्टचे लोकं, हे लोक सरकार आणि आंदोलकांमध्ये दूत म्हणून काम करत आहेत असे सर्वांचा या आंदोलनात सहभाग होता.

यानंतर झालेल्या हिंसेमुळे सरकारला सैन्याला बोलवावं लागलं होतं. त्यादिवशी पोलिसांनी हार्दिक यांना अटक केली पण एव्हाना त्यांना अवघ्या महिन्याभरात राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली होती. २२ व्या वर्षी मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधांना थेट भिडणारा नेता म्हणून ओळख जाऊ लागलं होतं. 

पुढे २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यानंतर अवघ्या १९ महिन्यात त्यांना गुजरात काँग्रेसचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं गेलं होतं. पदामुळे त्यांची राज्यातील ताकद वाढली ज्याचा पुन्हा एकदा २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो याची भीती भाजपला होती. आगामी विधानसभा निवडणुकीत पाटीदार भाजपच्या बाजूने उभे राहणार नाहीत. असं या समुदायाची ठाम भूमिका झाल्यामुळे भाजपने याची गंभीर दखल घेतली नाहीतर भाजपाला मोठा हिशोब मोजावा लागला असता. मात्र आता हि भीती नसणार कारण याच पाटीदार समाजाचा नेता आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. 

४. हार्दिक पटेलांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला आपला जुनाच मतदार पुन्हा मिळवता येईल.

भाजपला आजवर ८०-८५% मतं ही पाटीदार-पटेल यांच्याकडूनच मिळत आलीत. गुजरातमधील पाटीदार समाज दीर्घकाळापासून भाजपसोबत आहे. आत्तापर्यंत भाजपाला “पटेल” नावाचे मुख्यमंत्री मिळाले त्यावरून तरी ते स्पष्ट होते.  गुजरातमध्ये चिमणभाई पटेल, केशुभाई पटेल, बाबूभाई पटेल, आनंदीबेन पटेल आणि विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे सगळे मुख्यमंत्री पाटीदार समाजातूनच होते.

२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४८ टक्के मते मिळाली होती, पण २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत घट दिसून आली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पाटीदारांची ६० टक्के मते मिळाली होती, तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ ४९.१ टक्के मते मिळाली होती. 

त्यात हे ही दुर्लक्षून चालणार नाही ते म्हणजे, २०१७ च्या मतांच्या टक्केवारी पाहिल्यास अमानत आंदोलन आणि पाटीदारांवर झालेल्या लाठीचार्जमुळे उसळलेल्या विरोधानंतर देखीलही पाटीदार मतदार भाजपपासून पूर्णपणे फारकत घेतलेला नव्हता. मात्र, काही भागांत त्यांची नाराजी भाजपला खटकली होतीच. 

मात्र हार्दिकच्या आगमनाने भाजपला पटेल-पाटीदार समाजातील जुना जनाधार परत मिळण्याची अपेक्षा आहे.

५. नरेश पटेल यांना टक्कर देण्यासाठी हार्दिक पटेल भाजपच्या कामी येऊ शकतात. 

नरेश पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने हार्दिक पटेल आणि सोबतच भाजप देखील अस्वस्थ आहे. कारण हार्दिक पटेल यांच्याशिवाय नरेश पटेल हे देखील पाटीदार समाजाचे मोठे नेते आहेत जे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.  नरेश पटेल काँग्रेसमध्ये गेल्यास हार्दिक पटेलांच्या माध्यमातून पाटीदार मतदारांना रोखता येईल, अशी भाजपची रणनीती आहे 

नरेश पटेल हे श्री खोडलधाम ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. खोडलधाम ट्रस्ट ही राजकोटमधील लेऊआ पटेल समाजाची महत्त्वाची संस्था आहे. नरेश पटेल यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिल्यापासून राज्यातील सर्व पक्ष त्यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नरेश पटेल यांच्या काँग्रेससोबत बऱ्याच  बैठका पार पडल्यात त्यामुळे काँग्रेसमध्येच जाणार अशी शक्यता आहे.

थोडक्यात वर सांगतलेले असे ५ मुद्दे जे हार्दिक पटेल भाजप मध्ये जाता जाता घेऊन जाणार आहेत आणि त्यामुळे भाजपची चांदी होणारे..

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.