पुणे फेस्टिव्हलमुळं सुरेश कलमाडी पुढं आले, पण यंदा डाव भाजपनं साधला…

‘राजकारणातला एक बायोडेटा असतो, त्यात पुणे फेस्टिव्हल नसतं तर माझा तो बायोडेटा अर्धवट राहिला असता, तो तुम्ही पूर्ण केला त्याबद्दल मी सुरेश कलमाडींचे आभार मानतो,’ हे वक्तव्य आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं.

पुण्याच्या गणेशोत्सवात जसे मानाचे पाच गणपती, भव्य देखावे आणि विसर्जन मिरवणूक हे आकर्षण असतं, त्याच बरोबर आणखी एक विषय चर्चेत असतो, तो म्हणजे पुणे फेस्टिव्हल.

दरवर्षी गणेशोत्सवात आयोजित होणारं हे पुणे फेस्टिव्हल यंदा दोन वर्षांच्या ब्रेकनंतर अगदी वाजतगाजत होतंय.

यंदाच्या फेस्टिव्हलचं उदघाटन झालं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांकडून पण तरीही सगळ्या नजरा खिळल्या होत्या, ते या फेस्टिव्हलचे सर्वेसर्वा आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर. सबकुछ कलमाडी आणि पर्यायानं सबकुछ काँग्रेस असणारं हे पुणे फेस्टिव्हल यावेळी भाजपमय झालंय.

सुरेश कलमाडी म्हणजे पुण्याचे एकेकाळचे कारभारी आणि पुणे काँग्रेसमधलं सगळ्यात मोठं नाव. तीन वेळा पुण्याचे खासदार, पुणे महापालिकेचे किंगमेकर असणारे कलमाडी पुण्याच्या राजकारणात सबसे बडा खिलाडी म्हणून आजही प्रसिद्ध आहेत. १९७७ मध्ये पुणे युथ काँग्रेसचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर कलमाडी राजकारणात जोरदारपणे सक्रिय झाले. १९८९ मध्ये त्यांनी पुणे फेस्टिव्हलला सुरुवात केली.

गणशोत्सवानिमित्त आयोजित होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये सुरुवातीला पंडित भीमसेन जोशी, पंडित शिवकुमार शर्मा अशा दिग्गज कलाकारांनी सादरीकरण केलं. संगीत, नाटक, नृत्य या  सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच, खेळांच्या स्पर्धांचं आयोजनही या फेस्टिव्हल दरम्यान करण्यात येतं.

सुरुवातीला पुणे फेस्टिव्हलला फारसा राजकीय रंग नव्हता, कलमाडीच आयोजक असल्यामुळं तिथं काँग्रेसच्या नेत्यांची मांदियाळी मात्र असायची.

या पुणे फेस्टिव्हलमध्ये मोठमोठे सिनेअभिनेते, अभिनेत्रीही हजेरी लावायचे. अगदी एखाद-दुसरा अपवाद सोडला, तर दरवर्षी पुणे फेस्टिव्हलमध्ये हेमामालिनी गणेशवंदना सादर करतात. ऋषी कपूर, ऐश्वर्या राय, उर्मिला मातोंडकर ते अगदी यंदाच्या फेस्टिव्हलला सुनील शेट्टी, या बॉलिवूडमधल्या सिताऱ्यांच्या उपस्थितीमुळे पुणे फेस्टिव्हलला प्रसिद्धीचं वलय प्राप्त झालं, जे आजतागायत कायम आहे.

जवळपास ३४ वर्ष सुरू असलेल्या या पुणे फेस्टिवलमधून कलमाडींनी स्वतःचं वर्चस्व वाढवलं. पुण्यातले सेलिब्रेटी, व्यावसायिक ते अगदी सामान्य लोक असे सगळे जण या फेस्टिव्हलमुळे कलमाडींशी जोडले गेले. त्यांचा जनसंपर्क या फेस्टिव्हलमुळे वाढला. काँग्रेसमधलं कलमाडींचं वर्चस्व पाहता तिकीटाची आस असलेले अनेक जणही या फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावायचे.

आणखी एक आकर्षण ठरायचं ते परदेशी पाहुणे. कलमाडींना पुणे फेस्टिव्हल ग्लोबल करायचं होतं, त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या फॉरेन एम्बसीमधल्या लोकांना आमंत्रित करायला सुरुवात केली. त्यामुळं जपानचा अधिकारी फेटा वैगेरे बांधून या फेस्टिव्हलमध्ये दिसायचा आणि पुणेरी लोकांना हे चित्र आवडायचं.

पुण्याच्या राजकारणात आणि जनमानसात लोकप्रिय होण्यासाठी कलमाडींनी फक्त पुणे फेस्टिव्हलच नाही, तर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनचीही सुरुवात केली. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ही देशातली पहिली इंटरनॅशनल मॅरेथॉन ठरली. पंतप्रधान राजीव गांधींनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता, तर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला अगदी परदेशी सिनेरसिकांची आजही गर्दी होते. 

या सगळ्या फेस्टिव्हल्समधून कलमाडींनी आपल्या भोवती लोकप्रियतेचं वलय तयार केलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचं नाव अधोरेखित केलं.

सध्या भाजप नेत्यांच्या पुणे फेस्टिव्हलमधल्या उपस्थितीवरुन चर्चा रंगल्या आहेत. पण याआधी गोपीनाथ मुंडेंनीही पुणे फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे २००७ मध्ये पुणे महापालिकेत कलमाडी आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना आणि भाजपनं एकत्र येत पुणे पॅटर्न राबवला होता, ही गोष्ट गोपीनाथ मुंडेंना पसंत पडली नव्हती. 

त्यामुळं त्यांची कलमाडी आयोजक असलेल्या पुणे फेस्टिव्हलला उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता.

फक्त मुंडेच नाही, तर प्रकाश जावडेकर आणि तेव्हा भाजपमध्ये असलेले शत्रुघ्न सिन्हाही पुणे फेस्टिव्हलला उपस्थित राहिले होते. शत्रुघ्न सिन्हा यांना बोलावण्याचा मात्र कलमाडींना पश्चाताप झाला असावा. 

कारण सिन्हा यांना कार्यक्रमाला यायला उशीर झाला आणि त्याचं खापर त्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांवर फोडलं, या खड्ड्यांचीच पुढं बातमी झाली. आगामी निवडणुकांच्या प्रचारात हा खड्ड्यांचा मुद्दा गाजला आणि काँग्रेसची सत्ता गेली.

सबसे बडा खिलाडी असणाऱ्या कलमाडींचं वर्चस्व गेलं ते खेळामुळेच. 

२०१० च्या कॉमनवेल्थ युथ गेम्स भ्रष्टाचारात त्यांचं नाव आलं आणि त्यांना ९ महिने तुरुंगात काढावे लागले. मात्र तिथून बाहेर आल्यावरही ते राजकारणात फारसे सक्रिय झाले नाहीत. काँग्रेसनं पुण्याच्या निवडणुकाही पतंगराव कदम आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात लढवल्या, ज्यात त्यांची पिछेहाट झाली. पुणे फेस्टिव्हल होत राहिलं, मात्र त्याच्या भोवती असलेलं राजकीय वलय कमी झालं होतं. 

यंदाच्या वर्षी पुणे फेस्टिव्हलसाठी महापालिकेनं पाठिंबा द्यावा अशी विनंती करणारं पत्र घेऊन स्वतः सुरेश कलमाडी महानगरपालिकेत गेले आणि पुन्हा एकदा त्यांचं नाव हेडलाईन्समध्ये आलं. 

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यापासून काँग्रेस नेत्यांनी कलमाडींपासून अंतर राखलं, त्यात पक्षानंही निलंबनाचे आदेश दिले. कलमाडी राजकारणात सक्रिय नसल्याने पुणे फेस्टिव्हलची पॉलिटिकल स्पेस कोण व्यापणार याबद्दल चर्चा सुरु होत्या आणि ही स्पेस व्यापली भाजपनं.

२०१७ पासून पुणे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. दरवर्षी पुणे फेस्टिव्हलसाठी महापौरांना निमंत्रण असतं, मात्र भाजपच्या महापौरांनी या फेस्टिव्हलपासून अंतर ठेवलं. जेव्हा भाजपच्या आधी राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिकेची सत्ता मिळवली, तेव्हा त्यांनीही पुणे फेस्टिव्हलमध्ये फारसा रस दाखवला नाही. 

यंदा मात्र पार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते अगदी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक असे सगळे जण पुणे फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर हजर राहिले. 

यामागचं कारण जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं पत्रकार अद्वैत मेहतांशी संपर्क साधला. ते म्हणाले,

”पुणे फेस्टिव्हलचा उपयोग कलमाडींनी इमेज बिल्डिंगसाठी केला. खासदार असताना पुण्याचे सीईओ असल्यासारखा त्यांनी हा कार्यक्रम अगदी हायफाय केला. वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या माध्यमातून त्यांनी पुण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं, हे सत्य आहे. 

पुणे फेस्टिव्हलभोवती तयार झालेल्या वलयामुळं सेलिब्रेटी आणि राजकीय नेते हजेरी लावू लागले. 

याआधीही भाजप नेत्यांनी पुणे फेस्टिव्हलला उपस्थिती लावली आहे. पण सध्याचं चित्र जरा आश्चर्यचकित करणारं आहे. कलमाडींच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा निकाल अजूनही लागलेला नाही. त्यामुळं आता या वयात आपल्यामागे कुठली चौकशी लागायला नको म्हणून आणि काँग्रेसनं दिलेलं अंतर पाहता त्यांना भाजपशी जवळीक साधणं गरजेचं आहे. 

मात्र ज्यांच्या विरुद्ध रान उठवलं, आरोप केले ते कलमाडी राजकारणात फारसे सक्रिय नसताना भाजपला त्यांची गरज का वाटतीये हे अनाकलनीय गूढ आहे.”

पण पाहायला गेलं तर, पुणे म्हणजेच कलमाडी हे कलमाडींचं आणि काँग्रेसचं वर्चस्व खऱ्या अर्थानं भाजपनंच मोडून काढलं.

२०१४ पासून दोन्ही टर्म भाजपचा खासदार आहे, पुणे महानगरपालिकेवरही २०१७ पासून सत्ता आहे, ८ पैकी ६ आमदार भाजपचे आहेत. सोबतच पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना तिकीट देण्याच्या चर्चा याआधी झाल्या होत्या. त्यात पुण्याचे सध्याचे खासदार गिरीश बापट यांनी राजकारणात रस उरला नसल्याचं सांगितलंय.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप या नव्या बालेकिल्ल्याची चाचपणी पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून करतंय, असं  बोललं जातंय आणि त्यामुळेच काँग्रेसचे कार्यकर्ते मागच्या आणि भाजपचे कार्यकर्ते पहिल्या रांगेत असं बदललेलं चित्र यंदाच्या पुणे फेस्टिव्हलच्या रुपानं पाहायला मिळतंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.